
>> भगवान परळीकर
‘मार्मिक’च्या सुरुवातीच्या अंकापासून सातत्याने व्यंगचित्रे रेखाटणाऱया राजेंद्र गोविंद गायकवाड सरांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सोलापूर जिह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगाव येथील शेतकरी कुटुंबात 1941 साली जन्मलेल्या राजेंद्र गायकवाड यांचे शिक्षण वैराग येथील विद्यामंदिरामधून झाले. जुन्या मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ ऑर्टमधून ए. एम. (आर्ट मास्टर) ही पदवी संपादन केली. त्या काळी ही पदवी संपादन करणारे राजेंद्र गायकवाड हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षीच वैराग येथील विद्यामंदिर या शिक्षण संस्थेत कला शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. कला शिक्षक म्हणून काम करीत असतानाच राजेंद्र गायकवाड यांचे हात साहजिकच व्यंगचित्राकडे वळले. त्या काळी वाचकप्रिय असलेल्या ‘माणूस’ या मासिकातून राजेंद्र गायकवाड सर यांनी आपली व्यंगचित्रे प्रसिद्धीस देण्यास सुरुवात केली. पुढे साप्ताहिक ‘मार्मिक’, दैनिक ‘सामना’ तसेच महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिकातून त्यांची विविध विषयांवरील व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा वारसा असणाऱया राजेंद्र गायकवाड यांनी स्वभावातील परखडपणा व्यंगचित्रांतून उतरवताना कधीच कसूर केली नाही. परिणामी कित्येकदा त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. बॅ. ए. आर. अंतुले, कै. वसंतदादा पाटील, शिवराज पाटील चाकुरकर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक राजकीय मान्यवरांना आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकारणारे राजेंद्र गायकवाड सर हे प्रसिद्धीपासून काहीसे लांबच होते. गायकवाड सरांची व्यंगचित्रे जेवढी बोलकी होती तेवढेच हस्ताक्षरही सुबक आणि वळणदार होते. शिवसेना-भाजप युतीच्या काळात वैराग येथे झालेल्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी राजेंद्र गायकवाड सरांच्या ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालनाचे कौतुक केले होते. गायकवाड सर हे केवळ व्यंगचित्रकार नव्हते तर रंगकर्मी, व्याख्याते, सूत्रसंचालक म्हणूनही परिचित होते. सोलापूर येथील हिमगौरी नाटय़ मंडळी या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नाटकांत ते भूमिका करायचे. सांगली येथे झालेल्या राज्य नाटय़ स्पर्धेत ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील सदू गवळी या भूमिकेस त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. वैरागच्या विद्यामंदिर शिक्षण संस्थेसाठी गायकवाड सरांनी सलग 15 नाटके सादर केली. व्यंगचित्र आणि नाटय़कलेबरोबरच राजेंद्र गायकवाड हे व्याख्याते म्हणून सुपरिचित होते. छत्रपती शाहू महाराजांवर त्यांनी सलग दहा वर्षे महाराष्ट्रभर व्याख्याने दिली. त्याची दखल घेऊन कोल्हापूरच्या छत्रपतींनी कोल्हापुरात गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. आयुष्यभर साधेपणाने जीवन व्यतित करणाऱया सरांचा शिष्य परिवार मोठा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. वैद्यकीय उपचार सुरू असतानाही व्यंगचित्रांचा ध्यास मनात कायमचा ठसलेला होता. त्यामुळे ते मला ‘मार्मिक’ आणून द्या, ‘सामना’ आणून द्या असा सारखा आग्रह वैद्यकीय उपचार सुरू असतानादेखील नातेवाईकांकडे करीत होते. व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजमन ढवळून काढणारे मोजकेच व्यंगचित्रकार महाराष्ट्राला ठाऊक आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राजेंद्र गायकवाड सर होते.































































