
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांच्या अपहरणाच्या थरारनाटय़ानंतर सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक केली. या दोघांनाही सीबीआयने गुरुवारी दिल्लीतील न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या दोघांवरही सीबीआयची गोपनीय माहिती लीक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले होते. याप्रकरणी सध्या सीबीआय तपास करीत असून काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना क्लीन चिट देण्यात आल्याचे एक पत्र व्हायरल झाले होते. याबाबत तपास करण्यासाठी सीबीआयच्या एका 12 जणांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांचे अपहरण करून चौकशीअंती वीस मिनिटांमध्ये सुटका केली होती. तर याचवेळी सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनादेखील चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अखेर बुधवारी रात्री उशिरा डागा यांना पोलिसांनी अटक केली. तर हे कागदपत्रे लीक करण्यासाठी मदत करणाऱया सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनादेखील बुधवारी रात्री अटक केल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली. त्यानंतर सीबीआयने ट्रान्झिट रिमांडवर या दोघांना दिल्ली येथे नेऊन पुढील कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास करताना सीबीआयने दिल्ली आणि अलाहाबाद येथील काही ठिकाणी छापेमारी केल्याची माहितीदेखील पुढे आली आहे.
सविस्तर अहवाल मागवला
अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिलेले पत्र लीक झाल्यानंतर सीबीआयने बुधवारी आपल्या कारवाईचा वेग वाढवला. यात सीबीआयने अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांचे अपहरण केल्याची धक्कादायक माहितीदेखील पुढे आली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता याप्रकरणी आपण पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






























































