मोदींच्या बहिणीला तिकीट दिले नाही ते विधानसभेत किती माना कापणार! अनिल परब यांचा मिंध्यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधणाऱ्या त्यांच्या बहिणीला (भावना गवळी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीत तिकीट देऊ शकले नाहीत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत किती जणांच्या माना कापल्या जातील, असा सणसणीत टोला शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना आज लगावला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून अॅड. अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. अनिल परब यांनी मिंध्यांच्या गद्दारीचा समाचार घेतला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून त्यांच्यासोबत येणाऱ्या नेत्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता, पण पहिल्याच टप्प्यात त्यांना 13 खासदारांना तिकीट देता आले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला किती जणांच्या माना कापल्या जातील विचार करा. पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेची घट्ट पकड आहे. शिवसैनिकांची चांगली नोंदणीही झाली आहे. त्यामुळे मला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिंदे गटाच्या अनेकांचे मतपरिवर्तन होईल

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना आता उद्धव ठाकरे यांचे विचार पटत असल्याचा दावाही अनिल परब यांनी यावेळी केला. इतरही अनेक नेत्यांच्या विचारांत परिवर्तन होऊ शकते, असेही परब म्हणाले. अनेक नेते सोडून गेले तरी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. महायुतीत शिंदे गटाची गळचेपी सुरू आहे. भाजपने या मतदारसंघावर दावा केला तर त्यांची अडचण होईल. आम्ही समोर कोण आहे याचा विचार करत नाही, असेही अनिल परब यावेळी बोलताना म्हणाले.