लोकप्रिय पंजाबी गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबी सिने इंडस्ट्रीमधील लोकप्रिय गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी अमृतसर येथून कर्तारपूरला जात असताना हा अपघात झाला आहे. जंडियाला गुरूजवळ ही दुर्घटना घडली. दिलजानचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिलजानच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास अमृतसर-जालंधर जोटी रोडवर जंडियाला गुरू पुलाजवळ दिलजानचा अपघात झाला. त्याची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. दिलजानने आजवर अनेक गाणी गायली आहेत. त्याचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. त्याने ‘आधा पिंड’, ‘यारां दी गल’, ‘शूं करके’, ‘हर पल’, ‘फर्स्ट लव’, ‘मेरा दिल’, ‘धरती’, ‘तेरे शहर’ ही गाणी गायली आहेत. लवकरच त्याचे एक नवे गाणे रिलीज होणार होते. या गाण्याचे नाव ‘तेरे वरगे 2’ असे आहे. नव्या गाण्याबाबत दिलजान अतिशय उत्सुक होता. 2 एप्रिलला त्याचे हे गाणे रिलीज होणार होते, पण ते रिलीज होण्यापूर्वी दिलजानने या जगाचा निरोप घेतला.