ठसा – चंद्रकांत कुलकर्णी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

गेली 35 वर्षे सातत्याने रंगभूमीवर कार्यरत असणारे आघाडीचे आणि संवेदनशील दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या रंगभूमीवरील विविध नाटकांचा महोत्सव सध्या पुण्यामध्ये संवाद पुणे या संस्थेतर्फे सुरू आहे. पुण्यातील प्रमुख नाटय़गृहांमध्ये मौनराग, वाडा चिरेबंदी, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला आणि संज्याछाया या नाटकांच्या प्रयोगाचे सादरीकरण सुरू आहे. चारचौघी, डॉक्टर तुम्हीसुद्धा, चाहूल, गांधी विरुद्ध गांधी, ध्यानीमनी, ज्याचा त्याचा प्रश्न, हॅम्लेट यांसारख्या असंख्य नाटकांचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. नाटक ज्याचा श्वास आहे, दर्जा, निर्मिती मूल्य यात कधीच तडजोड न करणारी, परफेक्शनचा हट्ट धरणारी, सतत डोक्यात विचारचक्र सुरू ठेवून नवनवीन प्रयोग रंगभूमीवर करण्यासाठी प्रयत्नशील असणारी व्यक्ती म्हणजेच चंद्रकांत कुलकर्णी. रंगभूमीच्या कणाकणाशी त्यांची नाळ जुळली आहे. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी अशा तीनही माध्यमांमध्ये त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. 15 ऑक्टोबर 1962 रोजी वर्धा जिह्यातील हमदापूर येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना नाटकाची ओढ होती. बी.एससी., डिप्लोमा इन जर्नालिझममध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बॅचलर ऑफ ड्रमॅटिक्समध्ये नाटय़ शिक्षण घेतले. रंगभूमीबद्दलच्या नितांत आदरातून 1982 साली ‘जिगिषा’ या संस्थेची स्थापना केली. नाटय़कलेच्या प्रेमापोटी 1988 साली मुंबई गाठली आणि त्यांच्या आनंदमय संघर्षाची वाटचाल सुरू झाली. गेल्या 35 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 75 हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले, उत्कृष्ट दर्जाचा मानदंड प्रस्थापित केला आहे. या नाटकांमध्ये दगड का माती, प्रिय आईस, साखर खाल्लेला माणूस, ध्यानीमनी, गांधी विरुद्ध गांधी, चाहूल, ज्याचा त्याचा प्रश्न, रंग माझा वेगळा, व्यक्ती आणि वल्ली, बटाटय़ाची चाळ, गिधाडे, हमिदाबाईची कोठी, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगांत (नाटय़त्रयी), संज्याछाया अशा एकाहून एक दर्जेदार नाटकांच्या शेकडो प्रयोगांनी रसिकांची मने जिंकत मराठी रंगभूमीला समृद्ध केले. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, दुगांत या त्रिनाटय़ाचे सलग नऊ तासांचे विक्रमी प्रयोग सादर करणारे हिंदुस्थानी नाटय़सृष्टीतील ते एकमेव दिग्दर्शक आहेत. ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे प्रचंड गाजलेले नाटक मराठी, हिंदी, गुजराती अशा तीनही भाषेत दिग्दर्शित केले. या नाटय़कलेच्या प्रवासात त्यांचे आविष्कार, चंद्रलेखा, सुयोग, अष्टविनायक, श्री चिंतामणी, सुबक, हर्बेरियम, अक्षमी थिएटर्स अशा अनेक नाटय़ संस्थांशी ऋणानुबंध जुळले ते कायमचे. नाटकांसोबतच बिनधास्त, भेट, काय द्याचं बोला, मीराबाई नॉट आऊट, फॅमिली कट्टा, तुकाराम अशा अनेक चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. पिंपळपान, टिकल ते पोलिटिकल, मुखवटे, व्यक्ती आणि वल्ली अशा अनेक मालिकांचे दिग्दर्शन करून कारकीर्दीत मोलाची भर घातली.1991 साली चारचौघी, डॉक्टर तुम्हीसुद्धा आणि रंग माझा वेगळा या एकाच दिग्दर्शकाच्या तीनही नाटकांना सर्वोत्कृष्ट नाटक श्रेणीत नामांकन मिळण्याचा विक्रम कुलकर्णी यांच्या नावावर नोंदला आहे. नाटय़दर्पण पुरस्कारासाठी ‘ध्यानीमनी’ या नाटकाकरिता सर्वोत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून आणि ‘यळकोट’ या नाटकाकरिता सर्वोत्कृष्ट प्रायोगिक दिग्दर्शक असे एकाच वेळी दोन्ही पुरस्कारांवर सुवर्णाक्षराने नाव कोरले गेलेले ते एकमेव दिग्दर्शक आहेत. न्यू जर्सी येथे संपन्न झालेले ‘विश्व नाटय़ संमेलन’ तसेच लंडन आणि सिंगापूर येथील ‘मिफ्टा’ अशा आंतरराष्ट्रीय नाटय़ सोहळ्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मराठी रंगभूमीला नवचैतन्य दिले आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल महिंद्रा नटराज पुरस्कार, मराठवाडा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, पं. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.