ग्रंथयात्रा – दमयंती स्वयंवर

>> अर्चना मिरजकर

कवी रघुनाथ पंडित यांचा ‘दमयंती स्वयंवर’ हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील पहिल्या वळणावरचा टप्पा. नळ-दमयंतीची कथा मुळात महाभारतात येते. पुढे बाराव्या शतकात प्रसिद्ध संस्कृत कवी श्रीहर्ष यांनी या कथेवर आधारित ‘नैषधीय काव्य’ लिहिलं. हेच काव्य डोळय़ासमोर ठेवून आणि स्वतःची कल्पकता वापरून रघुनाथ पंडितांनी ‘दमयंती स्वयंवर’ या काव्याची रचना केली.

सतराव्या शतकातील कवी रघुनाथ पंडित यांचा ‘दमयंती स्वयंवर’ हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील पहिल्या वळणावरचा टप्पा आहे. यापूर्वीचं साहित्य हे मुख्यतः आध्यात्मिक स्वरूपाचं होतं, परंतु रघुनाथ पंडितांचं काव्य हे केवळ कलाविलास करण्यासाठी, वाचकांचं रंजन करण्यासाठी म्हणून लिहिलेलं मराठीतील पहिलं काव्य आहे. शिवाय ही मराठीतील पहिली प्रेमकथा आहे.
रघुनाथ पंडित रामदास स्वामींच्या समकालीन होते. काही अभ्यासकांच्या मते, ते शिवाजी महाराजांच्या दरबारातील पंडितांपैकी एक होते.
नळ-दमयंतीची कथा मुळात महाभारतात येते. पुढे बाराव्या शतकात प्रसिद्ध संस्कृत कवी श्रीहर्ष यांनी या कथेवर आधारित ‘नैषधीय काव्य’ लिहिलं. हेच काव्य डोळय़ासमोर ठेवून आणि स्वतःची कल्पकता वापरून रघुनाथ पंडितांनी ‘दमयंती स्वयंवर’ या काव्याची रचना केली.
काव्याची सुरुवात राजा नळाच्या वर्णनाने होते.

‘पुण्यश्लोक नृपावलीत पहिला होवोनि जो राहिला
तो राजा असता समस्त महिला विश्रांति शेषाहिला
व्यासोत्ते अवगाहिला बुधगणी नानागुणी गायिला
जो नामे नळ तत्कथौघ लिहिला जो पाहिजे पाहिला’

पुण्यशील राजांच्या पंक्तीत ज्याचा पहिला क्रमांक लागेल, जो राजा असताना पापांचा भार कमी झाल्याने पृथ्वी आणि तिला मस्तकावर धारण करणारा शेष नाग यांना विश्रांती मिळाली. व्यासांनादेखील ज्याचे गुण गाण्याचा मोह आवरला नाही आणि अनेक बुद्धिवान लोकांनी ज्याची स्तुती केली आहे असा हा नळराजा. तो पराक्रमी तर इतका की,

‘कदा नेणो वोढी शरधितुनी
काढी शर कदा
कदा धन्वी जोडी वरिवरिही
सोडी तरि कदा
विपक्षाच्या वक्षावरि
विवरलक्षास्तव रणी
कळे राजेंद्राची त्वरित शरसंधानकरणी’

तो केव्हा धनुष्य ओढून, भात्यातून बाण काढून कधी तो धनुष्याला जोडतो आणि कधी वरच्यावर तो बाण सोडतो हेदेखील समजत नाही. शत्रूच्या छातीवर त्याच्या बाणांमुळे झालेल्या जखमांवरूनच त्याचे धनुर्विद्येतील काwशल्य समजते.
नळराजाच्या राज्यातील काही ब्राह्मण एकदा विदर्भ देशात पोचतात आणि तिथल्या भीम राजाच्या पुढे राजा नळाची स्तुती करतात.
‘जो धैर्ये धरसा सहस्त्र्ा करसा तेजे तमा दूरसा
जो रत्नाकरसा गभीर, शिरसा भूपा, यशे हारसा
ज्ञाता तो सरसावलाच सरसामाझारी शृंगारसा
शोभे तामरसाक्ष तो नळ रसानाथ स्तवू फारसा
जो पृथ्वीसारखा धैर्यवान, आपल्या सहस्त्र्ा किरणांनी अंधार’ दूर करणाऱया सूर्यासारखा तेजस्वी, समुद्रासारखा खोल, ज्याप्रमाणे सर्व रसांत शृंगार रस अग्रणी असतो तसा सर्व राजांमध्ये श्रेष्ठ, ज्ञानी आणि ज्याचे व्यक्तिमत्त्व सोन्यासारखे लखलखीत आहे, असा नळराजा.
ही स्तुती ऐकून विदर्भ देशाची लावण्यवती राजकन्या दमयंतीच्या मनात नळाविषयी कुतुहल निर्माण होते.
इकडे गुप्तहेर हा सर्व वृत्तांत नळराजाला येऊन सांगतात आणि विदर्भाच्या राजकन्येने तुमच्या विषयीची कशी उत्सुकता दाखवली हेदेखील सांगतात. आता नळाला तिच्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. मन रमवायला तो वनात विहार करायला जातो.
त्या उपवनातील तलावात राजहंसांचा एक थवा विहार करत असतो. त्यातील एका झोपलेल्या हंसाचं हुबेहूबपणे वर्णन करताना कवी म्हणतात…

‘तेथील एक कल हंस तटी निजेला
जो भागला जलविहार विशेष केला
पोटीच एक पद, लांबविला दुजा तो
पक्षी तनु लपवी, भूप तया पाहतो’

त्याला बघून राजा हळूच हात पुढे करून पायाला धरून तो हंस पकडतो. हंस सुटायची धडपड करतो, पण राजाची पकड घट्ट असते. तो हंस राजाशी मनुष्य वाणीत बोलू लागतो आणि राजा त्याला सोडून देतो. राजाच्या दयेची परतफेड म्हणून तो हंस नळाचा दूत बनून दमयंतीकडे जायचे ठरवतो.
उड्डाण करून तो विदर्भ देशाच्या पुंडिनपूर या राजधानीस येतो. गोपुरे असलेला राजवाडा, उंच दालने, आल्हाददायक वारा येण्यासाठी केलेले गवाक्ष, उंच माडय़ांनी सुशोभित श्रीमंतांची अनेक घरे असलेली विशाल नगरी असे पुंडिनपुराचे वर्णन रघुनाथ पंडित करतात. तिथे एका उद्यानात हंसाला दमयंती दिसते. आजूबाजूला कोणी नाही असे पाहून तो तिच्याशी मनुष्य वाणीने बोलू लागतो, तेव्हा आश्चर्याने दमयंती त्याला विचारते…

‘कोण तू गा कोठील कवणियाचा
कसा झाला तव देह सोनियाचा
कशी आली तूज ही मनुजवाचा
काय भाग्योदय सांगू या वनाचा’

मग हंस आपण नळराजाचा सेवक आहोत हे तिला सांगून त्याचे गुणवर्णन करतो. ते ऐकून दमयंती आपण नळालाच पती म्हणून वरले आहे अशी कबुली देते. तो निरोप घेऊन हंस नळाकडे परत येतो. हंसाचे व्यक्तिचित्रण कवीने इतक्या समरसतेने केले आहे की, नायक आणि नायिकेपेक्षाही हंसाचे व्यक्तिचित्रण सरस झाले आहे.
इकडे नळराजाच्या विरहाने दमयंती मूर्च्छित होते.

‘गजबज बहु झाली माय धावोनि आली
धरूनि हृदय-देशी तीजला सेज केली
करिति विझणवारे त्या सख्या वेगळाल्या
वडिल वडिल दाया जाणत्याही मिळाल्या
ते शीतलोपचारी जागी झाली हळूच मग बोले
औषध न लगे मजला परिसुनि
जननी बरे म्हणोनि डोले’

तिच्या उत्तरातील दोन्ही अर्थ उमजून राणी दमयंतीसाठी वर शोधायला हवा असे राजाला सांगते. त्यानुसार विदर्भ देशाचा राजा दमयंतीचे स्वयंवर आयोजित करतो. नळराजालाही निमंत्रण पोचते आणि तो स्वयंवराला जाण्याची तयारी करतो, पण स्वयंवरात राजा नळाचे प्रतिस्पर्धी म्हणून साक्षात स्वर्गातील देव अवतरतात. एवढेच नव्हे तर ते नळालाच आपला दूत म्हणून दमयंतीकडे पाठवतात.
यातून उद्भवलेला नाटय़मय प्रसंग, त्यामुळे दिसून आलेले दमयंतीचे चातुर्य यांचे वर्णन अत्यंत वाचनीय आहे. शेवटी दमयंतीचा वर म्हणून कोण विजयी होते हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा रघुनाथ पंडितांचे ‘दमयंती स्वयंवर.’
[email protected]

ब्लर्ब

‘दमयंती स्वयंवर’ या काव्याचे साहित्यिक गुण समीक्षक प्रोफेसर निशिकांत मिरजकर यांच्याकडून ऐकण्यासाठी पाहा

‘ग्रंथयात्रा भाग 8 – दमयंती स्वयंवर’ YouTube/@Granthyatra