नवा जगज्जेता की फायनलची पुनरावृत्ती – अर्जेंटिना-क्रोएशिया, फ्रान्स-मोरोक्को उपांत्य फेरीत भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास पूर्ण झालाय. आता उपांत्य फेरीत बुधवारी मध्यरात्री अर्जेंटिनाविरुद्ध क्रोएशिया आणि गुरुवारी मध्यरात्री फ्रान्सविरुद्ध मोरोक्को हे संघ भिडणार आहेत. केवळ तीन लढतींनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील जगज्जेता जगासमोर येणार आहे. यात क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यापैकी कोणी बाजी मारली, तर फुटबॉल जगाला नवा जगज्जेता मिळणार आहे. याचबरोबर फ्रान्स व क्रोएशिया यांच्यात गतवेळीप्रमाणे यंदाही फायनलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

क्रोएशिया, मोरोक्को अजेय

यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झालेल्या चार संघांमध्ये क्रोएशिया व मोरोक्को हे संघ अद्यापि अजेय आहेत. अर्जेंटिना व फ्रान्स या संघांना प्रत्येकी एकदा पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. फ्रान्स गतविजेता आहे, तर अर्जेंटिना माजी जगज्जेता आहे. दोन्ही संघांमध्ये स्टार खेळाडू आहेत. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनल मेस्सीचे जगभरात सर्वाधिक चाहते आहेत. त्यामुळे बहुतांश फुटबॉलप्रेमींना अर्जेंटिनाने यंदाचा विश्वचषक जिंकावा असे वाटत असेल. क्रोएशियाला गतवेळी जेते पदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे ब्राझीलसारख्या संघाला घरचा रस्ता दाखविणाऱया या संघालाही यंदा गतवेळी भंगलेले स्वप्न सत्यात उतरविण्याची संधी असेल. याचबरोबर फ्रान्समध्येही जगज्जेते पद राखण्याची क्षमता आहे.

मोरोक्को पहिला आफ्रिकन देश

फिफा वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. याआधी आफ्रिका उपखंडातील एकही देश या फुटबॉल महाकुंभात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेला नाहीये. कॅमेरून (1990), सेनेगल (2002), घाना (2010) या देशांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास केलेला आहे.

…तर पुन्हा फ्रान्स-क्रोएशियामध्ये फायनल

2018च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये फ्रान्स-क्रोएशिया यांच्यात अंतिम लढत होऊन फ्रान्सने जगज्जेते पद पटकावले होते. आता उपांत्य लढतीत क्रोएशियाने अर्जेंटिनाला आणि दुसरीकडे फ्रान्सने मोरोक्कोला पराभूत केल्यास पुन्हा एकदा फ्रान्स-क्रोएशिया यांच्यात वर्ल्ड कपची फायनल होऊ शकते. वर्ल्ड कपच्या इतिहासात अंतिम लढतीची पुनरावृत्ती आजपर्यंत झालेली नाही.

मेस्सीकडे अखेरची संधी

कारकिर्दीतील अखेरचा वर्ल्ड कप खेळत असलेल्या लियोनल मेस्सीला कारकिर्दीतील वर्तुळ पूर्ण करण्यासाठी फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकायची आहे. जगज्जेते पद सोडल्यास फुटबॉल विश्वातील सर्वच किताब मेस्सीच्या पायावर लोळण घेत आहेत. त्यामुळे अर्जेंटिनाच्या या स्टार खेळाडूला राहिलेले हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची अखेरची संधी असेल. मात्र त्यासाठी मेस्सीला उपांत्य लढतीत क्रोएशियाचा अडथळा पार करून नंतर फायनलमध्ये बाजी मारावी लागणार आहे.