लेख – चीनचा हेरगिरी बलून : जगाला संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन n [email protected]

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटी ब्लिंकेन या आठवड्यात बीजिंगला जाणार होते. मात्र अमेरिकेभोवती अनेक दिवस फिरणाऱया एका गुप्तहेर बलूनमुळे ती भेट रद्द झाली. चीनने या गुप्तचर फुग्याद्वारे संदेश दिला आहे की, तो अमेरिकेच्या आतपर्यंत हेरगिरी करू शकतो. अमेरिकेच्या मागे नाही, असे चीन दाखवू इच्छितो. त्यामुळे देशात राष्ट्रपती शी जिनपिंग यांची लोकांमध्ये पत वाढेल. अशाच प्रकारची हेरगिरी चीन हिंदुस्थानवर करू शकतो, म्हणून हिंदुस्थानने असे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे.

उत्तर अमेरिकेतील मोंटाना राज्याच्या आकाशात एक पांढरी वस्तू दिसली. ही वस्तू काय, याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला ‘उडत्या तबकडी’चा सिद्धांत पुढे आला. लोकांनी त्याची छायाचित्रे काढली आणि समाजमाध्यमांवर टाकली. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना या वस्तूची माहिती मिळाली. नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड या गुप्तचर फुग्यावर सतत नजर ठेवून होती. 28 जानेवारीला हा बलून यूएस एअर झोनमध्ये प्रवेश करताना दिसला होता. यानंतर तो मोंटाना परिसरात उडताना आढळून आला. हे अमेरिकेचे आण्विक क्षेपणास्त्र्ा क्षेत्र आहे. हे बलून हेरगिरी करत असल्याचा लष्कराला संशय होता. येथील माहिती चीनला पाठवली जात होती. हा बलून उत्तर अमेरिकेतील संवेदनशील लष्करी भागांवर पाळत ठेवत होता. त्यामुळे कॅरोलिना किनाऱयावर पोचल्यावर चिनी बलूनला फायटर जेट पाठवून अमेरिकन लष्कराने नष्ट केले.

आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, हा फुगा प्रत्यक्षात नागरी हवाई जहाज आहे, या फुग्याचे काम हवामान संशोधनाशी संबंधित आहे. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे तो आपल्या ठरलेल्या मार्गापासून दूर गेला. या आरोपाचा बीजिंगकडून इन्कार करण्यात आला आहे. नियंत्रण सुटल्यामुळे बलून भरकटला आणि मोंटानाच्या आकाशात पोहोचला असा दावा करत चीनने झाल्या प्रकाराबाबत अमेरिकेची माफी मागितली आहे. मात्र जर हे नागरी बलून होते तर ते 6 हजार किलोमीटर दूर मोंटानापर्यंत कसे आणि का पोहोचले, हा प्रश्न उरतोच. त्यामुळे ते अमेरिकेत हेरगिरीसाठी पाठवण्यात आले होते, हेच स्पष्ट होते.

हेरगिरी करणारे फुगे

हेरगिरी करणारे म्हणजेच गुप्तचर फुगे हा हेरगिरीच्या उपकरणांचा एक प्रकार आहे. हेरगिरी करणारा कॅमेरा हा निर्धारित क्षेत्राच्या वर तरंगणाऱया फुग्याच्या खाली लावलेला असतो, वाऱयाच्या प्रवाहाने हा फुगा वाहून नेला जातो. फुग्यांशी जोडलेल्या उपकरणांमध्ये रडारचा समावेश असतो आणि ते सौर ऊर्जेवर चालतात. फुगे सामान्यतः 24 हजार मीटर – 37 हजार मीटर वर उडतात. नियमित विमाने 12 हजार मीटरहून अधिक उंचीवरून उडतात.

1860 च्या दशकात अमेरिकन गृहयुद्धादरम्यान गुप्तचर फुगे वापरले गेले होते. गरम हवेच्या फुग्यांना लावलेल्या दुर्बिणीने माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यासाठी त्यांनी मोर्स कोड वापरला होता. तसेच ‘दगडाला बांधलेला कागदाचा तुकडा’ वापरून सिग्नल परत पाठवले जात होते. 18व्या शतकात फ्रेंच राज्यक्रांतीवेळी फुग्यातून टेहळणी करण्यात आली. त्यानंतर पहिले महायुद्ध यांसह अनेक लढायांमध्ये टेहळणीसाठी या फुग्यांचा वापर झाला आहे. दुसऱया महायुद्धात तंत्रज्ञान अधिक प्रगत झाल्यानंतर जपानने या फुग्यांच्या माध्यमातून चक्क अमेरिकेवर स्फोटके सोडली. यातील काही नागरिकांचा मृत्यूही झाला.

शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियनने अशा फुग्यांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला होता. अलीकडे अमेरिकेने या कल्पनेला पुनरुज्जीवित केले आहे, पण केवळ अमेरिकेच्याच भूभागावर फुगे वापरले जात होते. आपल्याला अन्य देशांच्या हवाई हद्दीत असे फुगे उडवण्यासाठी परवानगी आवश्यक असते.

उपग्रहांऐवजी गुप्तचर फुगे

अमेरिका, चीन दोघांकडे अनेक उपग्रह आहेत, जे आधीपासूनच पूर्ण माहिती गोळा करत आहेत.2000 नंतर अमेरिकेत चीनकडून हेरगिरीच्या 160 घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून उपग्रह वापरणे हे अनेक प्रश्नांचे उत्तर होते, परंतु आता उपग्रहांना लक्ष्य करण्यासाठी लेझर व समान शस्त्र्ाांचा शोध लावला जात होता. फुग्यांबद्दल संशय येण्याचे प्रमाण कमी असते. ते उपग्रहांप्रमाणेच सातत्यपूर्ण पाळत ठेवत नाहीत, परंतु त्यांच्या माध्यमातून माहितीची पुनर्प्राप्ती करणे सोपे असते. शिवाय हे प्रक्षेपण उपग्रहाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. अवकाशात उपग्रह पाठवण्यासाठी स्पेस लाँचरची आवश्यकता असते. लाखो डॉलर्स खर्च असतो. फुगे कमी उंचीवरून अधिक प्रदेश स्कॅन करू शकतात आणि दिलेल्या क्षेत्रावर अधिक वेळ घालवू शकतात. कारण ते उपग्रहांपेक्षा अधिक हळू हलतात. मात्र अलीकडच्या काळात कृत्रिम उपग्रह, अतिशय उंचावरून उडणारी विमाने आणि मुख्य म्हणजे ड्रोन तंत्रज्ञानामुळे या फुग्यांचा युद्धनीतीमधील वापर कमी झाला आहे. हे फुगे विमान किंवा ड्रोनप्रमाणे प्रत्यक्षात ‘चालवता’ येत नाहीत. त्यांची उंची कमी-जास्त करून हवेच्या योग्य प्रवाहात आणून त्यांना विविक्षित स्थळी न्यावे लागते. अर्थात त्यांचा फायदा असा की, वेगाने जाणाऱया उपग्रहांपेक्षा कमी उंचीवर असल्यामुळे अधिक चांगली छायाचित्रे या फुग्यांमधून मिळू शकतात आणि मुख्य म्हणजे उपग्रहांपेक्षा यांचा खर्च प्रचंड कमी असतो.

तैवानची स्वायत्तता, दक्षिण चीन समुद्रातील चीनचे आक्रमक धोरण, कोरोनाच्या उगमस्थानावर निर्माण झालेला वाद, पश्चिम चीनमधील झिनझिआंग प्रांतातील मानवाधिकारांचे उल्लंघन आणि हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळी दडपण्याचा प्रयत्न यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध आधीच ताणले गेले आहेत. युक्रेन युद्धात चीन रशियाची बाजू घेत आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटी ब्लिंकेन या आठवडय़ात बीजिंगला जाणार होते. मात्र अमेरिकेभोवती अनेक दिवस फिरणाऱया एका गुप्तहेर बलूनमुळे ती भेट रद्द झाली. फुगा प्रकरणाच्या काही महिने आधी चिनी मुत्सद्दय़ांनी अमेरिकेविरोधात आक्रमक वक्तव्य करणे बंद केले होते. चीनच्या राजनैतिक संदेशातून जाणवत होते की, त्यांना अमेरिकेसोबतचा तणाव कमी करायचा आहे, पण फुग्याची घटना या संकेतांपासून एकदम विपरीत आहे. त्यामुळे चीनच्या समन्वयावरही प्रश्न निर्माण होत आहे. चीनने या गुप्तचर फुग्याद्वारे संदेश दिला आहे की, तो अमेरिकेच्या आतपर्यंत हेरगिरी करू शकतो. अमेरिकेच्या मागे नाही, असे चीन दाखवू इच्छितो. त्यामुळे देशात राष्ट्रपती शी जिनपिंग यांची लोकांमध्ये पत वाढेल. अशाच प्रकारची हेरगिरी चीन हिंदुस्थानवर करू शकतो, म्हणून हिंदुस्थानने असे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे.