
>> अभय मोकाशी
देशभक्ती आणि राष्ट्रवाद या संकल्पना समानार्थी वापरल्या जात असल्या तरी स्वतंत्र आहेत. अनेकदा त्यांची गल्लत केली जाते. तसेच राष्ट्रवादाचा वापर राजकीय लाभासाठी केला जातो. जगातील अनेक देशांत अशा प्रकारचे नेते झाले आहेत आणि त्यांच्या ‘राष्ट्रवादी’ राजकारणाला प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी खतपाणी घातले आहे. याचेही जगात अनेक दाखले देता येतील. विशेषतः अमेरिकेत विविध काळात अशा पद्धतीने माध्यमांचा वापर केला गेला आहे.
जगातील अनेक देशांत राष्ट्रवाद उफाळून आला आहे आणि त्यामुळे युद्ध आणि हिंसा यात वाढ झाली आहे. देशभक्ती आणि राष्ट्रवाद यात खूप अंतर आहे, तरीदेखील या दोन शब्दांत अनेकदा गफलत केली जाते.
देशभक्ती म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी तयार असणे आणि आपल्या देशाची प्रगती होण्यासाठी योगदान करणे. आपला देश श्रेष्ठ आहे आणि दुसऱया देशावर आक्रमण करणे याला राष्ट्रवाद म्हणतात. राष्ट्रवाद देशाला युद्ध आणि साम्राज्यवादाकडे नेत असतो आणि साधारणपणे राजकीय मंडळी राष्ट्रवादाचा वापर देशाचे नेतृत्व मिळविण्यासाठी करतात. कट्टर राष्ट्रवाद समाजातल्या विविध घटकांमध्येदेखील वैमनस्य निर्माण करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा राष्ट्रवादाला विरोध केला होता. अनेकदा अशा राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते देशातील समस्यांचा दोष देशातील एखाद्या घटकाला अथवा दुसऱया देशाला देतात. अशा प्रकारचे नेते अनेक देशांत दिसून आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या बिकट आर्थिक परिस्थितीबाबत शेजारी देश मेक्सिकोला तसेच त्या देशातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या लोकांना दोष दिला. ट्रम्प यांच्या या प्रचारामुळे उफाळून आलेल्या राष्ट्रवादाने ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आले.
हिटलरने जर्मनीतील ढासळत्या आर्थिक परिस्थितीचे खापर यहुदी लोकांवर फोडले आणि जर्मनीतील नागरिकांमध्ये कट्टर राष्ट्रवाद जागृत केला. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेकी हल्ला झाल्यावर दोन दिवसांतच अनेक विचारवंतांनी त्या हल्ल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. उदाहरणार्थ, जर आग त्या इमारतींच्या वरच्या मजल्यांना लागली होती, तर त्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कशा पडल्या, पेंटॅगॉनवर पडलेल्या विमानाचे अवशेष का दिसत नाहीत आणि ट्विन टॉवरच्या शेजारची इमारत कशी नष्ट झाली असे अनेक प्रश्न मांडले. मात्र प्रश्न विचारणाऱया लोकांच्या देशभक्तीबद्दल शंका घेतली गेली नाही. कारण अमेरिकेत राष्ट्रवादी लोकांचे वर्चस्व नाही. त्या देशाचे नागरिक लोकशाहीवर विश्वास ठेवतात.
अमेरिकेच्या इतिहासात विविध काळात प्रसारमाध्यमांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. अमेरिकेतील विचारवंत नॉम चॉमस्की यांनी आपल्या संशोधनातून हे दाखवून देले की, प्रसारमाध्यमे बलाढय उद्योगधंद्यांच्या हातात आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून प्रसारमाध्यमे ठरवितात, अमेरिकेने 1961साली व्हिएतनामवर आक्रमण केले आणि एक दशकाहून अधिक काळ चाललेल्या युद्धाचे समर्थन माध्यमांनी केले आणि अमेरिका योग्यच करत आहे असे दाखवून जनमत सरकारने आपल्या बाजूने करून घेतले. अमेरिकेतील प्रमुख प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वातानुकूलित कक्षात बीअर पाजून व्हिएतनामच्या युद्धाच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या आणि पत्रकारांनी त्यांची सत्यता न तपासता त्या चित्रफितींच्या आधारे आपापल्या वृत्तपत्रांत बातम्या छापल्या. त्यामुळे अमेरिकेत सरकारच्या बाजूने जनमत तयार झाले. अमेरिकेने व्हिएतनामच्या भल्यासाठी त्या देशात आपले सैन्य पाठविले असे जनमत झाले आणि कोणीही त्या कृत्याला अमेरिकेचे आक्रमण म्हटले नाही. कारण माध्यमांनी तसे मत मांडले नव्हते. मात्र काही वर्षांनी अमेरिकेने व्हिएतनाममध्ये केलेल्या युद्धाचे आणि अमेरिकेने केलेल्या अत्याचारांचे सत्य बाहेर आले.
नॉम चॉम्स्की यांनी आपले पुस्तक ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट’ यात व्हिएतनाम सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा उल्लेख केला आहे, त्याप्रमाणे अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात 30 लाख लोक मारले गेले, तर तीन लाख लोक बेपत्ता घोषित करण्यात आले. त्याचबरोबर 44 लाख लोक जखमी झाले आणि 20 लाख लोकांना अमेरिकेने केलेल्या रासायनिक हल्ल्यात बाधा झाली. या युद्धात अमेरिकेचे 58 हजार सैनिक मारले गेले. हे सत्य बाहेर आल्यावर अमेरिकेत जनमत बदलले. मात्र तोपर्यंत अनेक सरकारे बदलली होती.
प्रत्येक वेळी माध्यमे सरकारच्या बाजूने उभे राहतातच असे नाही. आपले कर्तव्य उत्तमपणे बजावणाऱया पत्रकारांनी आणि त्यांच्या माध्यम संस्थांनी सरकारच्या कृतीवर अथवा सरकारने पुरविलेल्या माहितीवर प्रश्न उपस्थित केल्याची उदाहरणे आहेत. त्यातील एक म्हणजे ब्रिटनने 1982 साली फॉकलंड बेटावर केलेले आक्रमण. ब्रिटनच्या कृत्यावर बीबीसीने टीका केली आणि त्यावर चिडलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी बीबीसी देशद्रोही असल्याचे म्हटले, पण बीबीसीने आपण आपले कर्तव्य बजावत असल्याचे सांगितले.
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने त्या अतिरेकी हल्ल्यांमागे अफगाणिस्तान असल्याचा दावा केला आणि अफगाणिस्तानवर हल्ले केले. त्यावेळीदेखील माध्यमांनी सरकारला प्रश्न विचारले नाहीत आणि जनमत सरकारच्या बाजूने तयार करण्यात खूप मोठी भूमिका बजावली, पण सत्य शोधण्याचे आपले कर्तव्य बजावले नाही. काही वर्षांनी खरी माहिती समोर आली की, अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यात एकही अफगाणी नागरिक नव्हता. अमेरिकेने इराकच्या बाबतीत असेच केले. इराककडे रासायनिक हत्यारे आहेत असा दावा केला आणि अमेरिकेच्या माध्यमांना तशी माहिती पुरविली. पुरावे न मागता त्या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यानंतर तयार झालेल्या जनमताचा फायदा घेऊन अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना पदभ्रष्ट केले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या समितीने पाहणी केली असता सत्य समोर आले की, इराककडे रासायनिक हत्यारे नव्हती, पण तोवर उशीर झाला होता आणि अमेरिकेच्या सरकारने आपले उद्दिष्ट साध्य केले होते.
प्रसारमाध्यमे जर खंबीर असतील तर पत्रकार सरकारला प्रश्न विचारू शकतात आणि सरकारच्या खोटय़ा प्रसारावर अंकुश ठेवला जाऊ शकतो. मात्र प्रसारमाध्यमे कमकुवत असल्यास ती आपले कर्तव्य पार पाडत नाहीत. राष्ट्रवादी जनतेने जर सरकारतर्फे येणाऱया माहितीवर विचार केला तर सत्य काय आणि खोटे काय हे समोर येईल हे अमेरिकेच्या इतिहासावरून दिसून येते.
राष्ट्रवादासंदर्भात दोन थोर व्यक्तींची मतं विचार करायला लावणारी आहेत. जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की, राष्ट्रवाद म्हणजे बाल्यावस्था आहे, तो एक प्रकारचा गोवर आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आपल्या ‘राष्ट्रवाद’ या निबंधात लिहितात, आपले राष्ट्रवादी लोक जेव्हा आदर्शाबद्दल बोलतात, तेव्हा ते विसरतात की, राष्ट्रवादाची तत्त्वं कमी पडतात. जी माणसे या आदर्शांबद्दल बोलतात तेच सामाजिक रीतींच्या बाबतीत पुराणमतवादी असतात. टागोरांचे विचार जगाला विचार करायला लावणारे आहेत. मात्र आपल्या देशात त्यांना देशद्रोही ठरविले जाऊ शकते!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)


























































