
>> द्वारकानाथ संझगिरी
आचरेकर सर गेले, म्हणजे नेमकं काय झालं?
एका माणसाने निर्माण केलेली एक संस्था कोसळली. मुंबई क्रिकेटच्या दोन पिढय़ा त्यांनी घडवल्या. ‘घडवल्या’ हा शब्द महत्त्वाचा; कारण ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असं त्यांचे प्रशिक्षण नव्हतं. एखाद्या मूर्तिकाराने मूर्ती घडवावी तशा त्यांनी मूर्ती घडवल्या. सचिन तेंडुलकरमुळे ते जगप्रसिद्ध झाले. पण सचिन एवढा मोठा झाला नसता तरी सरांचं मुंबई आणि त्यायोगे हिंदुस्थानी क्रिकेटशी नातं घट्टच राहिलं असतं.
सचिन हा त्या द्रोणाचार्यांचा अर्जुन होता; पण म्हणून त्यांचं त्यांच्या भीम, धर्म, नकुल, सहदेवावर प्रेम नव्हतं असं नाही. जो सरांच्या पाठशाळेत आला, तो सरांचा झाला. मग शारदाश्रमसाठी खेळणारा असो किंवा दुसऱया क्लबसाठी खेळणारा. सर आणि क्रिकेटपटू यांच्याबद्दल आपण गुरू-शिष्य संबंध वगैरे सवयीने म्हणतो. ते वडील आणि मुलांचं नातं होतं. त्यांना मुलगा नव्हता. त्यामुळे मैदानातील मुलं त्यांचीच होती. वडिलांप्रमाणे त्यांनी प्रेम केलं आणि वडिलांच्या हक्काने त्यांनी चुकल्यावर मुलांच्या कानाखाली स्क्वेअरकटही मारली. फक्त क्रिकेटच नाही, तर क्रिकेटबरोबर खेळाडूंचे इतर प्रश्नही तेच सोडवायचे. त्यांनी या मुलांचा अभ्यास घेतला की नाही मला ठाऊक नाही; पण शक्य असतं तर तेही त्यांनी केलं असतं. ते त्यांचं कुटुंब आणि ही दत्तक मुलं हेच त्यांचं विश्व होतं.
सर हे प्रॅक्टिकल प्रशिक्षक होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गुणवत्ता जोखण्याची त्यांची गुणवत्ता अफाट होती. ते काही राज्यस्तरावरचे मोठे क्रिकेटपटू नव्हते. ‘त्यांचा फलंदाजीचा बचाव अफलातून होता’ असं त्यांच्याबरोबर खेळलेले क्रिकेटपटू सांगत. यष्टिरक्षक म्हणून ते फार पुढे जाऊ शकले नाहीत, कारण त्यांची कारकीर्द नरेन ताम्हाणे आणि चंदू पाटणकरांच्या कारकिर्दीला समांतर गेली. पण मोठा क्रिकेटपटू हा मोठा प्रशिक्षक होतो असं कुठाय? मुलांच्या लहान वयात तुम्हाला हिरा आणि गारगोटी वेगळी करायला यायला हवी. ते त्यांना जमलं आणि त्यांच्या अचूक निरीक्षणाने आणि सल्ल्याने त्यांनी काहींची कारकीर्द उभी केली.
लहानपणी सचिनची ग्रिप बदलण्याचा मोह अनेक ज्ञानी प्रशिक्षक आणि माजी खेळाडूंना झाला होता. कारण ती पुस्तकाप्रमाणे नव्हती. ‘क्रिकेट कसं खेळावं’ हे पुस्तक प्रशिक्षणाचा आधार असतो, अंतिम सत्य नाही हे त्यांनी जाणलं होतं. आजही एक माजी क्रिकेटपटू डोळय़ासमोर आहे. तो मला म्हणाला होता, ‘याची ग्रिप बदलली नाही तर तो कव्हर्समध्ये खोलून देणार.’ आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचवीस वर्षे कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने वाट पाहिली, पण झेल काही आला नाही.
बलविंदरसिंग संधूला त्यांनी ऑफ स्पिनऐवजी इनस्विंगर आणि एकंदरीत स्विंग गोलंदाजीवर भर द्यायचा सल्ला दिला. जेव्हा संधूच्या एक विषारी इनस्विंगवर 1983च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पहिल्याच चेंडूवर गॉर्डन ग्रिनीज बाद झाला तेव्हा सर गालातल्या गालात हसले असणार.
फिरकी गोलंदाजी खेळताना पॉपिंग क्रिझची मर्यादा झुगारून प्रवीण आमरे जगातल्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजांना भिडायचा. सेफ्टीच्या नावाखाली ही त्याची शैली कधी सरांनी बदलली नाही.
त्यांच्याकडे येणाऱया खेळाडूंचा मुख्य स्रोत हा शारदाश्रम शाळा होती. पण इतर प्रवाहातून त्यांच्याकडे आलेले खेळाडू त्यांच्या प्रमुख स्रोतात असे मिसळले की सर्व भेदभाव संपले. म्हणून जितके सचिन, प्रवीण, चुरी, विनोद सरांच्या जवळ होते तेवढेच दिघे, बल्लू, लालू, चंदू होते.
मी एकदा अजित तेंडुलकरला विचारलं होतं की, तू सचिनला आचरेकर सरांकडे का घेऊन गेला? अजित म्हणाला होता, ‘‘आचरेकर सरांची मुलं ज्या आत्मविश्वासाने मॅचेस खेळायची, ज्याप्रमाणे मैदानावर छाती पुढे काढून वावरायची ते पाहून मला जाणवलं की आचरेकर सरांच्या प्रशिक्षणात एक वेगळी जादू आहे.’’ ती जादू मॅच प्रॅक्टिस आणि कठोर मेहनत ही होती. आचरेकर सरांच्या मुलांचा काय कॉन्फिडन्स होता याचं एक उदाहरण मी देतो. 1991ची गोष्ट आहे. समीर दिघे या यष्टिरक्षकाचा उदय होत होता आणि चंदू पंडित हा यष्टिरक्षक अस्ताला जातोय असं वाटत होतं. एका मुलाखतीत सरांनी सांगितलं की, चंदू पंडितने आपले ग्लोव्हज् समीरला द्यावेत. कर्मधर्मसंयोगाने त्या दिवशी वर्तमानपत्रात माझा एक लेख आला. त्यात मी हीच भावना व्यक्त केली होती. दुसऱया दिवशी मुंबई-सौराष्ट्र हा रणजी सामना होता. चंदू पंडित हा कर्णधार आणि यष्टिरक्षक होता आणि समीर दिघे हा आघाडीचा फलंदाज होता. समीरने त्या मॅचमध्ये शतक ठोकलं. जमलेल्या प्रेक्षकांनी समीर दिघेला प्रचंड पाठिंबा दिला. संध्याकाळी चंदूने मला ड्रेसिंग रूममध्ये बोलावले आणि विचारले, तू हा लेख का लिहिलास. सरांना वाटणं साहजिकच आहे, त्यांच्या दुसऱया शिष्यालाही यष्टिरक्षक म्हणून संधी मिळावी. पण मला अजून खेळायचंय आणि माझ्यात लढण्याची जिद्द आहे, जी मला आचरेकर सरांनी शिकवली आहे. त्यानंतर चंदूने पुन्हा हिंदुस्थानी संघात पुनरागमन केले आणि आचरेकर सरांच्या शिकवणीला मी कुर्निसात ठोकला.
आचरेकर सरांच्या एका समारंभाचा मी निवेदक होतो. तेव्हा सचिनने सांगितलेला एक किस्सा मला आठवतो. सचिन-द्रविड भागीदारीत चिकी धाव काढल्यावर द्रविड काही वेळा दमायचा. द्रविडने सचिनला विचारलं, ‘‘तू काय आपल्यापेक्षा काही वेगळा व्यायाम करतो का?’’ सचिन म्हणाला, ‘‘नाही. पण कदाचित आचरेकर सर दिवसाचा सराव संपल्यावर पुन्हा एक फेरी शिवाजी पार्कला मारायला लावत, त्याचा हा परिणाम असावा.’’
क्रिकेटच्या बाहेरही आचरेकर सरांनी मुलांना शिस्त शिकवली. 2011मध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसरकरची मुलाखत मी लंडनमध्ये घेतली होती. सचिनला आणायला माझा मुलगा आणि तिथला एक डॉक्टर गेला. सचिन बॅग घेऊन हॉटेलच्या फॉयरमध्ये आल्यावर त्या दोघांनी सचिनची बॅग घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ती घेऊ दिली नाही. सचिनची बॅग पकडायला तिथे पन्नास जण उभे राहिले असते. मी हा किस्सा नरेश चुरीला सांगितल्यावर तो म्हणाला, ‘‘ती सरांची शिस्त आहे. आमच्या अंगात भिनलेली.’’
अलीकडे मुलांचे संसार थाटल्यानंतर सख्खी मुलंही आईवडिलांना विसरतात. या सरांच्या दत्तक मुलांची सरांशी जोडलेली नाळ कधीच तुटली नाही. क्रिकेट संपल्यावरही नाही. म्हणून या सर्व मुलांना आपले मैदानावरचे वडील गेल्याची भावना झाली असावी. त्यांच्या गालावरून ओघळणारे अश्रू ही त्यांची खूणगाठ होती.


























































