
आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व येथील जागेसाठी शिवसेनेने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रमेश लटके यांचे मुंबई महापालिका, विधिमंडळातील योगदान आणि निवडून येणाऱ्या प्रतिनिधीला मिळणारा कालावधी पाहता अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोधच करावी. निवडणूक प्रतिष्ठेची न करता महाराष्ट्रात चांगला मेसेज जाण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेतली होती. मुंडे यांच्या परिवारातील कोणी सदस्य उमेदवार म्हणून पोटनिवडणूक लढवणार असेल तर आम्ही पाठिंबा देऊ असे मी म्हणालो होतो. त्याचप्रमाणे अंधेरी पोटनिवडणुकीतही जो उमेदवार निवडून येईल, त्याला केवळ दीड वर्षाचा कार्यकाळ मिळेल. त्यानंतर पुन्हा निवडणुका होतील. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ही आपली संस्कृती राहिली आहे, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांचे भाजपला आवाहन
मला प्रामाणिकपणे वाटते की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड झाल्यास देशभरात चांगला संदेश जाईल.
राज ठाकरे यांचेही फडणवीस यांना पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल. भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं, असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.
फडणवीस म्हणतात, चर्चा करून निर्णय घेऊ
भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात चर्चा करू असे म्हटले आहे. ते म्हणाले, भाजपमध्ये मी काही एकटा निर्णय करू शकत नाही. मला माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच पक्षातही वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी लागेल. कारण आम्ही उमेदवार घोषित केला आहे आणि दिलाही आहे. त्यामुळे आता या पातळीवर यासंदर्भात काही भूमिका असेल तर ती मला घेता येणार नाही. त्यामुळे आमच्या पक्षात चर्चा करावी लागेल. त्याचप्रमाणे मला मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.





























































