आर. के. नावाचा स्टुडिओ होता…

>> राजा दिलीप

आर. के. स्टुडिओची वास्तू कायम राहणार की त्याजागी मोठे चकाचक कॉम्प्लेक्स येणार? याचे उत्तर भविष्यात मिळेलच. पण या बॅनर व स्टुडिओने रसिकांना दिलेले क्लासिक हिंदी चित्रपट हे ‘आर. के.’चे वैशिष्टय़ तर रसिकांच्या मनात अजरामरच राहील. कारण त्याची खरेदी-विक्री होऊच शकत नाही!

चित्रपट हाच माझा ध्यास व श्वास आहे. मी चोवीस तास चित्रपटाचाच विचार करतो’, असे उत्कटतेने बोलणाऱ्या ‘शो मॅन’ राज कपूरचा आर. के. स्टुडिओ चालवणे म्हणजे पांढरा हत्ती ठरत असून तो विकायचा निर्णय कपूर कुटुंबातील सदस्यांनी सहमतीने घेतलाय, असे ऋषी कपूरचे धक्कादायक वक्तव्य प्रसिद्ध झाले आणि अपेक्षेनुसार सामाजिक, सांस्कृतिक व प्रसार माध्यमातून हळहळ आणि आश्चर्य व्यक्त होणारी प्रतिक्रिया उमटली. पण खुद्द चित्रपटसृष्टीकडून मात्र फारसे कोणीच काही बोलले नाहीत याचे काहीसे आश्चर्यच वाटतेय.

‘आज राज कपूर असता तर’ त्याने आपणच सत्तर वर्षांपूर्वी, म्हणजेच 1948 साली चेंबूर येथे प्रत्यक्षात उभारलेले स्वप्न असे अचानक मोडू दिले नसते अशीही एक भावनिक प्रतिक्रिया उमटली. पण स्वप्न आणि वास्तव यात खूपच मोठा फरक आहे. कपूर कुटुंबीयांनी विचारपूर्वक व भावनेच्या अजिबात आहारी न जाता हा निर्णय घेतलाय, अशीही एक प्रतिक्रिया उमटली. अर्थात, राज कपूरने आर. के. फिल्म ही आपली चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करणे (पहिला चित्रपट ‘आग ’, 1948) आणि मग आपलाच चित्रपट स्टुडिओ उभारणे (‘बरसात’, 1949), तेव्हाची चित्रपटसृष्टी आणि आजची चित्रपटसृष्टी यात खूपच मोठा फरक आहे. पूर्वी चित्रपटाची गुणवत्ता हाच त्याचा दर्जा ठरविण्याचा एकमेव मार्ग होता. आजच्या कॉर्पोरेट युगात चित्रपट पाहणारा भेटण्यापूर्वीच त्या चित्रपटाने किती कोटी कमावले याच्या ब्रेकिंग न्यूज होतात. याच बदलाशी आजच्या पिढीतील कपूर खानदानाचा निर्णय सुसंगत म्हणायचा का?

पृथ्वीराज कपूर ते तैमूर असा खरं तर या खानदानाचा चार पिढय़ांचा प्रवास आहे. (रणधीर कपूरची मुलगी करिना हिचा मुलगा या नात्यानेच तैमूरचे नाव घेतलयं. म्हणजेच, पृथ्वीराज कपूर तैमूरचे खापर पणजोबा.) या नातेसंबंधात आर. के. फिल्म आणि स्टुडिओ म्हणजे फक्त आणि फक्त राज कपूर हेच समीकरण वा घट्ट नाते कायम राहिलयं आणि म्हणूनच हा स्टुडिओ विकण्याची बातमी येताच राज कपूरच्या दिग्दर्शनातील अजरामर कलाकृतीचा इतिहास जणू ‘फ्लॅशबॅक’ बनून समोर आला.

राज कपूर म्हणायचा, पिक्चर इज मेड ऑन टू टेबल्स, रायटिंग टेबल ऍण्ड एडिटिंग टेबल…त्याच्या या व्याख्येशी सुसंगत त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटांचा प्रवास आहे. राज कपूरच्या ‘आवारा ’ला तात्कालिक समीक्षकांनी फारशी पसंती दिली नव्हती, पण प्रेक्षकांनी चित्रपट उचलून धरला. रशिया व पूर्व युरोपमधील या चित्रपटाची लोकप्रियता आजही चर्चेत असते. चीनचे क्रांती नेते माओ त्से तुंग यांना ‘आवारा’ विशेष आवडल्याचे टाईम मासिकाने म्हटले होते. याच चित्रपटाने राज कपूरची विशिष्ट प्रतिमा मिळाली. उत्कट प्रेमिक आणि सामाजिक भान अशी ही इमेज होती. आवारा आणि श्री 420 या चित्रपटांतील त्याच्या प्रतिमेत चार्ली चॅप्लिनची प्रतिमा होती. मेरा नाम जोकरपर्यंत ही प्रतिमा सखोल होत गेलीय असे लक्षात येईल. तर जिस देश मे गंगा बहती है ( दिग्दर्शक राघु कर्मकार) आणि जागते रहो (दिग्दर्शक अमित मैत्रा आणि सोमू मित्रा) या चित्रपटात राज कपूरला भारतीय रूप सापडले. आर. के. स्टुडिओचे हे वेगळेच चित्रपट होते, तर ‘बरसात’ हा एक मुक्त, मनभावी चित्रपट. तो काहीसा उच्छृंखल तितकाच भावसखोल. या चित्रपटातील राज कपूर व नर्गिस यांच्यातील एक प्रणय प्रसंग आर. के. फिल्म बॅनर व स्टुडिओचा ट्रेड मार्क ठरला. आर. के. म्हणताच ते पटकन डोळ्यासमोर येतेच. राज कपूर व नर्गिस ही जोडी आपल्या देशातील चित्रपट रसिकांप्रमाणेच सोवियत युनियनमध्येही झाली. ‘आवारा’ तर बीबीसी दूरदर्शनवर दाखवण्यात आला. ‘श्री 420’ मधील सामाजिक उपरोध रसिकांना भावला. ‘बुट पॉलिश’ (दिग्दर्शक प्रकाश अरोरा) हा रस्त्यावरील अनाथ मुलांची गोष्ट प्रभावीपणे साकारणारा चित्रपट तर ‘जागते रहो ’मध्ये कोलकात्यातील एका रात्रीची आणि त्यामध्ये एका खेडुताच्या (अर्थात राज कपूर) घोटभर पाण्यासाठी झालेल्या तडफडाटाची गोष्ट आहे. हा चित्रपट कार्लोव्ही वेरी चित्रपट महोत्सवात दाखल झाला होता. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशानंतर काही गोष्टी घडल्या. राज कपूरने ‘नायक’ म्हणून आपली वाटचाल थांबवली आणि आपला पुत्र रणधीर कपूर दिग्दर्शित ‘कल आज और कल’पासून चरित्र भूमिकांसाठी वाटचाल सुरू केली. तर ‘बॉबी’पासून राज कपूरमधील दिग्दर्शक अधिक सौंदर्य सक्तीकडे अर्थात नायिकेचे शरीरसौंदर्य खुलवण्याकडे वळला (अपवाद ‘प्रेम रोग’) विशेष म्हणजे, नवीन पिढीतील चित्रपट रसिकांनी दिग्दर्शक राज कपूरमधील हा बदल स्वीकारत आर. के. फिल्म बॅनर व स्टुडिओ यांना भरभरून यश मिळवून दिले. ‘हीना ’ हे राज कपूरचे दीर्घकालीन स्वप्न दोन गाण्यांच्या ध्वनिमुद्रणानंतर राज कपूरचे निधन झाल्यानंतर रणधीर कपूरने दिग्दर्शित केले.

आर. के. च्या चित्रपटातील गीत, संगीत व नृत्य याचाही श्रवणीय कसदारपणा विशेष उल्लेखनीय. बरसात मे हमसे मिले तुम (बरसात), ओ बसंती पवन पागल, हां मैने प्यार किया क्या जुर्म किया ( जिस देश मे गंगा बहती है), प्यार हुआ इकरार हुआ ( श्री 420), हर दिल जो प्यार करेगा, ओ मेरे सनम दो जिस्म एक जान है हम, ये मेरा प्रेम पत्र पढकर (संगम), ऐ भाय देख के चलो, जिना यहा मरना यहा, जाने कहा गये वो दिन ( मेरा नाम जोकर) अशा अनेक गाण्यांतून आर. के. फिल्म बॅनर व स्टुडिओ यांचे अस्तित्व कायमच अधोरेखित राहीलय आणि राहीलही. आर. के. ची एकेकाळची चैतन्यमय कलरफुल होळी (राज कपूरनंतर ती बंद झाल्यावर फक्त त्याच्या आठवणी राहिल्यात), श्रीगणेशोत्सव (तो आजही सुरू आहे) याचीही आठवण यानिमित्ताने येणे स्वाभाविक आहेच.

आर. के. स्टुडिओची वास्तू कायम राहणार की त्याजागी मोठे चकाचक कॉम्प्लेक्स येणार? याचे उत्तर भविष्यात मिळेलच. पण या बॅनर व स्टुडिओने रसिकांना दिलेले क्लासिक हिंदी चित्रपट हे ‘आर. के.’चे वैशिष्टय़ तर रसिकांच्या मनात अजरामरच राहील. कारण त्याची खरेदी-विक्री होऊच शकत नाही!