साधा ‘कॉमन’ सेन्स!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद शिरगावकर

थिएटरमध्ये नाटक सुरू असताना मोबाईलमुळे व्यत्यय आल्याने निर्माण झालेला वाद चांगलाच चर्चिला गेला. या वादाचा केंद्रबिंदू म्हणजे सामाजिक शिस्त. सामाजिक शिस्तीचा बट्टय़ाबोळ करण्यात हिंदुस्थानी नेहमीच आग्रही असतात. म्हणूनच या वादाच्या अनुषंगाने सामाजिक शिस्तीचा तिरकसपणे वेध घेणारा हा लेख.

परदेशातले लोक अफाट गैरसमज घेऊन समाजात वावरत असतात. परदेश म्हणजे आपलं इंग्लंड, अमेरिका वगैरे आणि गैरसमज म्हणजे इतके अफाट गैरसमज की, काही विचारू नका. जरा आठ-पंधरा दिवस तिकडे कुठे राहून आले की, पावलोपावली त्यांचे गैरसमज आपल्याला ढळढळीतपणे दिसून येतात. तिकडे गेल्या गेल्या विमानतळावरच पहिला मोठा गैरसमज दिसतो. वेडे लोक शिस्तशीरपणे सगळीकडे रांगा लावून उभे असतात. इमिग्रेशनला रांग, बॅगा घ्यायला रांग, टॅक्सी-बससाठी रांग. सगळीकडे शिस्तशीर रांग, घुसाघुशी नाही, आरडाओरडा नाही, धक्काबुक्की नाही. चार माणसं जमली असतील तिथे रांगेत उभं राहून आपापला नंबर येईपर्यंत वाट बघायची असते हा त्यांचा अफाट मोठा गैरसमज. घुसाघुशी वगैरे करून आपलाच नंबर पहिला आणण्याचं काही थ्रिलच नाही त्या वेडय़ांच्या आयुष्यात!

विमानतळावरून शहरात पोचता पोचताच दुसरा मोठा गैरसमज दिसतो तो म्हणजे रस्ते गाडय़ांसाठी, फुटपाथ पादचाऱयांसाठी आणि झेब्रा क्रॉसिंग रस्ता क्रॉस करण्यासाठी असतात हा. रस्ता सोडून फुटपाथवर घुसलेली एक गाडी किंवा फुटपाथ सोडून रस्त्यावर बागडणारी एक व्यक्ती दिसेल तर शपथ. झालंच तर झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता क्रॉस करणारी माणसं दिसली की, त्यांच्या अंगावर जोरात गाडी घालायच्या ऐवजी ड्रायव्हर लोक गाडी थांबवून त्यांना रस्ता क्रॉस वगैरे करू देतात. सिग्नलच्या बाबतीतले त्यांचे गैरसमज तर अनाकलनीय आहेत. म्हणजे हिरव्या सिग्नलला ‘जा’, पिवळ्या सिग्नलला ‘जोरात जा’ आणि लाल सिग्नलला ‘पोलीस नसेल तर जा’ इतके सोपे नियम पाळतच नाहीत ते येडे. लाल सिग्नलला पोलीसच काय, चौकात ट्रफिक नसेल तरी थांबतातच. शिवाय रस्त्यात थुंकणं नाही, गाडी-बसमधून बाहेर कचरा फेकणं नाही, नो एंट्रीतून गाडी घुसवणं नाही, दोन लेनच्या रस्त्यावर चार लेन्स करून रस्ते ब्लॉक करणं नाही. काही म्हणजे काही थ्रिल नाही!

ट्रेन किंवा मेट्रोने प्रवास केला की, त्यांचे अजून काही गैरसमज अधोरेखित होतात. एकतर मेट्रोत शिरण्यासाठी रांग लावून उभं राहायचं. ते एक वेळ ठीक आहे, पण गाडी स्टेशनवर आली की, चक्क आतल्या लोकांना आधी बाहेर येऊ देतात आणि मगच आत शिरतात. बरं, गाडी समजा गच्च भरली असेल तर डब्यात कोंबाकोंबी-झोंबाझोंबी न करता शांतपणे ती गाडी सोडून देऊन पुढच्या गाडीची वाट बघत उभे राहतात. काय हे? कोणालाही घाई कशी नाही? कोणालाही स्वतःची दोनचार मिनिटं वाचवून कुठलासा दिग्विजय करायला जायचं कसं नसतं? आणि हां, गाडय़ा लेट झाल्या, कॅन्सल झाल्या, बिघडल्या तरी हे लोक ढिम्म म्हणजे ढिम्म. निषेध नाही, आरडाओरडा नाही, गाडीची तोडफोड नाही, टीसी किंवा मोटरमनला धरून बुकलणं नाही. हे असलं काही केल्याशिवाय हे सुधारणार नाहीत हे समजतच नाही येडछाप लोकांना.

बरं, गाडीच्या आत कितीही गर्दी असली तरी चिडीचूप शांतता. सगळे जण आपापल्या मोबाईलमध्ये किंवा पुस्तकात डोकं खुपसून बसलेले. हुं नाही की चुं नाही. कोणी मोबाईल स्पीकर मोडला टाकून गाणीच लावून बसलंय, कोणी आपल्या मोबाईलवरून अख्ख्या डब्याला ऐकू जाईल अशा आवाजात घणाघणा बोलतच आहे, कोणी मोठय़ामोठय़ांदा सूचना देत पबजीच खेळत बसलं आहे, कोणी डाऊनलोड केलेल्या वेब सीरिजमधले ‘उसासे’वाले सीन्सच चवीचवीनं बघत आहे वगैरे काही भानगडीच नाहीत.

थेटरमध्ये सिनेमा किंवा नाटक बघायला गेलं की, यांच्या गैरसमजांची हद्दच बघायला मिळते. नाटक सुरू झालं की, प्रेक्षकांमधले कॅमेरामन जागे होऊन डोक्यावर मोबाईल धरून कोणी शूटिंगच सुरू करत नाही. किती हा आळशीपणा? नाटक, गाणं वगैरे बघण्या-ऐकण्याच्या गोष्टी नसून मोबाईलवर शूट करून व्हॉट्स ऍपवर पाठवण्याच्या गोष्टी आहेत हे कसं समजत नाही? बरं, सिनेमा सुरू असताना वेडय़ासारखा तो बघत बसतात, त्याच वेळात साईड बाय साईड व्हॉट्स ऍपवर चॅट करत राहायचं असतं, फेसबुकवर पोष्टी-कमेंटी टाकत राहायचं असतं असा वेळेचा सदुपयोग यांना जमत नाही. झालंच तर थेटरमधला अंधार आपल्या मोबाईल्या प्रकाशाने उजळून टाकून ‘तमसे मा ज्योतिर्गमय’ करणं इनके बस की बात नाही.

सगळ्यात कळस म्हणजे थेटरमध्ये मोबाईल चक्क बंद किंवा सायलेंट मोडला ठेवतात हे लोक. किती ही बेजबाबदार वृत्ती? कोणत्याही क्षणी आपल्याला पंतप्रधानांचा फोन येऊ शकतो आणि देशाच्या सीमेवर युद्धासाठी बोलावलं जाऊ शकतं, त्यासाठी फोन ठणाणा वाजता राहिला पाहिजे इतकी साधी जाणीव कशी नसते लोकांना? बरं, अगदी हे नसेल तर इतर इमर्जन्सीज असू शकतात. घरातलं दळण संपायला आलेलं असू शकतं, मित्रांबरोबरच्या पार्टीचा प्लॅन ठरवायचा राहिलेला असू शकतो, इन्शुरन्स एजंट, क्रेडिट कार्डवाल्यांचे फोन येणं अपेक्षित असू शकतं आणि ही सगळी कामं सिनेमा-नाटकाच्या तीनच तासांत करणं शक्य असतं. एकतर देशाच्या सीमांच्या रक्षणापासून ते घरच्या दळणापर्यंतच्या सर्व इमर्जन्सीजचा त्याग करून सिनेमा बघायला यायचं आणि वर फोन सायलेंट मोडमध्ये ठेवायचा, ही किती अमानुष अपेक्षा आहे! पण तरीही परदेशातले यडे ती पूर्ण करतात. तर एकुणात, परदेशातल्या लोकांचे समाजात वावरतानाचे असे अनेक गैरसमज मला अजिबात समजत नाहीत. आपण कुठे आहोत, आजूबाजूला कोण आहे, समोर काय सुरू आहे, आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होतो आहे का याचा विचार करतात हे यडे. या कशा कशाचा विचार न करता आपल्याला हवं ते, हवं तिथे, हवं तस्संच केलं पाहिजे हे यांना समजत नाही.

विमानतळ, रस्ते, रेल्वे, थेटर्स इत्यादी सर्वच सार्वजनिक ठिकाणी आपण मनमुराद, बेभान आणि आपल्याच मर्जीनं जगण्यात खरं थ्रिल असतं इतका साधा ‘कॉमन’ सेन्स या लोकांना नाही!

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वत्ते आहेत़)