
>> चंद्रसेन टिळेकर
वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, अंधश्रद्धा या विषयांवर उमलत्या पिढीसमोर बोलताना खूप तारतम्य बाळगावे लागते. देव, ईश्वर, त्यांचे अस्तित्व या संकल्पना नेमक्या काय आहेत याचा उलगडा नेमकेपणाने त्यांच्यासमोर केल्यास त्यांची याबाबतची दृष्टी अधिक सजग होईल आणि यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत.
काही वर्षांपूर्वी जळगावच्या एका व्याख्यानमालेत व्याख्यानासाठी गेलो होतो. ही संधी साधून तिथल्या एका महाविद्यालयानेही व्याख्यानाचे निमंत्रण दिले. परतायची घाई नसल्याने मी ते स्वीकारले. व्याख्यान विद्यार्थ्यांच्या समोर करायचे असल्याने ‘प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन’ असा विषय घेण्याचे ठरले. वर्ग कला शाखेचा असल्याने अर्थातच मुलींची संख्या जास्त होती. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, अंधश्रद्धा या विषयांवर उमलत्या पिढीसमोर बोलताना खूप तारतम्य बाळगावे लागते. एकदम देव, ईश्वर, त्यांचे अस्तित्व यावर घाला घालून चालत नाही. त्यामुळे अत्यंत सूचकपणे तो विषय मांडून तुम्ही स्वतःच या विषयांचा अधिक अभ्यास करून निर्णय घ्या, असे सांगावे लागते. अशा भाषणात मी युरोपियन संस्कृतीत वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे तिथे सर्व क्षेत्रांत जे आमूलाग्र बदल झाले आणि अंतिमतः प्रबोधनयुग सुरू होऊन मानवजात अधिक सुखी झाली,
भाषण संपल्यावर शेवटी देवाच्या अस्तित्वावर मुलांनी प्रश्न विचारलेच. मी ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेत संदिग्धपणे उत्तर देऊन सुटका करून घेतली. जगात देव नाही असे स्पष्टपणे सांगितले की, विद्यार्थ्यांपेक्षा अध्यापक वर्गालाच जास्त राग येतो असा माझा अनुभव आहे. भाषणानंतर लॉजवर आलो. संध्याकाळी अनपेक्षितपणे व्याख्यानमालेचे एक पदाधिकारी आले आणि म्हणाले, ‘‘आता काही प्रोग्राम ठरलाय का तुमचा?’’ ‘‘नाही बुवा, काहो?’’
‘‘मग बरं झालं. आमच्या गावच्या गावदेवीची पालखी निघणार आहे थोडय़ा वेळाने. आमच्या गावकऱ्यांची मोठी श्रद्धा आहे देवीवर. तिच्या कृपेनेच गावात सहसा रोगराई येत नाही, कसली साथही येत नाही. अनायसे या लॉजच्या जवळून जाते ती पालखी, तेव्हा दर्शन घेऊ आणि मग जेवायला जाऊ.’
खरं तर कुठल्याच धार्मिक कार्यात, समारंभात मी फारसा रमत नाही, परंतु त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून अगदी नाइलाजाने मी कबूल झालो आणि पालखी पाहायला त्यांच्यासह रस्त्यावर येऊन उभा राहिलो. थोडय़ाच वेळात पालखी आली. महिला वर्ग मोठय़ा प्रमाणावर सामील झालेला दिसत होता. ढोलताशेवाले जितक्या मोठय़ा कर्कश आवाजात वाजवता येईल तितक्या आवाजात जीव खाऊन वाजवीत होते. विशेष म्हणजे काही तरुण मुलीही डोक्याला भलामोठा फेटा बांधून जिवाच्या आकांताने ढोल चक्क बडवीत होत्या. खरं तर असा पोटाला तासन्तास तरुण मुलींनी ढोल बांधून तो वाजवणे हे त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनात संततीच्या दृष्टीने हानीकारक असते. असा वैद्यकीय अहवालही बाहेर पडलाय, पण त्याची गंधवार्ताही त्यांना नसावी हे उघड होते. ढोलताशांच्या गदारोळामुळे फार काळ तिथे उभे राहणे म्हणजे मोठी शिक्षा होती (परदेशात असताना अशा काही धार्मिक मिरवणुका पाहिल्य, पण ढोल-ताशाच्याऐवजी सुस्वर असे बॅण्ड वादन असते. त्यामुळे ते मुळीच कर्कश वाटत नाही हे विशेष).
बघता बघता मिरवणूक अगदी जवळ आली आणि बघतो तो काय, पंधरा-वीस तरुणी पालखीच्या पुढे भररस्त्यात लोटांगण घालीत चक्क आडव्या झाल्या. रस्ता तर कमालीचा घाण होता, पण त्या मुली भक्तीत तल्लीन झाल्या होत्या. मी थोडे निरखून त्यांच्याकडे पाहिले आणि मला धक्काच बसला. कारण सकाळी कॉलेजमधील ज्या मुलींसमोर मी वैज्ञानिक दृष्टिकोनावर भाषण दिले, त्याच मुली भररस्त्यातल्या घाणीत देवीपुढे लोटांगण घालत होत्या. त्या मुलींनी मला पाहिलं आणि पालखी जरा पुढे जाताच त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ‘‘कशी वाटली मिरवणूक तुम्हाला?’’
‘‘वा, छानच, पण तुम्ही अशा पालखीपुढे आडव्या का झालात?’’
‘‘सर, या देवीचा महिमा फार मोठा आहे! अशी तिची पालखी ज्यांच्या अंगावरून जाते ना, त्यांना वर्षभर कसलेच आजार, रोगराई, काही होत नाही. आतापर्यंत माझी आई न चुकता यायची, पण अलीकडे तिची तब्येत बरी नसते म्हणून मी यायला लागले आहे.’’
आता त्या मुलीच्या बोलण्यातली विसंगती तिला समजणे तसे कठीणच होते. कारण ती देवीच्या भक्तीत रममाण झाली होती आणि एकदा तुम्ही भक्तीत रमलात की, विवेकी विचार तुमच्या मेंदूला शिवूच शकत नाही. अन्यथा नेहमी देवीची पालखी आपल्या अंगावरून जाऊ देणारी आपली आई आजारी कशी पडली याचा विचार तिने केला असता.
मी त्या मुलींना म्हणालो, ‘‘कसलीही आणि कुणावरचीही श्रद्धा डोळस असली पाहिजे, पण तुमची श्रद्धा मला डोळस दिसत नाही. कारण देवीच्या भक्तीत तुम्ही एवढय़ा अंध झाल्या आहात की, ज्या रस्त्यावर तुम्ही आडवे झोपलात तो कमालीचा घाण आहे. असे केल्याने तुम्हाला काही रोग होणार नसतील तर ते होतील एवढे लक्षात घ्या.’’
मुली खाली माना घालून निघून गेल्या, पण माझ्या मनात वेगळेच प्रश्न भेडसावू लागले ते म्हणजे असे की, आपण या मुलींना सकाळी एवढे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व सांगितले, पण मग तरीही या मुली अशा का वागल्या? आपण देवाच्या अस्तित्वाबद्दल जी ‘नरो वा कुंजरो’ अशी पळपुटी भूमिका घेतली ते चुकले की काय? आपण निःसंदिग्धपणे ‘देवाचे अस्तित्व ही निव्वळ कविकल्पना आहे’ असे सांगावयास हवे होते की काय? कारण देव आहे असे म्हटले की, त्याअनुषंगाने अगणित येणाऱया अंधश्रद्धा आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. अशा वेळी हटकून ‘‘परमेश्वराला रिटायर करा’’ म्हणणाऱया डॉ. श्रीराम लागू यांची आठवण येते. यानिमित्ताने एक मात्र सांगावेसे वाटते की, आपण आपल्या भक्तीचे थिल्लर अन् आक्रस्ताळी प्रदर्शन थांबवले पाहिजे. भररस्त्यात लोटांगण घालीत दर्शनाला जाणे, एका पायावर उभे राहणे, स्वतःला जमिनीत गाडून घेणे, उंच काठीवर लटकणे (बगाड) असले प्रकार टाळले पाहिजेत. अनेकदा परदेशी पत्रकार असल्या प्रकारचे चित्रीकरण करून ते त्यांच्या देशात प्रदर्शित करीत असतात हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे.
[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडीत आहेत)