राहुल गांधी यांच्यावरील अटक वॉरंटला स्थगिती

बदनामीच्या एका खटल्यात उपस्थित न राहिल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर छैबासा येथील न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला झारखंड हायकोर्टाने आज स्थगिती दिली.

2019 च्या निवडणुकांपूर्वी छैबासा येथील एका सभेत अमित शहा यांच्याबद्दल राहुल यांनी कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल प्रताप कुमार या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून हा खटला दाखल करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी राहुल गांधी या खटल्याच्या सुनावणीसाठी उपस्थित राहिले नसल्यामुळे छैबासा विशेष न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले होते.

नंतर गांधी यांनी या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले होते. या प्रकरणी झालेल्या सुनावणीअंती, हायकोर्टाने या वॉरंटच्या कार्यवाहीला 30 दिवसांची स्थगिती दिली.

राहुल गांधी यांनी शहा यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हे बदनामीकारक वक्तव्य केले असल्याचे कुमार यांनी त्यांच्या अर्जात म्हटले आहे.