
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनय क्षेत्राच्या ग्लॅमरस दुनियेमध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काहींना आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तर काहींना आपल्या घरच्यांच्याच रोष पत्करावा लागतो. असाच काहीसा प्रकार कोलकत्तामधील अरिना डे हिच्यासोबत घडला आहे. वयाच्या २७व्या वर्षी अरिनाने ‘मुस्कान’या हिंदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
एका वृत्तपत्राशी बोलताना अरिनाने सांगितले की, तिला आधीपासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. परंतु तिचे वडील पारंपरिक विचारांचे असल्याने तिला त्यांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी परवानगी नाकारली होती. तरीही तिने आपला हट्ट न सोडल्याने तिच्या वडिलांनी कठोर पावले उचलत तिच्या अबोला धरला आणि महिनाभर घरात डांबून ठेवले होते. पुढे बोलताना अरिना म्हणाली की, तिने जिद्द सोडली नाही तिने तिच्या आईची समजूत काढली. खूप प्रयत्नांनंतर तिच्या आईने तिला नाटकांमध्ये काम करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर काही दिवसांनी तिने जेव्हा करियरच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि चांगल्या संधीसाठी मुंबईमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी पुन्हा घरातल्यांनी चिडून तिचे जेवण बंद केले. इतके केल्यानंतरही अरिनाने आपला हट्ट सोडला नाही म्हणून वडिलांनी दोन वर्षांची मुदत देऊन तिला मुंबईला पाठवले. दोन वर्षांत चांगले करियर घडवता आले तर ठीक नाहीतर परत माघारी परतण्याच्या बोलीवर घरातल्यांनी अरिनाला मुंबईला पाठवण्यास होकार दिला.’

अखेर अरिनाने मुंबईमध्ये आपल्या हिमतीच्या जोरावर आणि प्रयत्नांनी ‘मासूम’ या स्टार भारत वाहिनीवरील हिंदी मालिकेमध्ये आईची भूमिका मिळवली आहे. यावेळी परत घरी जाण्याविषयी तिला विचारले असता. तिने नकार दर्शविला आणि आपल्या वडिलांनाही आपण आपला निर्णय कळविला असल्याचे सांगितले आहे.

























































