अभिप्राय- नेहरूः योग्य-अयोग्य

18

>>अरविंद दोडे

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनचरित्र सर्वांना ठाऊक आहे. ते एक डेरेदार, मोठय़ा वटवृक्षासारखे होते. म्हणूनच त्यांच्या सावलीत वावरणारी नेतेमंडळी मोठी होऊ शकली नाहीत हा इतिहास नव्याने बाहेर येत आहे. सत्ता आणि संपत्ती यावर या देशात अनेक राजकारणी अपात्र असूनही वर्षानुवर्षे टिकून राहिले. नेहरूंचे स्वातंत्र्य युद्धातील योगदान हा अर्थातच यादृष्टीने वादाचा विषय आहे. त्यांना कर्तबगारीशिवाय सत्तेत मोठी भागीदारी मिळाली. पंतप्रधानपदाबाबतची त्यांची (अ)योग्यता, फाळणी, कश्मीर प्रश्न, चीनशी युद्ध, तिबेटमध्ये पराभव, हिंदी राष्ट्रभाषेचा अपमान, आसाममधील अत्याचार, सर्वधर्मसमभावाचा नारा घुमवत मुस्लिमधार्जिणे धोरण अशा असंख्य घोडचुकांनी लोकशाहीची केलेली होळी, सतत ‘झटपट’च्या योजना कार्यांमुळे वाया गेलेली हुशारी आणि परराष्ट्रीय धोरणात नेहमीच उडालेला फज्जा! ही यादी आणखी वाढू शकते.

नेहरूंच्या दिग्गज समकालीनांसारखा किंबहुना अधिकच प्रतिमा पूजनाचा प्रकार वाढला, परंतु सरदार पटेलांप्रमाणे त्यांचे संघटन कौशल्य होते का? राजगोपालाचारींप्रमाणे दूरदृष्टी होती का? असे अनेक प्रश्न लेखकाने उपस्थित केले असून त्यांची उत्तरे पुराव्यांसह दिलेली आहेत. मग नेत्याने महात्माजींचा ‘आध्यात्मिक सुपुत्र’ होण्यापर्यंत मजल मारली कशी? गांधींना खूश ठेवणे, नाइलाजाने जुळवून घेणे. सुभाषबाबू हे स्वतंत्र विचारांचे निर्भय नेते होते. गांधींना त्यांच्याकडून दिलासा मिळणे शक्य नव्हते. नेहरू हे गांधींना जवळचे वाटणे स्वाभाविक होते. गांधींच्या सावलीत राहणे नेहरूंना आवश्यक होते.

मीनू मसानी यांनी म्हटले आहे, ‘नेहरूंच्या ऐवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर हिंदुस्थानची प्रगती अधिक वेगाने झाली असती.’ म्हणूनच नेहरूंना सत्तेत पटेलांची भागीदारी नको होती, परंतु पटेल हे गांधीजींशी नम्रपणे निष्ठा ठेवून असल्याने विरोध केला नाही. पटेल निवर्तले आणि नेहरू देशाचे, काँग्रेसचे ‘सब कुछ’ झाले. नंतरची ‘नेहरू गीता’ काँग्रेसने सत्ता टिकविण्यासाठी सर्वत्र गायिली जाऊ लागली. ‘राजा बोले, दल हले’ असा एकछत्री कारभार सुरू झाला, तो त्यांच्या मृत्यूपर्यंत…. 27 मे 1964 पर्यंत. अर्थात पुढे इंदिराजी म्हणजे त्यांनी ‘सुधारून वाढविलेली आवृत्ती’ असल्याचे सिद्ध झाले.

प्रस्तुत पुस्तकात अनेक धक्कादायक संदर्भ वाचकास नवलाचे वाटू शकतात. लेखकाने सुमारे 25 पेक्षा अधिक वजनदार गंथांतून ते शोधले आहेत. ‘शांतिदूत’ म्हणून त्यांना मिळालेली उपाधी कशी भंपक आहे, परराष्ट्रीय धोरणात ते कसे तोंडघशी पडले होते, 17 वर्षे पंतप्रधान म्हणून काय केले (अन् काय नाही केले) हे बघणे एक अभ्यास म्हणून सुजाण नागरिकांस आवश्यक आहे. नेहरूभक्त डोळस असतील तर यातून खूप काही शिकतील असा विश्वास वाटतो. सत्तेच्या आधी आणि सत्ता मिळाल्यावर असे दोन भाग नेहरूंच्या चरित्राचे केले तर खूप तफावत आढळते, ती सप्रमाण दाखवून देण्याचे काम लेखकाने परिश्रमपूर्वक केले आहे. हिंदू असून (केवळ मतांसाठी!) नेहरूंच्या राजकीय बुद्धीचा अभाव, हटवादीपणा आणि अहंकार या दुर्गुणांची उजळणी वाचनीय आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान – काही मुद्दे
लेखक – प्रा. यशवंत भावे
प्रकाशन – परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे
पृष्ठ – 132, मूल्य – 200 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या