क्रांतिज्योती पेटल्या तर सरकार खाक होईल! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हक्काच्या मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना ‘मिंधे’ सरकारला लाखो अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे पहायलाही वेळ नाही. त्यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशीच अंगणवाडी सेविकांचे वादळ मुंबईच्या आझाद मैदानात धडकले आहे. तुम्ही सर्व सावित्रीच्या लेकी आहात. सावित्रीबाईंच्या ज्योती तुमच्यात तेवत आहेत. या असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतील तेव्हा धगधगती मशाल तयार होते. त्यामुळे क्रांतिज्योती पेटल्या तर सरकार खाक होईल, असा हल्लाबोल आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तुमची ही एकजूट म्हणजे प्रचंड मोठी ताकद आहे. तुमचा सेवेचा हात सरकारच्या कानाखाली आपटला तर केवढा आवाज होईल?’

 राज्यातील अंगणवाडी सेविका आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करीत असताना ‘मिंधे’ सरकारने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. मध्य प्रदेशमध्ये भाजपने ‘लाडली बहना’ योजनेचे  आश्वासन दिले होते. या ठिकाणी त्यांचे सरकारही आले.  मग महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका तुमच्या ‘लाडल्या’ नाहीत का, असा सवालही त्यांनी केला.

जाहिरातीवर उडवायला पैसे आहेत, भारत घडवणाऱ्यांसाठी मात्र नाहीत!

तुम्ही जनतेची म्हणजे देशाची सेवा करीत आहात. म्हणजेच एका अर्थाने ही देशसेवाच आहे. त्यामुळे डिसेंबरपासून आंदोलन सुरू असताना सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केला. या सरकारला खोके सरकार म्हणतात. सरकार आणण्यासाठी यांच्याकडे खोके आहेत, जाहिरातींवर उडवायला यांच्याकडे पैसे आहेत, अंगणवाडी-आशा सेविकांना हक्काचे पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत, असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला.

गद्दारांनी सरकार पाडले नसते तर तुम्हाला आंदोलन करावेच लागले नसते

कोरोना काळात मी मुख्यमंत्री असताना  अंगणवाडी सेविकांना प्रत्येक महिन्याला वेतन मिळत होते. गद्दारांनी सरकार पाडले नसते तर प्रलंबित मागण्याही पूर्ण झाल्या असत्या. राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानाच अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण होणार होत्या. गद्दारांनी सरकार पाडले नसते तर तुम्हाला आंदोलनासाठी यावेच लागले नसते. त्यामुळे गद्दारीने आलेले सरकार पाडण्याआधीच अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आमचे सरकार आल्यावर पहिला निर्णय अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करणारा घेण्यात येईल, असेही त्यांनी मिंधे सरकारला ठणकावले.

नव्या वर्षाचा नवा निश्चय, माझं सरकार मी निवडणार

तुमची सेवा कळत नसणारे हे कृतघ्न लोक आहेत. असे सरकार तुमचे आहे का, असा सवालही त्यांनी केला. यावेळी ‘नाही, नाही, नाही’ असा एकच आवाज घुमला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपला मत द्यायचे की नाही याचा विचार करा. नव्या वर्षात नवा निश्चय करा, माझं सरकार मी निवडणार, माझं भविष्य मी घडवणार, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ग्रामीण भागात शिक्षणाचा श्रीगणेशा तुमच्या अंगणवाडीत होतो. असे असताना तुम्हालाच जर वृद्धापकाळाची काळजी असेल तर आपण कोणत्या सरकारला बोडक्यावर बसवायचे याचा विचार करा, असेही ते म्हणाले. आताचं जे काही तीन बांगडं सरकार जुळलेलं आहे… तंगडय़ात तंगडं तंगडय़ात तंगडं, अशी स्थिती आहे. यांच्यापेक्षा खेकडा बरा. खेकडा तरी सरळ जाईल कदाचित, पण हे सरकार सरळ जाणार नाही. हे सरकार बिघाडी सरकार आहे. आता त्यांचं सगळं बिघडलंय, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसैनिकांनो, भगिनींना न्याय मिळेपर्यंत पाठीशी रहा!

मी या ठिकाणी माझी जाहिरातबाजी करायला किंवा तुमच्या आंदोलनाचे नेतृत्व करायला आलेलो नाही. तुमचा भाऊ म्हणून तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आहे, असे सांगताना तुम्ही केव्हाही मला हाक द्या, तुमचा भाऊ तुमच्या सोबत असणार असे वचन उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांना दिले. अंगणवाडी सेविकांना न्याय मिळेपर्यंत शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी लढय़ात गावागावात भगिनींच्या सोबत रहा, शांत बसू नका, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाच्या व्यासपीठावरून शिवसैनिकांना दिले.

मंत्री गुटगुटीत म्हणजे भारत सुदृढ होत नाही!

राज्यात नवजात शिशू, सहा वर्षांपर्यंतच्या तीन लाख बालकांना पोषण आहार मिळत नाही. अनेक गरोदर माता, महिला कुपोषित आहेत, मात्र जाहिरातील गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो दिसतात. गुटगुटीत मंत्र्याचा फोटो म्हणजे भारत सुदृढ भारत नाही. आरोग्यमंत्री सुदृढ झाले असतील… खेकडे खाऊन, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या तुम्ही भगिनी खऱ्या अर्थाने भारताला सुदृढ करीत आहात. तुम्ही कुपोषित बालकांना आहार देता पण तुम्हाला सरकारने कुपोषित केलेय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.

संप आणि ठिय्या आंदोलन सुरूच राहणार

राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईत धडक दिल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी रात्री उशिरा चर्चा केली. यावेळी ग्रॅच्युईटी, पेन्शन, कर्मचाऱ्यांना मोबाईल याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले; मात्र मानधनात वाढ करण्यास नकार दिला. यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या 30 दिवसांपासून सुरू असलेला संप सुरूच ठेवत मुंबईत आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम. ए. पाटील यांनी दिली.

मागण्या काय?

  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी द्या
  • शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा
  • अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी
  • दरमहा निवृतीवेतनाचा लाभ मिळावा
  • अंगणवाडी सेविकांना कामकाजासाठी मोबाईल द्यावा