
नारायण पेठ ही पारंपरिक साडी असल्यामुळे ती खास समारंभासाठी नेसली जाते. साडी, मेकअप, हेअर स्टाईल याचा योग्य मेळ साधल्यामुळे तुमच्या साडीचा थाट नक्कीच वाढेल.
आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील यादगीर ‘गुलबर्गा’ जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले तेलंगणातील मेहबूब नगर जिह्यातील नारायण पेठ हे छोटसं शहर. हातमागाच्या सिल्क आणि कॉटन साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. नारायण पेठ साडीचा उगम इसवी सन 1630 च्या सुमारास झाला असे म्हणतात. नारायण पेठ प्रदेश हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा काही काळ त्यांनी तेथे तळ ठोकला होता व नंतर तेथून ते निघाले तेव्हा काही विणकर तेथेच राहिले. हे विणकर नारायण पेठ साड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेगळ्या शैलीच्या डिझाईनसह साडी तयार करीत असत. त्यांनीच या साड्यांमध्ये भरपूर महाराष्ट्रीयन प्रभाव आणला.
नारायण पेठ साडय़ांचे उत्पादन अतिशय अनोखे आणि पारंपरिक आहे. कॉटन नारायण पेठ साडी एका दिवसात पूर्ण होते, तर सिल्क नारायण पेठ साडीसाठी चार ते पाच दिवस लागतात. ही साडी प्री-सेट लूमवर विणली जाते. कोणतीही मशीन यासाठी वापरली जात नाही आणि संपूर्ण प्रक्रिया हाताने होते. ही एक अनोखी प्रक्रिया आहे. जिथे एकाच वेळी आठ साडय़ा लूमवर बनवल्या जातात. संपूर्ण साडीवर वेगवेगळय़ा ग्रेडचे चेक पॅटर्न विणलेले असतात. त्यांच्या हलक्या वजनामुळे आणि बॉर्डरवरील लहान जरीच्या डिझाईन्समुळे नारायण पेठ सिल्क साड्यांची तुलना कर्नाटकातील इरकल साडय़ांशी केली जाते.
मेकअप कसा कराल…
नारायण पेठ साडीवर अगदी लाईट मेकअप केला तरी तो तेवढाच छान दिसतो. तसेच तुम्ही खास सण-समारंभासाठी, लग्नासाठी साडी नेसणार असाल तर तुम्ही थोडा हेवी मेकअप केल्यासही चालतो. यामध्ये तुम्ही फाऊंडेशन लावल्यानंतर नुसती लूज पावडर किंवा एखादा कॉम्पॅक्ट वापरला तरीही या साडीवर चांगलाच दिसतो, पण जर तुम्हाला काही खास कार्यक्रमासाठी जायचं असेल तर मात्र तुम्ही त्यावर हलपंसं फाऊंडेशन लावा. आणि हे फाऊंडेशन तुम्ही लिक्विड फाऊंडेशन किंवा मूस स्वरूपातील फाऊंडेशन येतात ते तुम्ही लावू शकता. आणि त्यावर तुम्ही तुमचा नेहमीचा कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडरचा वापर केला तर तुमचा मेकअप तेवढाच नैसर्गिक दिसेल. तसेच या साडीवर तुम्ही अगदी लाईट आयशाडो लावून लिपस्टिकचा वापर केला तर तो तेवढाच छान दिसतो. ब्लशरचा वापर करताना तुम्ही थोडा नॅचरल टोनच्या ब्लशचा वापर करा. आयब्रो जर लाईट असतील तर तुम्ही आयब्रोफिलरने किंवा आयब्रोपेन्सिलने नीट फील करून घ्या आणि विंचरून घ्या. हेवी मस्कारा लावल्यास डोळे आणखीन तेजस्वी दिसतील. खास फंक्शनसाठी हायलाईटर्सचा वापर करा. तसेच गरज असल्यास कॉटूरिंग करायला विसरू नका. टिकलीचा वापर करताना तुम्ही चंद्रकोर किंवा साडीच्या रंगाची मॅचिंग टिकली लावल्यासही छान दिसते.
दागिन्यांचा पारंपरिक साज
नारायण पेठ ही पारंपरिक साडी असल्यामुळे ती खास समारंभासाठी नेसली जाते. या पारंपरिक साडय़ा असल्यामुळे याच्यावर घातले जाणारे दागिने ही पारंपरिक असल्यास ते जास्त सुंदर आणि योग्य दिसतात. मोत्याच्या दागिन्यांचा साज या साडीवर सुंदर दिसतो.
कॉपर गोल्ड अँटिक गोल्ड आणि मोती कॉम्बिनेशन असलेले दागिनेही यावर छान दिसतात. एखादा गोल्ड चोकर किंवा कोल्हापुरी साज तसेच ठुशीदेखील या साडीवर तुम्ही घालू शकता. खास पारंपरिक सण, समारंभ, पूजा यासाठी या साडय़ा खास नेसल्या जातात. या साडीवर तुम्ही वेगवेगळय़ा प्रकारची हेअर स्टाईल करू शकता. त्यामध्ये तुम्ही साध्या वेणीपासून अंबाडा किंवा मोकळे केस असे वेगवेगळय़ा प्रकारे हेअर स्टाईल केली तर ती छान दिसते. गजरा किंवा फुलांचा वापरही तुम्ही तुमच्या हेअर स्टाईलवर करू शकता. म्हणजे अगदी साधी वेणी घालून त्यावर तुम्ही भरपूर गजरे घातले किंवा वेणीला गुंडाळले तरीही तेवढेच छान दिसतात.
– शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)

























































