भटकंती – प्राचीन जलव्यवस्थापन सप्तेश्वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम निर्माण केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा.

मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्री नदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर डाव्या हाताला डोंगरावर चढलेला रस्ता दिसतो. चांगली डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे 3 कि.मी. गेल्यावर ओढय़ावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर. डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते.

मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे. जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो, आपल्या समोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे आणि त्याच्या मागे चिऱयाच्या दगडात बांधलेले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूला खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला पाच खिडक्या. या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहांत विभागून ते परत मोठय़ा कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधीसोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे, पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेलमधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेले आहे. जिथे तो जोडलेला आहे, तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्यकलेचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळे बांधकाम देखणेसुद्धा केलेले आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशू कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे केलेले आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागांतून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठय़ा कुंडात पडतात. कुंड तरी किती मोठे… 30 फूट लांबी-रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱया केलेल्या आहेत. स्वच्छ आणि नितळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱया कुंडात जाते आणि ते कुंड भरले की, तिथून पुढे एका ओढय़ाला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.

सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱयाच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर बांधलेले आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. पूर्वेकडे सह्याद्रीची मुख्य रांग आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वेकरून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर सुंदर आहे.

कर्णराजाच्या पदरी असलेल्या कविराज शेषाने ‘संगमेश्वर माहात्म्य’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात तो संगमेश्वर परिसराचे माहात्म्य आणि तिथल्या ठिकाणांचे वर्णन करतो. त्यात त्याने सप्तेश्वराचा उल्लेख केलेला आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर निर्माण केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा.

– [email protected]