
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा या दांपत्याविरुद्ध बुधवारी सत्र न्यायालयाने पुन्हा जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. हनुमान चालिसा पठण प्रकरणात न्यायालयाने हा झटका दिला. या वॉरंटला अनुसरून राणा दांपत्याने पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहणे बंधनकारक असून त्यावेळीही हे दांपत्य गैरहजर राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट निघण्याची शक्यता आहे.
एप्रिलमध्ये राणा दांपत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट धरला होता. त्यावेळी सामाजिक अशांतता आणि धार्मिक सौहार्द बिघडवल्याप्रकरणी राणा दांपत्याला खार पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी सध्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मागील सुनावणीवेळी राणा दांपत्याला न्यायालयात हजर राहण्याचा सक्त आदेश दिला होता. त्या आदेशाला अनुसरून दोघांनी बुधवारी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक होते, मात्र दांपत्य गैरहजर राहिल्याने न्यायालयाने पुन्हा दोघांविरुद्ध पाच हजारांचे जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. याप्रकरणी आता 10 जानेवारीला पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी राणा दांपत्य हजर न राहिल्यास दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे. नवनीत राणा व त्यांच्या वडिलांविरुद्ध आधीच बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अटकेची टांगती तलवार आहे. त्यातच आता या प्रकरणात अटक वॉरंट जारी झाल्यामुळे राणा यांची चिंता वाढली आहे.
नेमके प्रकरण काय?
राज्यात मशिदीवरील भोंग्याचे प्रकरण तापले होते. त्याचवेळी राणा दांपत्याने ‘मातोश्री’ परिसरात हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राणा दांपत्य ताळय़ावर आले होते. मात्र सामाजिक वातावरण कलुषित केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. ही कोठडी संपल्यानंतर राणा दांपत्याची काही अटींसह जामिनावर सुटका झाली होती.




























































