अवलिया- अभी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश उदगीरकर

हरहुन्नरी, प्रसंगावधानी, वेळेला धावणारा, जिथे निरुपाय होऊन हात टेकले जातात, तिथे हमखास हजर होऊन आश्वस्त करणारा अभय लाठकर हा माझा केवळ मेहुणाच नव्हे, तर जवळचा छोटा मित्र होता. लाठकर मंडळीत कोणताही छोटा मोठा इव्हेंट असो, याच्यावर सोपवून सगळे निर्धास्त असायचे. धडपड किती करायची याला काही सुमार?
“अभी, हार सांगितलेत का?”
“अभ्या, सतरंज्यांचं काय झालं?”
“अभिदादा, फुगे मागवलेत ना?”
“अभ्या, बेवकुफ, नाश्त्याचं काय?”
“जेवणाची व्यवस्था झालीय ना रे!”
“अभी बाळा, माझ्यासाठी खुर्ची ठेवलीस ना? उभं राहवत नाही रे!”

या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक हसतमुखाने करणाऱया अभीचे मला प्रचंड कौतुक वाटायचे. डोक्यावरचे विरळ ताठ केस, नेपाळी लोकांना आपल्यातला वाटावा अशी चेहऱयाची ठेवण, पसरट जिवणी, रोडकी देहयष्टी आणि तोंडात साखर. याच्या वागण्यात सख्खे, चुलत इत्यादी नात्यांचा प्रादुर्भाव कधीच जाणवला नाही. याच्या लेखी माणुसकी हेच नाते महत्त्वाचे होते. याच्या वागण्याचा कधी कधी संताप यायचा, पण याच्यावर कधी रागावू शकलो नाही हे शल्य आजही माझ्या मनात साचून राहिले आहे. त्याला काहीतरी सुनावण्याची तयारी करून बसावे आणि हा जवळ आला की, आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी. मी पाघळावे असे अनेकदा झालेले आहे.

अभीने अनेक व्यवसाय केले. कधी यश, कधी अपयश पदरात पडले. कधी लोकांच्या टीकेचा विषय झाला, तर कधी कौतुकाचाही, पण याच्या चेहऱयावरचे स्मित टिकून राहिले. ‘सब मर्ज की दवा म्हणजे अभी’ ही त्याची ओळख त्याने टिकवून ठेवली. मग विजूताईंची वऱहाडाबरोबर गेलेली बॅग बेमालूमपणे भाऊजींच्या लक्षात येण्याआधी परत आणणे असो, तिरूपतीला निघालेल्या समस्त खोडील लाठकर कंपनीला सुखरूप नेणे-आणणे असो, हे जटिल नेतृत्व याने यशस्वीपणे निभावले.

अभी हे व्यक्तिमत्त्वच असे होते की, लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांना आपले हक्काचे वाटावे. याच्याकडे पाहिले की, कधी कधी मला सर्कशीतल्या विदूषकाची आठवण यायची. स्वत:ची दु:खे लपवून इतरांना आनंद, हसू देणारा विदूषक या भूमिकेत तो कायम राहिला.

पण दुर्दैवाने जगाच्या रंगमंचावरून याने अकाली एक्झिट घेतली. त्या वेळी प्रसंगी त्याला दूषणे देऊन कृतार्थ होणारेही हळहळले.

अभय सुधाकरराव लाठकर हा माझा कधीकाळी मेहुणा, मित्र होता ही जगरहाटीप्रमाणे इतिहासजमा झालेली घटना असली तरी तो माझ्या आठवणीतून कधीच पुसला जाणार नाही हे वास्तव नेहमीच वर्तमानात असेल.