ख्रिसमस नव्हे बैसाखी! आमीरच्या चित्रपटाचा नवा मुहूर्त ठरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमीर खान सध्या बराच काळ बॉलिवूडच्या पडद्यापासून दूर आहे. त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ तिकीटबारीवर दणकून आपटला होता. बिग बजेट चित्रपटाचे 2018च्या ऐन दिवाळीत फटाके वाजल्यानंतर त्याने काही काळ शांत बसणंच पसंत केलं होतं. पण, आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी लांब दाढी, डोक्यावर शीख पगडी अशा वेशातल्या आमीरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजत होता. कारण, ‘गझनी’पासून सुरू झालेली त्याच्या विविध लूक्सची चर्चा. आपल्या आगामी चित्रपटासाठी केसांपासून ते शरीरयष्टीपर्यंत सगळ्यावर जीवतोड मेहनत करणाऱ्या आमीरचा लूक बदललेला दिसला कीच त्याच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू होते. तसंच काहीसं या फोटोबाबतीतही झालं होतं. या फोटोत दिसणारा आमीरचा लूक त्याच्या आगामी लाल सिंग चढ्ढा या चित्रपटासाठी असल्याचंही उघड झालं होतं.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 2022मध्ये असणार होती. आमीरच्या चित्रपटांची परंपरा पाहता तो ख्रिसमसच्या दरम्यान चित्रपट प्रदर्शित करेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, त्याने यावेळी ख्रिसमसऐवजी बैसाखीचा मुहूर्त धरला आहे. कारण, त्याचा लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी झळकणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे. लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गंप या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. राजकारण, प्रेम, इतिहास, खेळ, युद्ध अशा अनेक भावभावनांचे ते मिश्रण असल्यानेच आमीरने ही कथा निवडल्याचं बोललं जात आहे. आमीरसोबत या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूरही झळकणार आहे.