
>> रविप्रकाश काकर्णी
तसं तुम्ही आम्ही सगळेच सिनेमा पाहतच असतो. त्याचा अतिरेक झाला तर सिनेमावेडा असंदेखील बिरूद मिळतं, पण ‘सिनेमा पाहणारा माणूस’ असा गौरवपूर्ण उल्लेख एखाद्याचाच होतो आणि अर्थातच तो माणूस म्हणजे सिनेमात आकंठ बुडालेला एकमेव अशोक राणे असतो. विशेष म्हणजे हे बिरूद त्यांनी स्वतच स्वतला लावून घेतलं आहे. मात्र ते इतके यथार्थ आहे की, कोणीही त्याबाबत आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळेच की काय, अशोक राणेंनी आपल्या चित्रपट वेडाच्या कहाणीला नावच देऊन टाकलं, सिनेमा पाहणारा माणूस!
इतकं नेमकं शीर्षक त्यांना सुचलं तरी कसं? याबाबत त्यांनी यंदाच्या ‘अंतरीचे प्रतिबिंब’ या दिवाळी अंकात बरंच काही सांगितलेलं आहे. ते सांगतात, आयुष्यभर सिनेमा पाहत आलो. शेकड्यांनी नव्हे, हजारोंनी पाहिले, परंतु ‘सिनेमा पाहणारा माणूस’ अशी आपली ओळख असू शकते, नव्हे चित्रपट क्षेत्रात अनेक भूमिका बजावूनही तीच असू शकते हे माझ्याही कधी ध्यानीमनी आलं नव्हतं. हे बिरूद मला अचानक चिकटलं. माझ्या तोंडून अभावितपणे बाहेर पडलं. मलाच ते खूप आवडलं. जणू माझी मलाच नेमकी ओळख पटली.
पुढे राणे सांगतात, ‘हे घडलं कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान आयोजित करत असलेल्या समाज संमेलनात. त्या वर्षी ते पाचगणीला होतं. तीन दिवस चालणाऱया या संमेलनाच्या आदल्या दिवशी सर्वांनी जमावं अशी अट असते. त्यानुसार आम्ही जमलो होतो. रात्रीचे जेवण झालं. एका मोकळ्या हॉलमध्ये सर्वजण गोलाकार बसलो होतो. 70-80 जण जमलो होतो. आपापसात गप्पा चालल्या होत्या. ज्येष्ठ लेखक हरी नरके यांनी एक सूचना केली. ते म्हणाले, सकाळी संमेलन सुरू होईल तेव्हा औपचारिक ओळखपाळख होईलच. तर ती आताच अनौपचारिकरीत्या का करून घेऊ नये? सर्वांना कल्पना आवडली. स्वतची ओळख करून देत हरी नरके यांनी सुरुवात करून दिली आणि मग एकानंतर एक बोलू लागले. आपलं काम, आपलं लेखन, प्रसिद्ध झालेली पुस्तकं, पुरस्कार, इतर काही गौरव, मानसन्मान… असं बरंच काही. काहींची यादी तर भलतीच लांबलचक. स्पष्टच सांगायचं तर कंटाळवाणी. माझा नंबर आला. मी म्हणालो, मी अशोक राणे. सिनेमा पाहणारा माणूस… आणि पुढच्याकडे सूत्रे दिली. सगळ्यांचा परिचय झाल्यावर नरके बोलले, आपण सर्वांनी आपापली तपशीलवार ओळख करून दिली, परंतु इथे आपले एक मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या क्षेत्रात प्रचंड काम केलंय. त्यांना राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार प्राप्त झालेत. ते सातत्याने जगभर हिंडत असतात. केवढं सांगण्यासारखं आहे या माणसाकडे, पण ओळख कशी करून दिली तर एका वाक्यात… ‘सिनेमा पाहणारा माणूस!’
हरी नरके कौतुकाने माझ्याबद्दल बोलत होते. ऐकणारेही थोडे वरमल्यासारखे त्यांचं ऐकत होते, पण मला काही त्या कौतुकाचं विशेष वाटलं नाही. एक गोष्ट स्पष्ट सांगतो आणि ती खरीच आहे. आपल्या कामाच्या, प्रसिद्ध झालेल्या असंख्य पुस्तकांच्या, गुणगौरवांच्या, मानसन्मान, पुरस्कारांच्या याद्यांचं जे काही लांबलचक कथाकथन बहुतेकांचं चाललं होतं त्या वेळी मी कावलो होतो. उपस्थितांना अधिक बोअर करू नये म्हणून मी नकळतपणे एका वाक्यात माझी ओळख करून दिली होती. ते काही ठरवून घडलं नव्हतं. अगदी सहज, वेदनेतून शहाणपण येतं तसं काहीतरी घडलं.’
पुढे राणे म्हणतात, ‘पण माझी मलाच प्रथम झालेली ओळख नंतर माझ्याही ध्यानीमनी रुतून बसली…’ आणि नंतर राणे लिहीत गेले. निमित्त होतं ‘साधना’ साप्ताहिकात सुरू झालेलं त्यांचं सदर. मग अशोक राणे सुसाट लिहीतच सुटले. त्यांच्यातल्या सिनेमा पाहणाऱयांचं आत्मकथन ते सांगू लागले. 512 पानं झाली.
तेव्हा त्यांची मैत्रीण विजया चौहान त्यांना म्हणाली, “काय, आता तुही आत्मकथन लिहिणार?” यावर राणे लिहितात, “कुणाकुणाला कसले कसले त्रास होतात ते मला माहीत आहे. मला त्यांचं कमकुवतपण कळतं. तेव्हा तिला उत्तर दिलं नाही, पण आता यानिमित्ताने देतो, हो विजू, सिनेमा पाहणाऱयांचं आत्मचरित्र मीच लिहिणार. कारण माझ्या इतके सिनेमे पाहिलेला, नाना प्रकारे पाहणारा, त्याचबरोबर इतर कलांचीही समज वाढवणारा, 46 वर्षे सातत्याने लिहिणारा, सिनेमाचं बोट धरून जग पाहून आलेला आणि सिनेमानं सफळ, संपूर्ण झालेला दुसरा मराठी माणूस नाही. नम्रपणा आणि अहंकाराची ऐशी की तैशी! आता एकदा निवांतपणे वाचून बघ… सिनेमा पाहणारा माणूस!”
हे वाचल्यावर वाटलं, होऊन जाऊ दे, एकदा वाचकांना काय वाटतं ते…































































