वाचककट्टा – साहित्यिक दायित्वाचा विधायक उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> तृप्ती कुलकर्णी

विदर्भाच्या साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रक्रमाने उल्लेखिली जाणारी प्रेरणादायी चळवळ म्हणजे चंद्रपूरचे फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान.

प्रत्येक निर्मितीसाठी अनुकूल परिस्थितीच लागते असे नाही. प्रतिकूलतेतही जिद्द, दूरदृष्टी आणि सामाजिक बांधीलकी असेल तर नवे पर्व घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रपूरचे फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान होय.

कोळशाच्या खाणी, वाढते प्रदूषण आणि दुसरीकडे समृद्ध वनसंपदा अशा दोन टोकांच्या वास्तवात उभ्या असलेल्या चंद्रपुरात साहित्य-संस्कृतीचा संपन्न मळा फुलविण्याचे कार्य या प्रतिष्ठानने केले आहे. त्याची सुरुवात झाली ती जिवती या दुर्गम, नक्षलग्रस्त तालुक्यात कार्यरत असलेल्या शिक्षक नरेश कुमार बोरीकर यांच्या सकारात्मक विचारातून आणि दृढनिश्चयातून.

पहाडावरील नोकरीमुळे चंद्रपुरातील साहित्यिक व सांस्कृतिक घडामोडींपासून दूर राहावे लागत असल्याची खंत त्यांना आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांना होत होती. त्या काळी दळणवळणाची साधनेही मर्यादित होती. त्यामुळे इतरत्र जाणे-येणे शक्य नसल्याने आपले कामकाज सांभाळून स्वतच सांस्कृतिक व्यासपीठ उभे केले तर त्यात अधिक चांगल्या प्रकारे सक्रिय राहता येईल असे त्यांना वाटू लागले.

या विचारातूनच आझाद गार्डनमध्ये विजय वाटेकर, बी. सी. नगराळे आणि नरेश कुमार बोरीकर आणि इतर मित्र यांच्या छोटेखानी बैठकीतून फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान 2012 साली अस्तित्वात आले. संस्थेचा उद्देश केवळ स्वतची साहित्यिक भूक भागवणे नव्हता, तर नवोदित आणि प्रस्थापित साहित्यिकांना समान व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. नव्या लेखक-कवींना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास देत त्यांच्या लेखनाला पैलू पाडण्याचे फिनिक्सचे कार्य आजतागायत निष्ठेने सुरू आहे.

जिवती ते चंद्रपूर हे सुमारे 75 किलोमीटरचे अंतर नियमित पार करत साहित्यसेवा करणाऱया या कार्यकर्त्यांचे वेळेचे काटेकोर नियोजनही कौतुकास्पद आहे. सुरुवातीला काव्य, निबंध, चित्रकला यांसारख्या स्पर्धा, वृक्षारोपण यांसारखे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले गेले. कालांतराने या छोटय़ा रोपटय़ाचा विस्तार मोठय़ा वृक्षात झाला आणि विविध क्षेत्रांतील साहित्यप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले.

सातत्य ही या समूहाची आणखी एक जमेची बाजू आहे. कोरोना महामारीच्या काळातही संस्थेने कार्य थांबवले नाही. गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या सहकार्याने ‘श्वास पुन्हा घेण्यासाठी’ आणि ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही ऑनलाइन कवी संमेलने आयोजित करण्यात आली. भीती व तणाव कमी करणे, सामाजिक जागृती घडवणे आणि कवी-कवितेचा उत्साह जिवंत ठेवणे हा त्यामागील उद्देश होता. या संमेलनांनंतर त्यातील कवितांचे पुस्तक प्रकाशित करून त्याचे सामाजिक जागृतीसाठी मोफत वितरणही करण्यात आले. याच काळात रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवून संस्थेने सामाजिक बांधीलकीही जपली. या सर्व उपक्रमांचा खर्च सदस्यांनी सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून स्वत केला, हे विशेष उल्लेखनीय आहे.

आजपर्यंत फिनिक्सच्या माध्यमातून अनेक पुस्तकांचे प्रकाशन, साहित्य चर्चा घडल्या आहेत. तसेच त्याद्वारे फिनिक्स साहित्यकृती सन्मान, प्रेरणा पुरस्कार, फिनिक्स मित्र पुरस्कार, फिनिक्स प्रतिमा पुरस्कार असे विविध पुरस्कारही देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे फिनिक्स सेवावृत्ती सन्मानाद्वारे प्रसिद्धीपासून दूर राहून समाजकार्य करणाऱया व्यक्तींनाही गौरविण्यात येते. त्यामुळे साहित्य आणि समाज यांचा संबंध अधिक दृढ झाला आहे.

आज फिनिक्सचा प्रवास एका छोटय़ा उपक्रमापुरता मर्यादित राहिलेला नाही. ती विदर्भाच्या साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रक्रमाने उल्लेखिली जाणारी प्रेरणादायी चळवळ बनली आहे. अधिकाधिक विधायक उपक्रमांच्या माध्यमातून साहित्य आणि समाज यांना जोडणाऱया या संस्थेने आपल्या नावाप्रमाणेच नवचैतन्याची उंच भरारी घेतली आहे. पुढेही असेच नानाविध उपक्रम राबवण्याचा संस्थेचा उद्देश आहे. संस्थेच्या या सर्व कार्याला हार्दिक शुभेच्छा!

समाजाचे हित साधू पाहते तेच खरे साहित्य… ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून सार्थ करणाऱया फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठानमध्ये साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. त्यासाठी अध्यक्ष नरेशकुमार बोरीकर आणि सहसचिव गोपाल शिरपुरकर यांच्याशी संपर्क साधावा.

[email protected]