
मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला मार्ग परिसरातील समूह क्षेत्राची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे. या झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेतून 28 हजार 61 पुनर्वसन सदनिकांची निर्मिती होणार आहे. ज्यामध्ये सुमारे 14 हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार असून, त्याचबरोबर अतिरिक्त 14,061 पुनर्वसन घरे उपलब्ध होणार आहेत. प्रशस्त घरासोबत नागरिकांसाठी खुल्या जागा, खेळाची मैदाने, शाळा, आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध होणार आहे.
अंधेरी पश्चिम येथील या प्रकल्पासाठी बांधकाम आणि विकास संस्थेची नियुक्तीसाठी 8 एप्रिल रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदांचे तांत्रिक लिफाफे उघडण्यात आले आहेत. यात शापूरजी पालनजी रिअल इस्टेट, रिलायंस 41 R रियलीटी डेव्हलपमेंट आणि जेएसडब्लू रियलीटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. अशा नामांकित खाजगी गृहनिर्माण क्षेत्रातील तीन दिग्गज पंपन्यांनी प्रतिसाद नोंदविला आहे. सध्या प्राप्त प्रस्तावांची तांत्रिक छाननी सुरू असून, उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेने निविदाकारांचे आर्थिक निविदा उघडण्यात येतील.
रखडलेल्या योजनांना गती मिळणार
एसआरए प्राधिकरणाने विविध समूह क्षेत्रांचा अभ्यास करून अन्य 18 समूह क्षेत्रे निश्चित केली आहेत. या उपक्रमामुळे रखडलेल्या एसआरए योजनांना गती मिळणार असून, सुमारे 6 ते 7 लाख झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन शक्य होणार आहे, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.





























































