लेख – मानवी अमरत्वाच्या दिशेने…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. संजय वर्मा

येत्या आठ वर्षांत म्हणजेच 2030पर्यंत मानव अमरत्व प्राप्त करेल, असा दावा रे कुर्जवील या शास्त्रज्ञाने केला आहे. कुर्जविल यांनी वर्तवलेली अनेक भविष्ये खरी झाल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. वस्तुतः आजघडीला फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग आणि ऍमेझॉनचे जेफ बेजोस आणि गुगलचे लॅरी पेज हे अमरत्व मिळवण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करत आहेत. अमेरिकी सॉफ्टवेअर उद्योजक ब्रायन जॉन्सन यांनी आपले बायोलॉजिकल (जैविक) वय सात महिन्यांपेक्षा कमी करून घेतल्याचा दावा केला आहे. वाढत्या वयावर अंकुश ठेवणारा बाजार 15 लाख कोटींपर्यंत गेला असून 2030पर्यंत तो 35 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, पण मानवाला अमरत्व खरोखरच मिळेल?

मानव लवकरच म्हणजे येत्या आठ वर्षांत अमरत्व प्राप्त करेल, असा दावा रे कुर्जवील या शास्त्रज्ञाने नुकताच केला आहे. मानव आता अमरत्वाच्या रहस्याला उलगडण्याच्या अगदी समीप येऊन पोहोचला असून आगामी 10 वर्षांच्या आत एक मोठा चमत्कार होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. वयाचा एखादा टप्पा ओलांडल्यानंतर मृत्यू अटळ आहे. अमरत्वाचा पट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही. मरणाचे भय प्रत्येकालाच आतून-बाहेरून अस्वस्थ करणारे असते. त्यामुळेच अटळ असणारा मृत्यू लांबवता कसा येईल यासाठी अनेक सायास केले जातात. त्यातून दीर्घायुष्य लाभू शकते. पण मरणावर विजय मिळवणे अद्याप तरी शक्य झालेले नाही. असे असले तरी अनादी काळापासून यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

कोणत्याही एखाद्या जिवाचा जन्म होणे, किशोरावस्था, तरुण, प्रौढ आणि वृद्धावस्था गाठल्यानंतर मृत्यू होणे हा निसर्गक्रम आहे. तो स्वाभाविक आहे आणि हे शाश्वत सत्य आहे. पण कोणत्याही जिवासाठी जन्म आणि मृत्यू हा केवळ अस्तित्वाचा विषय नाही. शास्त्र आणि उपचाराच्या दृष्टीने एका व्यापक अर्थाने मृत्यू टाळण्यासाठी चिंतन आणि संशोधन करण्यात आले. म्हणजे मृत्यू होणार हे खरे असले तरी काही काळासाठी त्याला थांबवता येणार नाही का, असा विचार केला गेला. एखाद्याला अमरत्व दिले नसेल तर त्याला दीर्घायू करता येणार नाही का? आपण शरीराला एखाद्या मशीनप्रमाणे गृहित धरले आणि प्रत्येक अवयवाला सुटे भाग म्हटले तर यंत्राच्या नियमानुसार अधिक वापराने एखादा सुटा भाग खराब झाला तो बदलता येऊ शकतो किंवा दुरुस्त करता येतो. म्हणजेच एखादी बंद पडलेली मशीन पुन्हा सुरू करण्यासाठी दुरुस्त केली जाते, तशाच पद्धतीने आपण मानवी शरीरातील खराब भाग बदलू शकत नाही का? अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी संशोधन सुरू झाले.

वास्तविक, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इस्रायलचे लेखक युवल नोव्हा हरारी यांच्या ‘होमो डेयस ः येणाऱया भविष्याचा संक्षिप्त इतिहास’ या पुस्तकामध्ये मिळू शकते. यात हरारी म्हणतात की, ‘‘शास्त्रज्ञांच्या नजरेतून मृत्यू हा शरीराच्या सिस्टममधील येणारा तांत्रिक बिघाड आहे. या बिघाडामुळे शरीराची सिस्टम काम करण्याचे थांबवते.’’ आता प्रश्न असा की, ज्याप्रमाणे मशीनचे सुटे भाग दुरुस्त करता येतात, त्याप्रमाणे शरीरातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करता येऊ शकत नाहीत का? यासाठी आपल्याला प्राचीन काळातील संदर्भ तपासावे लागतील. त्याकाळातील यासंबंधीच्या गोष्टी पुराणकथा म्हणून दुर्लक्षून चालणार नाहीत. उदाहरणच घ्यायचे झाल्यास सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले. यमराजाने एक वचन पूर्ण करण्यासाठी सावित्रीला तिच्या पतीचे प्राण परत दिले ही तमाम हिंदुस्थानींमध्ये प्रचलित असणारी पौराणिक कथा आहे. त्याच धर्तीवर आजघडीला फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग आणि ऍमेझॉनचे जेफ बेजोस आणि गुगलचे लॅरी पेज हे अमरत्व मिळवण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करत आहेत आणि कदाचित हे त्यांचे प्रयत्न फळाला येऊ शकतात, अशीही चर्चा होताना दिसते.

ब्लूप्रिंट नावाच्या प्रोजेक्टअंतर्गत ब्रायन जॉन्सन हे दरवर्षी 16 कोटी रुपये (20 लाख डॉलर) खर्च करत आहेत. यासाठी 30 डॉक्टर आणि आरोग्य पथक त्यांनी आपल्यासोबत ठेवले आहेत. ही टीम जॉन्सन यांच्या प्रत्येक पैलूची बारकाईने तपासणी करते. त्यांचे खानपान, झोप, जागे होणे, व्यायाम आदींवर लक्ष ठेवते. कोणत्याही गोष्टीमध्ये वाढ करणे किंवा कमी करणे तसेच दिनक्रम ठरवणे, आहार निश्चित करणे या गोष्टी ठरवल्या जातात. प्रत्यक्षात सर्व प्रयत्न हे तारुण्य टिकवणे अणि मृत्यू पुढे ढकलण्यासाठी सुरू आहेत. या सर्व शास्त्रज्ञांसह जगातील अनेक मंडळी यावर काम करत आहेत. त्यातूनच अमरत्वासाठीच्या प्रयत्नांना आता एका उद्योगाचे, बाजारपेठेचे स्वरूप मिळाले.

रिव्हर्स एजिंग इंडस्ट्रीच्या बाजाराबाबत पी अँड एस इंटलिजिन्स नावाची संस्था अहवालात म्हणते, वाढत्या वयावर अंकुश बसविणारा बाजार हा 15 लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. हा बाजार 2030 पर्यंत 35 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या ज्या वेगाने श्रीमंतांची संख्या वाढत आहे, ते पाहता बाजार वाढण्याबाबत कोणीही शंका घेण्याचे कारण नाही.’’ तरुण राहणे आणि मृत्यूला अंगठा दाखविण्यासाठी काय काय केले जात आहे आणि का केले जात आहे? असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. यासंदर्भात काही रंजक उदाहरणे आहेत.

विज्ञान युग हे ज्याप्रमाणे अमरत्वाचे स्वप्न उराशी बाळगून आहे, ते पाहता माणसाचे आयुर्मान लवकरच आणखी 15 ते 20 वर्षे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शतायुषी झाल्यानंतरही माणूस तितक्याच उत्साहाने आाणि सक्रियतेने जीवन जगू शकेल. यासाठी आणखी काही प्रयोग सुरू आहेत. न्यूयॉर्कच्या सेंटर फॉर एपिजेनेटिक्स रिसर्च प्रोग्रॅमनुसार 2022मध्ये शास्त्रज्ञाच्या टीमने असा एक शोध लावला आहे की, त्यामुळे मानवी त्वचेचे वय 30 वर्षांपर्यंत मागे नेता येऊ शकते. म्हणजेच एखाद्याचे वय 80 वर्षे असेल तर त्याची त्वचा नितळ करता येऊ शकते आणि तो कमाल 50 वर्षांचा दिसू शकतो. हा प्रयोग शरीरातील अन्य अवयवांवरदेखील करता येऊ शकतो. अर्थात 2017 मध्ये याबाबत ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्स जर्नल’ने केलेल्या एका संशोधनांती इशारा देण्यात आला आहे. त्यात म्हटले की, मल्टी सेल्युलर म्हणजेच बहुकोशीय पेशींच्या वाढत्या वयाला जबरदस्तीने रोखण्याचा प्रयत्न केला तरी अशा जिवांचा मृत्यू हा कर्करोगासारख्या भयंकर आजारपणामुळे होऊ शकतो. अशा वेळी त्वचा किंवा एखाद्या अवयवयाचे वय कमी केल्याचा कोणताही फायदा होणार नाही, कारण मृत्यू अटळ आहे. तरीही आरोग्य विज्ञानाने विकासाच्या बळावर हा करिष्मा करून दाखविला आहे आणि त्यामुळे मानवाचे सरासरी वय हे पूर्वीच्या तुलनेत अधिक वाढले आहे. संपूर्ण जगात ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. याचाच अर्थ मृत्यूला काही काळ लांबणीवर टाकणे कठीण राहिलेले नाही. 2030 पर्यंत जगातील बहुतेक भागांमध्ये विज्ञान असा चमत्कार करण्यात यशस्वी होऊ शकतो की, संपूर्ण जगात मानवाचे सरासरी वय 100 वर्षांपर्यंत असेल. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. आब्रे डी ग्रे यांनीही याबाबत आशा निर्माण केली आहे. अँटी-एजिंग औषधांच्या संशोधनावर काम करणाऱया डॉ. ग्रे यांच्या मते, पेशींचा ऱहास थांबवून आणि शरीरातील रेणूंच्या हालचाली पूर्ववत करून वृद्धत्व काही प्रमाणात थांबवता येते. विज्ञान आता हे करण्याच्या जवळ असल्याने शंभर वर्षे जगणे ही एक सामान्य गोष्ट बनवणे शक्य आहे.

– अमरत्व मिळवणे किंवा वय वाढविण्यासाठी अनेक प्रयोग करणारे 45 वर्षीय अमेरिकी सॉफ्टवेअर उद्योजक ब्रायन जॉन्सन यांनी अलीकडेच आपल्या एका वक्तव्यावरून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानुसार, आपल्या प्रयोगातून त्यांनी आपले बायोलॉजिकल (जैविक) वय सात महिन्यांपेक्षा कमी करून घेतले. या प्रयोगाला त्यांनी ‘रिव्हर्स एजिंग’ असे नाव दिले. जॉन्सन यांच्या दाव्यानुसार सात महिन्यांपर्यंत संशोधन केल्यानंतर त्यांचे हृदय 37 वर्षे, त्वचेचे वय 38 वर्षे आणि फुप्फुसाचे वय 18 वर्षांच्या तरुणाप्रमाणे झाले आहे.

(लेखक बेनेट युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत)