
बेजबाबदार आणि अपमानकारक टिप्पणीद्वारे बॉलिवूडला बदनाम केले जात असल्याचा आरोप करत बॉलिवूड असोसिएशन आणि 34 सिनेनिर्मात्यांनी काही टीव्ही चॅनल्स विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्ही तसेच टाइम्स नाऊ या चॅनेलला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर काही वृत्तवाहिन्या बेजबाबदार रिपोर्टिंग करत असून बॉलिवूडची बदनामी करत आहेत रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ त्यापैकीच एक असून या वृत्त वाहिन्यांविरोधात करण जोहर, यशराज, आमिर खान, शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या प्रोडक्शन कंपन्या, चार फिल्म इंडस्ट्री असोसिएशन आणि 34 निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर आज न्यायमूर्ती राजीव शकधेर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी हायकोर्टाने रिपब्लिक चॅनलच्या एडीआर आउटलेटर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि टाइम्स नाऊच्या बेनेट कोलमन अॅण्ड कंपनी लिमिटेड या कंपन्यांना बजावले बॉलिवूड विरोधात कोणतीही बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर अपलोड करू नका तसेच संबंधित चॅनेलवरही प्रदर्शित होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले.
त्यावेळी चॅनलच्या वतीने बाजू मांडणाऱया वकिलांनी या पुढे असे होणार नाही याची हमी खंडपीठाला दिली. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी 14 डिसेंबर पर्यंत तहकूब केली.





























































