वेब न्यूज – विचित्र या परंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान हा एक उत्सवप्रिय देश आहे. आपल्या देशात जवळपास प्रत्येक आठवडय़ाला कोणता ना कोणता सण, धार्मिक उत्सव, समारंभ यांची रेलचेल सुरू असते. प्रत्येक देशवासी अगदी मनापासून त्या त्या उत्सवाचा आनंद घेत असतो. लग्न समारंभ हा त्यातला एक विशेष उत्सव म्हणायला हवा. प्रत्येक धर्मात त्याला एक आगळे स्थान आहे. परंपरा, चालीरीती या धर्मानुसार बदलत असल्या तरी त्यातला जोश एकच असतो. लग्नानंतर मुलगी सासरी जायला निघते तेव्हा तिचे आणि नातलग स्त्रियांचे डोळे भरून येत नसतील तर नवलच!

प्रत्येक मुलगी सासरी जाताना भावुक होतेच आणि तिला निरोप देताना तिचे मातापिता. काही लोक याला गमतीने ‘अश्रुपाताची परंपरा’ असेदेखील म्हणतात. मात्र चीनमध्ये हा अश्रुपात खरंच परंपरा म्हणून पाळला जातो. चीनच्या दक्षिण पश्चिमी प्रांत ‘सिचुआन’मधील ‘तुजिया’ जमातीमध्ये ही परंपरा पिढय़ान्पिढय़ा पाळली जात आहे. सासरी जाताना नवरीने रडणे या जातीमध्ये अत्यंत आवश्यक मानले जाते. असे न घडल्यास वेळेला नवऱया मुलीला चार रट्टे देऊन रडायला लावले जाते. मुलीचे न रडणे अशुभ मानले जाते. अशा मुलीला कुसंस्कारी मानले जाते आणि त्यानंतर संपूर्ण गाव त्या परिवाराची टवाळी उडवतो.

साधारण 17 व्या शतकात या परंपरेची सुरुवात झाली असे मानले जाते. या परंपरेबरोबरच या भागात आणखी एका वेगळ्या परंपरेचेदेखील पालन केले जाते. काहीशा वेगळ्या अशा या परंपरेत लग्नाच्या एक महिना आधी नवऱया मुलीला रात्रीच्या वेळी एका मोठय़ा हॉलमध्ये बसून एक तास रडावे लागते. या परंपरेला ‘जुओ टांग’ संबोधले जाते. दहा-दहा दिवसांच्या अंतराने मुलीची आई, आजी, आत्या, मावशी अशी परिवारातील एक-एक स्त्राrदेखील तिच्यापाशी बसून रडण्यात सहभाग नोंदवतात. यावेळी दुःखी गाणीदेखील जोरजोरात वाजवली जातात.