तुम जियो हजारो साल…! मध्यरात्रीपासून बिग बी यांच्या घराबाहेर चाहत्यांचा ‘जलसा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना 80 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपासूनच जुहू येथील त्यांच्या ’जलसा’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची अलोट गर्दी केली. ’हॅप्पी बर्थडे बिग बी’, ’तुम जियो हजारो साल’ अशा आशयाचे पोस्टर झळकावत, केक कापत चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या.

घराबाहेर जमलेल्या शेकडो चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी बिग बी यांनी देखील काही क्षणासाठी जलसा बंगल्याबाहेर आले होते. हात उंचावत, सर्वांना अभिवादन करत त्यांनी चाहत्यांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार केला. बिग बी यांना पाहून चाहत्यांचा देखील आनंद गगनात मावेनासा झाला होता. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.

कोणीतरी असा ज्याने मला नेहमीच प्रेरणा दिली, थलाईवाने दिल्या शुभेच्छा

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, बॉलीवूड कलाकारांनी देखील बिग बी यांच्यावर वाढदिवसानिमित्त सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘द लीजेंड… कोणीतरी असा ज्याने मला नेहमीच प्रेरणा दिली…आपल्या गौरवशाली हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील एक खरा संवेदनशील सुपरहिरो 80 व्या वर्षात पदार्पण करतोय. प्रिय आणि सर्वात आदरणीय अमिताभजी यांना वाढदिवसानिमित्त खूप प्रेम आणि शुभेच्छा’ अशा शब्दांत थलाईवा रजनीकांत यांनी बिग बी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर उत्तर देताना बिग बी म्हणाले, ‘रजनी सर, तुम्ही मला खूपच श्रेय देत आहात… तुमच्या अफाट कर्तृत्वाशी माझी तुलना होऊ शकत नाही. तुम्ही केवळ माझे चांगले सहकारी नाही तर खूप जवळचे मित्र देखील आहात. तुमची कृपा आणि प्रेमळ शुभेच्छा माझ्यासाठी अनमोल आहेत.’