
>> दिलीप जोशी
ज्येष्ठ संगीतकार गजानन वाटवे यांची भेट आणि त्यानिमित्त केलेले ध्वनीमुद्रण याचा हा किस्सा. मोठी माणसं खऱ्या अर्थाने मोठी का असतात याचा प्रत्यय देणारी ही भेट खरोखर अनमोल होती.
गेल्या वेळच्या लेखात पहिल्या ध्वनिमुद्रित भावगीताचे कवी ना. घ. देशपांडे यांची भेट कशी झाली आणि त्या भेटीचे चित्रीकरण कसं करता आलं त्या अचानक घडलेल्या सुखद संवादाविषयी लिहिलं आणि लिहिता लिहिता आठवलं की, याच्याशीच निगडित दोन आठवणी मनाच्या ‘संचिता’मध्ये आहेत. ना.घं.चं ‘रानारानात गेली बाई शीळ’ हे भावगीत ज्यांनी गायलं ते जी. एन. जोशी नंतर मुंबईत आले. आमच्या कॉलेजात एकदा त्यांचं ‘हिंदुस्थानी संगीताचा प्रवास’ यावर एक व्याख्यान झालं. त्यावेळी आम्ही काही मुलांनी त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या होत्या. अगदी सामवेदापासून ते आताच्या (म्हणजे 50 वर्षांपूर्वीच्या) भावगीतांपर्यंत ते अनेक गोष्टींवर बोलले. साधारण 1972 ची ती गोष्ट असेल. पुढे त्यांची भेट होणं तसं कठीणच होतं, पण मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या जयप्रकाश नारायण यांच्या सभेचा वृत्तांत घेण्यासाठी गेलो असताना एक व्यक्ती दिसली. त्यांना ‘कुठेतरी’ पाहिलंय असं वाटत होतं. मग आठवलं की, ते पाच वर्षांपूर्वी भेटलेले जी. एन. जोशी. त्यांच्याशी बोललो. एवढय़ा गर्दीत आपल्याला कोणी ओळखेल अशी त्यांना आणि ते आकस्मिकपणे भेटतील याची मलाही कल्पना नव्हती. काही मान्यवरांच्या भेटीचे असे आकस्मिक योग अनेकदा आले.
… तर ना. घ. आणि जी.एन. यांच्याच काळात पुण्यात भावगीतांचे विशेष जाहीर कार्यक्रम करणारे गजानन वाटवे यांनी ना.घं.च्या ‘घर दिव्यात मंद तरी’ या गाण्याला चाल लावली होती. उषा अत्रे-वाघ यांनी ते भावगीत गायलं होतं. वाटवे आणि ना. घ. देशपांडे यांचीही मैत्री होती. एकदा पुण्याला गेलो असताना वाटवेंचा फोन मिळवून त्यांना ‘‘ना.घं.चं चित्रीकरण पाहायचं का?’’ असं विचारलं. ते उत्साहाने या म्हणाले. दिनेश नाईक आणि मी लगेच निघालो. वाटवे अण्णांनाच पत्ता विचारला तसं ते मिश्कीलपणे उद्गारले, ‘‘अरे, ‘वैकुंठ’ म्हणून विचार… आता जवळच राहायला आलोय.’’ वाटवेंच्या घरी पोहोचलो. अण्णा पंच्याऐंशी उलटली तरी पेटीचा सूर धरून एका कवितेला चाल लावत होते. आम्ही ऐकत राहिलो. ‘‘अगदी नव्या कवितासुद्धा छान असतात. अशा अर्थगर्भ कवितांना चाल लावण्याचा प्रयत्न करतो’’ अण्णा त्यांच्या ‘खास’ आवाजात बोलले.
‘‘अहो, तुमची गायलेली आणि चाल दिलेली कितीतरी गाणी प्रसिद्ध आहेत. भावगीतांचे रसिक ती अजूनही गुणगुणतात.’’
‘‘आठवतात तुला…?’’
मग मी चारदोन गाणी सांगितली. ‘कसा ग गडे झाला कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा’ या कवी मनमोहन नातू यांच्या त्या काळी ‘न रुचलेल्या’ गाण्याविरुद्ध ‘अश्लील’ म्हणून मराठे नावाच्या गृहस्थाने सडकून टीका केली. मग वाटवे यांनी त्यांना ते गाणं गाऊन दाखवलं तेव्हा मान डोलवू लागले. हा खास पुणेरी किस्सा सांगताना अण्णांच्या चेहऱयावर मिश्कील हसू होतं. ‘‘अरे, पुण्याचे लोक मला तेव्हा ‘वाटवे अगंबाईची गाणी गातो’’ असं म्हणायचे. हे मोकळेपणाने सांगताना ते मनमुराद हसले.
वाटवेंचं गाणं मी मुंबईत फार पूर्वी एका गणपती उत्सवात ऐकलं होतं. कार्यक्रमाचा शेवट ते ‘प्रेमस्वरूप आई’ या माधव ज्युलियन यांच्या कवितेला लावलेल्या आर्त चालीने करीत. त्याची त्यांना आठवण करून दिली तेव्हा ते म्हणाले, ‘‘अरे, एका कार्यक्रमानंतर एक आजी त्यांना येऊन म्हणाल्या, एवढा भावविवश होऊन गाऊ नको बाबा…’’
सगळं बोलणं सुरू असताना मी ना.घं.च्या चित्रफितीची आठवण करून दिली. त्यांच्याकडे सीडी लावण्याची सोय होती. त्यांनी ती फिल्म कौतुकाने पाहिली. त्यात ना.घं.नी ‘‘मी आता चौऱयाऐंशी वर्षांचा आहे’’ असं म्हटलेलं ऐकून त्या वयाच्या पलीकडे गेलेले वाटवे उद्गारले, ‘‘आमचं म्हाताऱया माणसांचं असंच असतं!’’
त्यांनी चाल लावलेली ‘लेटेस्ट’ गाणी आम्हाला ऐकवली. ‘‘कशी वाटते चाल?’’, ‘‘बरी आहे का?’’ एवढा मोठा संगीतकार-गायक आम्हाला विचारत होता. आम्ही अवाक, पण माझ्या मनात सारखं येत होतं की, त्यांचं ‘वारा फोफावला’ हे प्रसिद्ध गाणं त्यांच्याकडून ऐकावं. ‘‘अण्णा, तुमचं ‘वारा फोफावला’ प्रचंड गाजलं.’’
ते माझ्याकडे रोखून पाहत म्हणाले, ‘‘आलं लक्षात’’. लगेच त्यांनी पेटी (संवादिनी) जवळ घेतली. त्यांची वृद्ध बोटं सुरावट पकडू लागली आणि त्याच प्रसिद्ध स्वरात त्यांनी ते गाणं म्हणायला सुरुवात केली. अवघ्या तीन जणांची मैफल. त्यात एक कलाकार आणि दोनच श्रोते. खरोखर रोमांच आले.
जाता जाता म्हटलं, ‘‘अण्णा, ना.घं.सारखी तुमची मुलाखत व्हिडीओ चित्रीत करूया?’’ वाटवे क्षणात उत्तरले, ‘‘हो, केव्हाही ये, पण आधी फोन तेवढा कर आणि काय सीडी वगैरे करशील त्याची एक कॉपी फक्त मला दिलीस तर बरं होईल.’’ माझे डोळे पाणावयाच्या बेतात आले होते. मोठी माणसं खऱया अर्थाने मोठी का असतात, ते आजच्या ‘सब कुछ कमर्शियल‘ जमान्याला कळणं कठीण.


























































