कुंपणामुळेच प्राण्यांच्या प्रजननक्षमतेत घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षा खरमार्ळे । पुणे

वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि सातत्याने बदलत जाणाऱ्या विकासाच्या संकल्पना यातून झाडांची बेसुमार कत्तल, टेकड्यांचे-जमिनीचे सपाटीकरण तसेच जमिनीवर ठिकठिकाणी टाकण्यात येणारी तारेची-सिमेंटची कुंपणे, औद्योगिकीकरण यामुळे निर्सगाचा समतोल ढासळण्यासोबतच, प्राण्यांच्या हालचालींवर बंधने वाढत असून, प्राण्यांना प्रजननाकरिता इतरत्र ये-जा करण्यावर मर्यादा येत असल्याने त्यांच्या प्रजननक्षमतेत घट होत आहे. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या आणि वन विभागाच्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.

हिंदुस्थानात केंद्र शासनाने वन्यजीवरक्षणाच्या उद्देशाने काही नैसर्गिक प्रदेश संरक्षित केले असून हे प्रदेश राष्ट्रीय उद्याने, अभारण्ये, वनोद्योग या तीन प्रमुख प्रकारांत आढळून येतात. पर्यावरणातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे हा अभारण्ये स्थापन करण्याचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने, चार व्याघ्र प्रकल्प व ३५ अभारण्ये संरक्षित करण्यात आली आहेत. मात्र, जंगलातील वृक्षांची होत असलेली बेसुमार तोड, चोरट्या शिकारी, बदलते तापमान, प्रदूषण यामुळे प्राण्यांच्या अधिवासावरच संकट ओढावले जात आहे. अशातच, सर्व निसर्ग म्हणजे झाडे-वेली, पशुपक्षी, डोंगरा-नद्या वगैरे सगळ्या गोष्टी फक्त माणसाच्याच उपयोगासाठी बनलेल्या आहेत, अशी समजूत वाढत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी प्राण्यांची नैसर्गिक अधिवासाची ठिकाणे नष्ट केली जात असून वाढत्या प्रदूषणामुळे प्राण्यांचा जन्मदर घसरत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झाली असून काही प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. नद्यांच्या प्रदूषणामुळे जलचर प्राणीही नामशेष होत आहेत. वन्यप्राण्यांचे मांस, पंख, कातडी, हस्तिदंत, शिंगे, नखे यांकरिता शिकार केली जात असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

प्राण्यांकरिता सुरक्षित अधिवास महत्त्वपूर्ण
अभारण्ये तसेच जंगल परिसरात मानवी अतिक्रमण वाढताना दिसत आहे. वनजमिनीजवळील शेतांमध्ये कुंपणे घालण्याची संख्या वाढत असून, प्राण्यांना मर्यादित जागेतच राहावे लागत आहे. तसेच प्राण्यांच्या प्रजननकरिता दुसऱ्या ठिकाणांवरून ये-जा करणाऱ्या प्राण्यांवर बंधने येऊ लागल्याने प्रजननक्षमतेवर परिणाम होत आहे. प्राण्यांच्या प्रजननक्षमतेत घट होण्यामधील वेगवेगळ्या कारणांपैकी हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. वन्यप्राणी असलेल्या ठिकाणाजवळील जमिनी ताब्यात घेताना, प्राण्यांकरिता सुरक्षित अधिवास कशाप्रकारे चांगला राहू शकेल याचा विचार होणे गरजेचे आहे.
– आर. के. वानखेडे, वनसंरक्षक, पुणे वन विभाग