सिनेमा – बाजीगर किंग खान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. अनिल कवठेकर

माणसाला यश मिळाल्यानंतर तो थोडासा गर्विष्ठ होत जातो. शाहरुख खानच्या बाबतीत मात्र हे उलट आहे. तो जसजसा यशाच्या पायऱया चढत चाललेला आहे तसतसा तो अधिकाधिक नम्र होत चालला आहे. नायक, खलनायक… शाहरुख खान आज ‘किंग खान’ होण्यात त्याची ही बाजू सर्वात महत्त्वाची आहे.

’अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे, तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.’ शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’मधला हा संवाद आहे. या संवादाचा संदर्भ देण्याचे कारण असे की, अनेक तरुण देशाच्या विविध भागांतून मुंबईला चित्रपटसृष्टीत हिरो बनण्यासाठी येतात. शाहरुख खानसुद्धा त्यापैकीच एक, पण या तरुणाचे स्वप्न मोठे होते. त्याला बॉलीवूडमध्ये केवळ प्रवेश हवा होता असे नाही, तर बॉलीवूडमध्ये बादशहा व्हायचे होते. अमिताभ बच्चनसारखे ‘बिग बी’ बनायचे होते. देव आनंदसारखे चॉकलेट हिरो व्हायचे होते. दिलीप कुमारसारखे ट्रजेडी किंग व्हायचे होते. त्याला स्वतची इमेज बनवायची होती. एक भव्यदिव्य स्वप्न उराशी बाळगून तो तरुण मुंबईत आला होता आणि म्हणूनच वर हा संवाद त्याला लागू होतो.

शाहरुख खानचे वेगळेपण असे सांगता येईल की, त्याने आपल्या करीअरकडे एक मिशन म्हणून पाहिले आहे. त्याला अपयश आले नाही असे नाही. अपयशातून अनुभव गोळा केले आणि यशातून नम्रता स्वीकारली तो म्हणजे ‘किंग खान’ होय. दिल्लीवरून आलेला हा तरुण तेव्हा दिल्लीच्या इतर तरुणांसारखाच बिनधास्त, बेधडक कोणाशीही लढणारा, उद्धट असाच होता, पण आज शाहरुख खान विषयी बोलताना प्रत्येक जण त्याच्या नम्रतेविषयी बोलतो. खरं तर माणसाला यश मिळाल्यानंतर तो थोडासा गर्विष्ठ होत जातो. शाहरुख खानच्या बाबतीत मात्र हे उलट आहे. तो जसजसा यशाच्या पायऱया चढत चाललेला आहे तसतसा तो अधिकाधिक नम्र होत चालला आहे. शाहरुख खानचा हा जीवन इतिहास खरं तर समजून घ्यायला हवा. तो यासाठी की, त्याने प्रत्येक वेळी शंभर टक्के प्रयत्न केलेले आहेत. आपल्या अनेक मुलाखतींमध्ये शाहरुख खानने सांगितले की, रात्र ही झोपण्यासाठी नाही. फार तर तुम्ही पाच तास झोपा. त्यानंतर तुम्ही आपल्या कामाला लागा. काम कोणतेही असो, ते काम आपण मनापासून केले पाहिजे. सुरुवातीच्या काळात एका दिग्दर्शकाने त्याला एक दृश्य अनेकदा करायला लावले आहे. त्या दृश्याचे 42 वेळा टेक्स घेण्यात आले आणि प्रत्येक वेळी संवाद बोलून झाल्यानंतर शाहरुख खान नम्रतेने त्याला विचारायचा, “ओके सर”. शेवटी तो दिग्दर्शक त्याला वैतागून म्हणाला, “मैं पत्थर से भी अॅक्टिंग निकाल सकता हूं, मगर तुमसे नही निकाल सकता.” असे अपमानजनक शब्द झेलणारा आणि पुन्हा त्या दृश्यासाठी तितक्याच उत्साहाने तयार होणारा दुसरा अभिनेता अजून तरी माझ्या पाहण्यात आलेला नाही.

फार वर्षांपूर्वी मी इंग्रजीतील एक ‘कॉपी कॅट’ नावाचे पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकात असे म्हटले होते की, तुम्हाला मोठं व्हायचेय तर पहिल्यांदा निश्चित करा की, तुम्हाला कुणासारखे व्हायचे आहे आणि मग त्या व्यक्तीने मोठे होण्यासाठी त्याच्या आयुष्यात जे काही केलेय, त्याची ‘सेम टू सेम’ कॉपी करा. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीच्या यशाच्या बरोबरीला खात्रीने पोहोचू शकता. कदाचित हे त्या लेखकाने मांडलेले जीवनाचे एक वेगळं तत्त्वज्ञान असू शकेल; पण शाहरुख खानने हे तत्त्वज्ञान जसंच्या तसं स्वत: बाबत वापरल्याचे जाणवते. आपण दिलीप कुमार होऊ शकत नाही हे त्याला माहीत होते तरी त्याने दिलीप कुमारचा ‘ट्रजेडी किंग’ हा शिक्का आपल्याला मिळावा म्हणून ‘देवदास’ स्वीकारला. ज्या अभिनय पातळीवर दिलीप कुमारने हा चित्रपट नेऊन ठेवला होता, तिथपर्यंत शाहरुख खान पोहोचणे शक्यच नव्हते. हे सत्य शाहरुखलाही माहीत होते. मात्र आपण जरी तिथपर्यंत पोहोचलो नाही तरी आपल्या नावाची चर्चा मात्र सातत्याने होत राहिली पाहिजे. चर्चेत राहण्याचे हे गणित त्याने यशस्वीपणे ‘देवदास’मधून हाताळलं. हेच ‘किंग खान’चे वेगळेपण आहे. मनोज कुमारने सातत्याने ‘देशभक्ती’ हा विषय हाताळून आपले चित्रपट यशस्वी केले आणि ‘भारतकुमार’ बिरुदावली मिळवली. हा सगळा अभ्यास लक्षात घेऊन शाहरुखने जाणीवपूर्वक तशा काही चित्रपटांची निर्मिती केल्याचे जाणवते. त्याच्यामध्ये ‘स्वदेश’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘चक दे इंडिया’, ‘ओ डार्लिंग ये है इंडिया’… केले. या चित्रपटातील संवाद आणि गाणी पाहिल्यावर त्याच्या देशभक्तीवर शंका घेणेही त्याच्या विरोधकांना परवडणारे नाही याचेही नियोजन करून ठेवले. रजनीकांतचा ‘रोबोट’ आल्यानंतर त्याची नक्कल करत ‘रा-वन’ केला. रजनीकांतच्या प्रसिद्धीचा उपयोग करून घेत ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये ‘लुंगी डान्स’ टाकला आणि त्या गाण्यावर नृत्य करत बॅकग्राऊंडमध्ये ‘थलायवा’ हा शब्द व रजनीकांतचे फोटो वारंवार वापरत रजनीकांतचा फॅनवर्ग तयार केला. शाहरुखने अमिताभ बच्चन यांचीही कॉपी केली, पण त्यांच्या आवाजाची मात्र अजिबात कॉपी केली नाही.
आजच्या काळातला महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ त्याने केला आणि त्यात त्यांच्यासारखेच कपडे, संवाद, स्टाईल आणि त्यात स्वतचा थोडासा वेगळेपणा आणून आपणही अमिताभ बच्चनसारखी भूमिका करू शकतो हे दाखवले. अमिताभच्या पडत्या काळामध्ये ते ‘कौन बनेगा करोडपती’ नावाचा टीव्ही शो करत होते. मधल्या काळात त्यांनी तो टीव्ही शो करण्याचं थांबवले होते. तेव्हा शाहरुख खानने तो टीव्ही शो जाणीवपूर्वक स्वीकारला आणि काही दिवस चालवलाही.
हा सगळा प्रवास पाहता आयुष्याच्या, वयाच्या कोणत्या टप्प्यावर आपण नेमके काय केले पाहिजे याची ब्लू प्रिंट त्याने आधीच तयार केलेली आहे आणि सर्व त्याप्रमाणे चालले आहे.
1995 मध्ये आलेल्या ‘ओ डार्लिंग ये है इंडिया’मधले संवाद त्याच्या जीवनाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणारे वाटतात. हिरो बनण्याच्या उद्देशाने मुंबईत पाऊल ठेवणाऱयांच्या मनात असणारे स्वप्न, भावना त्याने तशाच व्यक्त केल्या होत्या. आज ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांच्या बाबतीत त्याच्या फॅन्सने त्याला जे भरभरून यश दिले, ते पाहता त्याने म्हटलेल्या त्या चित्रपटाच्या संवादातील शब्द न् शब्द खरा होताना दिसतो.
शाहरुख खानचे वय झाले, शाहरूख खान संपला असं सगळ्यांनाच वाटत होते. ‘पठाण’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा एका बाजूला शाहरुख खानचा चित्रपट आणि दुसऱया बाजूला संपूर्ण देशात त्याच्या विरोधात आंदोलन सुरू होते. चित्रपटगृहे बंद पाडण्यात येत होती, पोस्टर्स फाडण्यात येत होती. तो म्हातारा दिसतो, अशा अनेक पोस्ट फेसबुकवर फिरत होत्या. एका व्यक्तीच्या विरोधात आंदोलन उभे राहिले, पण या सगळ्या प्रािढयेवर शाहरुख खानने एकही शब्द उच्चारला नाही. पुढे जात राहिला. इतक्या प्रचंड विरोधानंतरही त्याचा चित्रपट यशस्वी झाला. इतका यशस्वी की, त्याच्या आधीच्या चित्रपटाचे रेकॉर्ड त्याने मोडले. त्यानंतर लगेच प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ने तर हिंदुस्थानातील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. दोन्ही वेळेस त्याने कोणतेही विधान केले नाही, कोणताही अहंकार दाखवला नाही. तो केवळ आणि केवळ आपले काम करत राहिला आहे.
तो ‘किंग खान’ होण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे ‘बाजीगर’ आणि ‘डर’ या चित्रपटांचा. यात दोन संवाद आहेत. तो जेव्हा गावावरून मुंबईला निघतो तेव्हा त्याला एक जण विचारतो की, “कुठे चाललास?” तेव्हा तो म्हणतो, “कामयाबी की तलाश में जा रहा हूं” आणि जेव्हा तो मोटार रेस हरतो तेव्हा त्याला विचारले जाते की, “तू तर जिंकला असतास. मग हरलास का?” तेव्हा तो म्हणतो, “कुछ जीतने के लिए कुछ हारना भी पडता है.” हे संवाद जणू त्याच्या आयुष्याशी संबंधित आहेत.
नायक, खलनायक… शाहरुख खानने वेळोवेळी घेतलेल्या रिस्कमधूनच तो आज ‘किंग खान’ झालेला आहे. किमान पाच वर्षे तरी तो सुपरहिटच आहे. त्याच्या आगामी ‘डंकी’ला शुभेच्छा!
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)