
>> डॉ. अ. ल. देशमुख
कोविड संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेले आहे. यामध्ये शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आल्यावर आनंद वाटेल, त्यांचे मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल असे उपक्रम शाळांनी आयोजित केले पाहिजेत. वेळापत्रकात आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कसे प्राधान्य देता येईल हेही पाहावे लागेल. विद्यार्थ्यांची लेखनक्षमता वाढवण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. या सर्वांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून उपाययोजना व्हाव्यात.
शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचे… जडणघडणीचे मुख्य ठिकाण. आता ती 4 ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे आणि संपूर्ण समाजात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. पण एक आव्हान आहेच. कोरोना अजून पूर्णत्वाने गेलेला नाही. त्यामुळे त्यापासून सुरक्षा कशी करायची तसेच मुलांच्या मनात निर्माण झालेली भीती किंवा पालकांवर असलेली दहशत कमी कशी करायची आणि आपले कार्य व्यवस्थितपणे कसे सुरू ठेवायचे हे आव्हान शाळांना आता पेलायचे आहे. यामुळे घाबरून अथवा निराश होण्याचे कारण नाही. हे आव्हान पेलण्यासाठी विविध दृष्टिकोनातून यासंबंधी सखोल विचार करणे गरजेचे आहे.
शाळेसमोर पहिले आव्हान आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे. बहुतांश शाळांमध्ये 10 ते 20 टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली आहे. ही उपस्थिती वाढवण्यासाठी जे विद्यार्थी अनुपस्थित आहेत, त्यांचे नेमके प्रश्न काय आहेत हे त्यांच्या पालकांशी समन्वय साधून माहीत करून घेऊन त्यावर तोडगा काढणे आणि विद्यार्थी शाळेमध्ये कसे येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी मुलांच्या मनात सकारात्मक विचार रुजवले पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीच्या 8-10 दिवसांमध्ये शाळांमधून विद्यार्थ्यांची उपस्थिती 100 टक्के कशी होईल हे साध्य करावे. अर्थात हे साध्य करायचे असेल तर शाळेमध्ये काही गोष्टी नव्याने कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आल्यावर आनंद वाटेल, त्यांचे मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल असे काही उपक्रम शाळांनी आयोजित केले पाहिजेत.
विद्यार्थी शाळेत का येतो किंवा पालक विद्यार्थ्यांना शाळेत का घालतात याचे मुख्य कारण आहे, त्या विद्यार्थ्याला विविध विषयांचे ज्ञान मिळणे, विद्यार्थ्याची भाषा, गणित, समाजशास्र, विज्ञान या विषयांवर प्रभुत्व मिळवणे यासाठी विद्यार्थी शाळेमध्ये येतो. हा पालकांचा मुख्य दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्याला जेवढा वेळ दिला आहे त्या-त्या वर्गावर जाऊन खणखणीत पद्धतीने शिकवले पाहिजे. विद्यार्थी शिक्षकांकडून शिकण्यासाठी आसुसलेले आहेत. विद्यार्थी शिक्षकांशी चर्चा करण्यासाठी खूप उद्युक्त झालेले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून बरेच संबोध समजलेले नाहीत. कोणतीही संकल्पना किंवा घटना कानांनी ऐकून नुसती समजते. त्यापेक्षा डोळ्यांनी पाहून जास्त समजते आणि प्रत्यक्ष कृतीतून किंवा सहभागातून सर्वांत चांगली समजते, हे शिक्षणाचे मूलभूत तत्त्व आहे.
ऑनलाइनच्या पार्श्वभूमीवरून विद्यार्थ्यांना आता ऑफलाइन शिक्षण मिळणार आहे. ऑफलाइन शिक्षणामध्ये शिक्षकांनी मूलभूत संबोधावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. उदाहरणार्थ, कोरोनाकाळात सर्वत्र काही चर्चा ऐकिवात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी घरी असल्यामुळे त्यांची लेखनक्षमता कमी झालेली आहे. याचा आपल्याला विचार करता येईल का आणि वर्गात रोज विद्यार्थ्यांचे लेखन घेता येईल का हे पाहावे लागेल. लेखनाबरोबरच विद्यार्थ्यांची वाचनक्षमता व गणनक्षमता (कॅलक्युलेशन ऑबिलिटी) कितपत आहे याचाही अंदाज घ्यावा. या जर तीन गोष्टी विद्यार्थ्यांना उत्तम आल्या तर त्यांना सर्व विषय वाचून समजणार आहेत. फक्त गणित आणि भौतिकशास्र याबाबतीतच आपल्याला अधिक कष्ट घ्यावे लागतील. ऑफलाइन शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाइनचा अजिबातच समावेश करणार नाही, असा अट्टाहास शिक्षकांनी धरू नये; कारण इथून पुढील काळामध्ये ऑनलाइन-ऑफलाइन अशी संमिश्र शिक्षणपद्धती सुरू राहणार आहे. ऑनलाइन शिक्षण ही एक आपल्याला मिळालेली पर्वणी आहे. या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरचे ज्ञान देऊ शकतो, असा विचार शिक्षकांनी करून त्या-त्या वयोगटानुरूप काय काय शिकवता येईल याचा अभ्यास केला पाहिजे.
दीड वर्षानंतर शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय गोष्टींतून काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. कदाचित हे निर्णय शिक्षण क्षेत्रातल्या घटकांना पटणार नाहीत, पण त्यावर विचार करण्याची गरज आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केल्यास मूल्यमापन हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची भौगोलिक स्थिती, मानसिक स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेने आपली स्वतःची मूल्यमापन पद्धती विकसित करावी. प्रशासकीय गोष्टीतील पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवणे. लोकसहभागामधून प्रत्यक्ष विविध कला असणारे कलाकार शाळेत बोलवावेत. मनुष्यबळाचा वापर करावा, उपक्रमांसाठी निधी समाजातून उभा करावा, सीएसआर फंडांचा जास्तीत जास्त सदुपयोग व्हावा या सर्व प्रशासकीय गोष्टींवर आता शाळांनीच प्रयत्न केले पाहिजेत.
या नवीन कालावधीमध्ये शासनावर फार अवलंबून राहू नये. आपल्या शाळेतून आपल्या विद्यार्थ्यांचा विकास, जडणघडण करायची असेल तर प्रत्येक गोष्ट शासनाने द्यावी किंवा प्रत्येक निर्णय शासनाने सांगेल तसा अमलात आणावा असा दृष्टिकोन न ठेवता शाळेने स्वतःचा आराखडा तयार करावा आणि तो अमलात आणावा. ही कोविडने आपल्याला दिलेली शिकवण आहे.
(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आहेत.)




























































