
सामना प्रतिनिधी । लातूर
अहमदपूर तालूक्यातील मौजे अंधोरी येथील सरपंच संगीता कबीर पिट्टलवाड यांना जिल्हाधिकारी यांनी सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरविले आहे. मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपत्र ठरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे बापूराव गणेशराव देवळकर (रा. अंधोरी) यांनी 20 ऑक्टोबर, 2018 रोजी यासंदर्भात प्रकरण दाखल केले होते.
2017 मध्ये राखीव प्रवर्गातून संगीता पिट्टलवाड या निवडून आलेल्या होत्या. निवडून येऊन 1 वर्ष 2 महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही त्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1) (अ) नुसार सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या प्रकरणी सुनावणी घेऊन सरपंच संगीता कबीर पिट्टलवाड यांना सरपंच पदी राहण्यास अपात्र ठरवले असून सरपंच पद रिक्त झाल्याची घोषणा केली आहे.




























































