
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला संतांची, लोकशाहिरांची, स्वातंत्र्य सैनिकांची, कलावंतांची, खेळाडूंची अखंड परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा आतापर्यंतचा हा सुंदर प्रवास देखाव्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणला आहे. अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाने यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा ‘माझा महाराष्ट्र सोन्याची नगरी’ या संकल्पनेवर देखावा साकारला असून हा देखावा सध्या मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
अंधेरीच्या या गणेशोत्सव मंडळाचे यंदा हे 41 वे वर्ष आहे. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक व पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा या मंडळाने या वर्षी ‘माझा महाराष्ट्र सोन्याची नगरी’ हा अप्रतिम देखावा साकार केला आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अजय देवगण यांच्या टीमचे शशिकांत ढवळे यांनी ‘तानाजी’ चित्रपटाचा सेट येथील देखाव्याला दिला आहे. कलादिग्दर्शक अनिल रेडेकर, मूर्तिकार गोठणकर यांनी खास कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार केली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करत गणेशभक्तांना येथील देखाव्याचे ऑनलाइन दर्शन दिले जात आहे. मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे, सरचिटणीस अशोक मोरे, सल्लागार संजीव (कल्ले) बिल्लू, सल्लागार अनिल राऊत आणि इतर कार्यकर्ते यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.
याबद्दल अधिक माहिती देताना देवेंद्र आंबेरकर म्हणाले की, श्रीगणेशाच्या आशीर्वादाने व संतांच्या या पावनभूमीत कोरोना काळात महाराष्ट्राने कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आणले आहेत. लसीकरणही मोठय़ा प्रमाणात झाले आहे. महाराष्ट्र राज्य हे कोरोना नियंत्रण आणण्यात पहिल्या नंबरचे या देशात राज्य ठरले आहे. त्यामुळे ही खास सजावट येथे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंडळाकडून आरोग्य उत्सवाचे आयोजन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार मंडळाने उत्सव कालावधीत आणि कोरोनाच्या काळात अनेक आरोग्याचे उपक्रम हाती घेतले होते. ज्यात रक्तदान शिबीर, सोसायटींचे निर्जंतुकीकरण, कोरोना चाचणी, वैद्यकीय तपासणी शिबीर, मास्क, सॅनिटायझर वाटप, मोफत रुग्णवाहिका, गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप, मोफत लसीकरण केंद्र, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत असे अनेक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती बाळा आंबेरकर यांनी दिली.


























































