
>> प्रसाद पाठक
आपली संगीतकला रसिकांपर्यंत पोहचावी यासाठी आपल्या ‘‘रिवाज’ या संस्थेद्वारे मेहुल नायक हा तरुण पिढीतील गायक धडपडत आहे. सारे काही सुरांसाठी याच व्रतबद्धतेने त्याचे हे प्रयत्न सुरू आहेत.
धडपड – अथक, अविश्रांत, शास्त्रीय संगीतासाठीची धडपड, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची धडपड. एव्हढी धडपड कशासाठी व कशी काय? तरुणाईत अस वेड जपणाऱ्यांपैकी एक असा मेहुल नायक. तो स्वतः एक उत्तम व्हायोलिन वादक असून आपल्यासारख्या युवा कलाकारांना शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपल्या कलेच्या सादरीकरणाची संधी मिळावी, आपली कला संगीत रसिकांपर्यंत पोहचावी यासाठी त्याची धडपड सुरू आहे. शास्त्रीय संगीतील हा धडपडा तरुण मेहुल आणि त्याची संगीतक्षेत्रात जोमाने कायम करणारी संस्था ‘रिवाज’ यांनी या क्षेत्रात एक आयाम तयार केला आहे.
मेहुल अवघा 22 वर्षांचा आहे. अजून शिक्षण पूर्ण करायचे बाकी आहे, पण शिक्षणासोबतच शास्त्रीय संगीत डोक्यामध्ये एव्हढे गुंजन करत असते की, ‘आधी लगीन कोंढाण्याचे…’ या ध्यासानुसार शास्त्रीय संगीत कार्यक्रम करायचेच या ध्येयाने त्याने एक संस्थाही स्थापन केली. जोखीम मोठीच, पण एकदा ठरवले आहे ना मग’ हाचि नेम आता, न फिरे माघारी’.
संस्थेद्वारे वेगवेगळे कार्यक्रम करायचे आणि नव्या गायकांना, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं या हेतूने रिवाज संस्था सुरू केली. यासाठी सुरुवातीला पैशाची असो वा कलावंताची जुळवाजुळव उत्साहाने पार पडली. पण तेवढ्यात कोरोना संकटाने लॉकडाऊन लागले. जाहीर कार्यक्रमांवर बंदी लागली. पण ‘घेतला वसा टाकू नये’ याप्रमाणे एक नाही, तर दोन कार्यक्रम घरगुती बैठकीच्या माध्यमातून मर्यादित रसिक श्रोत्यांसमोर सादर केले. कलाकारही नावाजलेले. सुमेध बागाईतकर (इलेक्ट्रिक पियानो) रोहित देव (तबला) चिंतामणी वारानकर (तबला – सोलो) मंदार वारानकर (संवादिनी) मेहताब अली (सितार) ईशान घोष (तबला). लोकांनीही कौतुक केले. त्यामुळे पुन्हा काही नवे करण्याची उमेद कायम राहिली.
लॉकडाऊन संपला आणि बंधने उठली तसे प्रत्यक्ष जाहीर कार्यक्रम करण्याचे ठरवले. तेही ठाण्यातील मोठ्या सभागृहातील रंगमंचावर. धडपड चालूच. वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करीत हा कार्यक्रम करण्यांचं नक्की ठरले. पहिलावहिला जाहीर कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्यच करायचा ठरवला. पुन्हा नावाजलेले कलाकार. यज्ञेश रायकर (व्हायोलिन) आणि आदित्य खांडवे ( गायन) यांची जुगलबंदी. ऋग्वेद देशपांडे (तबला साथ) तर अभिनय रवांदे (संवादिनी साथ) तसेच एस. आकाश (बासरी) आणि भाग्येश मराठे (गायन) यांची जुगलबंदी. यशवंत वैष्णव (तबला साथ) तर अभिनय रवांदे (संवादिनी साथ). शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहचावे यासाठी ही सारी गुंतवणूक.
परतफेडीमध्ये रसिकांच्या भरभरून प्रतिसादाशिवाय कशाचीही अपेक्षा न ठेवता केलेली. सर्व प्रकारचे शिक्षण चालूच. नव्याने काही अनुभव मिळाले. पण शास्त्रीय संगीत रसिकांना अनुभवायास मिळावे ही जिद्द कायम. हाही कार्यक्रम अतिशय उत्तम प्रतिसादाने पार पडला. आता उत्साह, हुरूप आणखी वाढला. त्या प्रमाणात धडपडही. आता एकदा पाण्यात सूर मारलाच आहे तर या संगीतसागरात तरून जाणे हेच लक्ष्य. दर महिन्याला एक कार्यक्रम करायचाच असे उद्दिष्ट्य ठरवले. म्हणजे दर महिन्याला धावपळ, जुळवाजुळव, गाठीभेटी, संवाद-चर्चा, अविश्रांत मेहनत, कार्यक्रमाचे नियोजन करण्यात करावी लागणारी धडपड चालूच. मी पुनः पुन्हा ‘धडपड’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरत आहे. कारण या सगळ्या घडामोडीत वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही. केवळ शास्त्रीय संगीत संबंधित संस्था उभी करून त्याद्वारे लोकांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचवणे.
पुढचा मार्ग अधिक जाणीवपूर्वक करावाच लागणार. त्यामुळे संगीतरसिकांना आणि आपल्या समवयस्क पिढीला सहज माहिती मिळावी यासाठी फेसबुक, इन्स्टा, यूटय़ूब या नव्या माध्यमांचा वापर करणे साहजिकच होते. त्या सोबत संस्थेचे संकेत स्थळही बनवण्याचे ठरवले. त्याचे काम सुरू केले. सोबतच नवीन महिन्याचा आणखी एक जाहीर कार्यक्रम करायचा होताच. मग महाराष्ट्राबाहेरील काही युवा कलाकारांना आमंत्रित करण्याचे ठरवले. एव्हाना कार्यक्रम करता येईल हा आत्मविश्वास आलेलाच होता . प्रश्न नेहमीच राहतो तो आर्थिक बाबींचा. काहीही झाले तरी पैशाचे सोंग काही आणता येत नाही. पण म्हणतात ना, ‘इच्छा तेथे मार्ग…‘ मग धडपड पुन्हा सुरूच. जमवाजमव केलीच. हाही कार्यक्रम छानपैकी पार पडला. कलाकार महाराष्ट्राबाहेरील पण नावाजलेले. किशोर हेगडे – कुमटा, कर्नाटक (बासरी) साथीला यज्ञेश कदम (तबला), ज्योतिप्रकाश ओझा – कटक, ओरिसा (गायन) साथीला अनुराग झा (तबला) व मिहीर टाकसाळे (संवादिनी), यशवंत वैष्णव – विलासपूर, छत्तीसगड (तबला सोलो) लेहरा साथ सिद्धेश बिचोलकर (संवादिनी)
मेहुल हा ठाणे जिल्ह्यातील कळवा उपनगरचा रहिवासी असून प्रख्यात व्हायोलिन वादक पंडित मिलिंद रायकर यांचा शिष्य आहे. मेहुलची आई श्रीमती तनुजा व बाबा एम. आर. अंजारिया हे दोघेही शासनाच्या पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी असून मेहुलच्या प्रत्येक निर्णयाला आईबाबांचा सक्रिय पाठिंबा असल्यामुळेच तसेच या दोघांच्या प्रोत्साहनामुळेच मेहुल त्याची स्वप्ने पाहू शकत आहे आणि ती पूर्ण करण्याची धडपड करत आहे. मेहुल वाशी येथील फादर ऍग्नेल या महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीयरिंग या अभियांत्रिकी शाखेच्या तृतीय वर्षाचे शिक्षण तो पूर्ण करत आहे. अतिशय उत्साही आणि सदैव कार्यरत. बोलणे इतके विनम्रपणे की, समोर ऐकणारा स्तिमित होईल. आजकालची नवीन पिढी शास्त्रीय संगीत, मृदुता-मार्दवता, संस्कार विसरत चालली आहे असे म्हणणाऱ्या लोकांना मेहुलची प्रत्यक्ष भेट करून द्यावी असे मला सारखे वाटत राहते. हाती स्वीकारलेले काम पूर्णत्वास नेणे याकडे त्याचे प्रथम लक्ष असते. त्याबाबत कलावंत जसा एकही सूर चुकू नये याचा कटाक्ष ठेवत असतो अगदी त्याचप्रमाणे. कदाचित तो स्वतः कलाकार असण्याचाच हा गुण आहे.
या वयात आपल्यासारख्या इतर युवा कलाकारांना कलेच्या सादरीकरणासाठी एक नवीन संधी, व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची त्याची धडपड निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. एवढे करूनही तो स्वस्थ बसलेला नाही. शास्त्रीय संगीताचा प्रसार, आवड जास्तीत जास्त वाढावी यासाठी तो त्याच्या संस्थेच्या संकेतस्थळावरून रसिकांना संवादात्मक माहिती देण्याच्या प्रयत्नात आहे. नवीन कार्यक्रमांची माहिती, त्यांची तिकिटे, आरक्षण रसिकांना सहज उपलब्ध व्हावे, करता यावे यासाठी तो सध्या संकेतस्थळावर ती सोयी-सुविधा देण्याच्या धडपडीत आहे. याव्यतिरिक्त काही हौशी रसिक कार्यक्रमाला संगीतविषयक विशिष्ट सुलेखन (कॅलिग्राफी) केलेले टी शर्टस् किंवा कुर्ते घालू इच्छितात त्यांना ते संकेतस्थळावरून मिळावेत अशी त्याची मनीषा आहे. थोडक्यात, शास्त्रीय संगीत आवड वाढावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची त्याची धडपड आहे. दर महिन्याला शास्त्रीय संगीताचा एक कार्यक्रम आणि इतर अनेक गोष्टी करण्याचा मानस मेहुलचा आहे. त्याला गरज आहे ती रसिकांच्या, प्रायोजकांच्या, संगीत प्रेमींच्या भरभरून पाठिंब्याची.
केवळ 22 वर्षांचा एक युवक आपले अभियांत्रिकी शिक्षण, आपले संगीत शिक्षण सांभाळून शास्त्रीय संगीत कलेच्या प्रसारासाठी मेहनत घेतो आहे, आपल्या वयाच्याच, इतर अनेक गुणीजन कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे, रंगमंचीय कार्यक्रमांचे आयोजन करत आहे, संगीतरसिक आणि गुणी कलाकार यांच्यामधील दुवा बनू पाहत आहे, संगीतरसिकांना सहजगत्या माहिती मिळावी, त्यांची सोय व्हावी, त्यांच्या आवडीची वस्त्रे-प्रावरणे घालता यावी याची काळजी घेत आहे हे सारे औत्सुक्यपूर्ण आहे. त्याच्या या साया धडपडीला, साऱ्या प्रयत्नांना सुयश चिंततानाच त्याला त्याच्या कामात अनेक हातांचे, सहकाऱ्यांचे पाठबळ प्राप्त व्हावे हीच इच्छा!





























































