एन्रीक नॉर्खियाचा सराव सुरू! दिल्ली कॅपिटल्सला दिलासा

राजस्थान रॉयल्सने गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सवर रोमहर्षक विजय मिळवला आणि गुणांचे खाते उघडले. या लढतीत दिल्ली कॅपिटल्सला एका अव्वल गोलंदाजाची प्रकर्षाने गरज भासली. ख्रिस मॉरिस व जयदेव उनाडकट या जोडीने अखेरच्या षटकांमध्ये दे दणादण फटकेबाजी करीत सामना फिरवला. मात्र आता पुढील लढतींसाठी दिल्ली कॅपिटल्सला दिलासा मिळाला आहे. वेगवान गोलंदाज एन्रीक नॉर्खिया विलगीकरणातून बाहेर आला असून सरावालाही लागला आहे.

एन्रीक नॉर्खिया यावेळी म्हणाला, विलगीकरणातील रूममध्ये बाहेर आल्यावर छान वाटत आहे. संघ सहकाऱयांसोबत नाश्ता करताना मजा येत आहे. सरावाला सुरुवात करणार असल्याने आनंदी आहे. आयपीएल हिंदुस्थानात होत आहे याचाही आनंद काही औरच आहे. पुन्हा एकदा मैदानात उतरल्यानंतर बरे वाटले, असेही तो पुढे म्हणाला.

कोरोना पॉझिटिव्हचा चुकीचा रिपोर्ट

दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाकडून यावेळी सांगण्यात आले की, एन्रीक नॉर्खिया याचा कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह आलेला रिपोर्ट चुकीचा होता, पण तरीही आम्ही त्याला विलगीकरणात ठेवले. तसेच तीन वेळा त्याची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याला विलगीकरणातून बाहेर काढण्यात आले. आता तो संघाच्या बायो बबलमध्ये (जैव सुरक्षित वातावरण) आहे.

आपली प्रतिक्रिया द्या