
चित्रकार व सुलेखनकार सुभाष जमदाडे यांच्या ‘मंत्राक्षरे’ व चित्रकार सुरेश गोसावी यांच्या ‘भक्ती आणि शक्ती’ या विषयावरील कलाकृतींचे एकत्र प्रदर्शन 26 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 या काळात जहांगीर कलादालनात होणार आहे.
दोन्ही चित्रकार पुण्याचे आहेत. सुभाष जमदाडे सुलेखनातून पेटिंग साकारण्याचा कलाप्रयोग सातत्याने करत असतात. या प्रदर्शनासाठी त्यांनी अध्यात्म व उपासना मंत्र यावर सर्जनात्मक आविष्कार साकारला आहे. ओंकार आणि गायत्री मंत्र यांचा दृश्यानुभव पाहायला मिळणार आहे.
नैराश्येतून एकाग्रतेकडे, सुखाकडून समाधानाकडे जाण्यासाठी भक्ती आणि श्रद्धा आवश्यक असते. मग ती कोणत्याही स्वरूपातील असो. याचा प्रत्यय सुरेश गोसावी यांच्या ‘भक्ती आणि शक्ती’ या चित्र मालिकेतून येतो. कुतूहल व निरागसतेचे रूप म्हणजे लहान मुले, भक्तीचे रूप म्हणजे वारकरी, शक्तीचे रूप म्हणजे महाकाय हत्ती, श्रद्धास्थानी देवदेवतांची अनोखी रूपे अशा अनेक प्रतिकात्मक घटकांच्या कलाकृती विनामूल्य पाहता येईल.


























































