
अंधेरी पूर्व, मरोळ, मुकुंद नगर येथे असलेल्या ‘एसबीआय’ बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना आज घडली. यात पूर्ण एटीएम खाक झाले असून रोकडही जळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नाही.
मरोळच्या चार मजली मुपुंद नगर कॉओपरेटिव्ह सोसायटी या इमारतीच्या खाली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये सोमवारी दुपारी 1.16 मिनिटांनी आग लागली. या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून एटीएम मशीनसह आतील सामान जळून खाक झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.


























































