
>> दुष्यंत पाटील
विसाव्या शतकातील महान संगीतकार आयगॉर स्ट्रव्हीन्स्कीने संगीतरचना केलेला बॅले ‘पेट्रुष्का.’ संगीत, नृत्यदिग्दर्शन आणि कथानक या सगळ्याच बाजूंनी पेट्रुष्का बॅले उत्कृष्ट होता. मात्र यातल्या संगीताची शैली काहीशी वेगळी असल्याने काही जणांना ती रुचली नाही. या बॅलेच्या संगीतात एकमेकांशी मधुरपणे न जुळणाऱया दोन कॉर्डस् एकत्रपणे पुन:पुन्हा येतात. अशा प्रकारच्या दोन कॉर्डस् एकत्र येण्याला संगीतात ‘पेट्रुष्का कॉर्ड’ असं नाव पडलं. शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली तरी पेट्रुष्का हा बॅले आजही लोकप्रिय आहे.
विसाव्या शतकातल्या सर्वात महान संगीतकारांपैकी एक म्हणून आयगॉर स्ट्रव्हीन्स्कीला ओळखलं जातं. तो सव्वीस वर्षांचा असताना त्याची भेट बॅलेनिर्मितीच्या क्षेत्रात काम करणाऱया दियाघीलेव्ह याच्याशी झाली. प्रचलित संगीतापेक्षा वेगळं असणारं स्ट्रव्हीन्स्कीचं संगीत ऐकून दियाघीलेव्ह प्रभावित झाला. त्याने स्ट्रव्हीन्स्कीला आपल्या पुढच्या तीन बॅलेंसाठी संगीतरचना करण्याचं काम दिलं. या तिन्ही बॅलेंचं संगीत खूप गाजलं. यातला एक बॅले होता ‘पेट्रुष्का.’
1910-11 च्या हिवाळ्यात स्ट्रव्हीन्स्कीने पेट्रुष्काचं संगीत रचलं. 1911 च्या जून महिन्यात पेट्रुष्का प्रदर्शित झाला. संगीत, नृत्यदिग्दर्शन आणि कथानक या सगळ्याच बाजूंनी पेट्रुष्का बॅले उत्कृष्ट जमलं होतं. मात्र यातल्या संगीताची शैली काहीशी वेगळी असल्याने काही जणांना ती रुचली नाही. बॅलेची रंगीत तालीम चालू असताना तिथे आलेल्या एका समीक्षकानं तर दियाघीलेव्हला असं विचारलं होतं की, ‘हे असलं संगीत ऐकण्यासाठी तू मला बोलावलंस का?’ यावर दियाघीलेव्हनं उत्तर दिलं, ‘अगदी बरोबर.’ पुढे 1913 मध्ये व्हिएन्नामध्ये या बॅलेचा प्रयोग होताना तर व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्राने सुरुवातीला हे संगीत घाणेरडं असल्याचं सांगत ते सादर करायला नकारच दिला होता!
‘पेट्रुष्का’ बॅलेचं कथानक असं काहीतरी होतं: बॅलेची सुरुवात 1830 च्या दशकातल्या सेंट पिटर्सबर्ग इथे चालू असणाऱया एका जत्रेतल्या दृश्याने होते. या जत्रेत एका ठिकाणी कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार असतो. सुरुवातीला या बाहुल्या पडद्याच्या मागे असतात आणि या वेळी बॅलेमध्ये एका जादूगाराचा प्रवेश होतो. त्याच्याकडे एक गूढ अशी बासरी असते. या बासरीवर तो मंत्रमुग्ध करणारं संगीत वाजवायला लागतो. जत्रेतले लोक तल्लीन होऊन संगीत ऐकायला लागतात.
यानंतर पडदा बाजूला होऊन तीन कळसूत्री बाहुल्या दिसायला लागतात. जादूगार आपल्या बासरीचा जादूच्या छडीसारखा वापर करत तिन्ही बाहुल्यांना जिवंत करतो. यात दोन बाहुले तर एक बाहुली असते. यातला पहिला बाहुला काळ्या रंगाचा असतो तर बाहुली सुंदर बॅले नर्तकी असते. काळ्या रंगाचा बाहुला श्रीमंत दिसतो. त्याच्या हालचालीही लयदार असतात. दुसरा बाहुला मात्र काहीसा वेंधळा दिसतो. त्याचं नाव असतं ‘पेट्रुष्का.’
बॅलेमध्ये प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळतो. पेट्रुष्काचं बॅले नर्तकीवर प्रेम असतं, तर बॅले नर्तकीचं काळ्या रंगाच्या बाहुल्यावर प्रेम असतं. या काळ्या रंगाच्या बाहुल्याचंही बॅले नर्तकीवर प्रेम असतं. पेट्रुष्का काळ्या रंगाच्या बाहुल्याचा मत्सर करतो. एका प्रसंगात काळ्या रंगाचा बाहुला आणि पेट्रुष्का यांच्यात मारामारी होते. यामध्ये पेट्रुष्का मार खातो आणि शेवटी पळून जातो.
यानंतर जत्रेतलं दृश्य पाहायला मिळतं. आता संध्याकाळ व्हायला लागते. जत्रेत तऱहेतऱहेचे लोक दिसायला लागतात. यात एका लोकगीतावर एका दाईने केलेलं नृत्य, एक अस्वल घेऊन आलेला एक शेतकरी, बरेचसे भटके लोक यांचा समावेश होतो. जत्रेत आनंदोत्सवाचं वातावरण चालू असताना एक किंकाळी ऐकू येते. ही किंकाळी जिथे बाहुल्यांचा खेळ चालू असतो तिकडूनच आलेली असते. काळ्या रंगाच्या बाहुल्याने पेट्रुष्काचा कट्यारीने खून केलेला असतो. जत्रेतले लोक घाबरतात. आता तिथे पोलीसही येतात. पण मेलेला पेट्रुष्का हा केवळ बाहुला असल्याचं जादूगार पटवून देतो.
नंतर रात्र होते, जत्रेतले सारे लोक निघून जातात. पेट्रुष्काचं शरीर घेऊन जादूगार निघून जाण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पेट्रुष्काचं भूत प्रकट होतं. ते जादूगारावर चिडलेलं असतं. मुळात बाहुला म्हणून निर्जीव आयुष्य जगत असताना जादूगाराने आपल्याला जिवंत करून आपल्यात प्रेम, मत्सर आणि राग अशा मानवी भावना भरल्याबद्दल पेट्रुष्काला राग आलेला असतो.
शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली असली तरी पेट्रुष्का हा बॅले अजूनही लोकप्रिय आहे. आजपर्यंत या बॅलेच्या संगीताची कित्येक वेळा रेकॉर्डिंग्ज झालेली आहेत. या बॅलेच्या संगीतात एकमेकांशी मधुरपणे न जुळणाऱया दोन कॉर्डस् (संगीतात एकाच वेळी अनेक स्वर येणे) एकत्रपणे पुन:पुन्हा येतात. अशा प्रकारच्या दोन कॉर्डस् एकत्र येण्याला संगीतात ‘पेट्रुष्का कॉर्ड’ असं नाव पडलं.
आजही हा बॅले इतका लोकप्रिय का असावा हे पाहण्यासाठी आपण या बॅलेचं संगीत एकदा तरी यूट्यूबवर एकदा तरी नक्कीच ऐकायला हवं.
[email protected]































































