विदर्भाचा ‘शेर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

मी गजलकार सुरेश भटांच्या प्रेमात होतो व आजही आहे. या माणसाला शब्द वश होते. ते जणू हात जोडून भटांसमोर उभे राहत व विनवणी करीत, ‘मांडा आम्हाला कसे मांडायचंय ते. आम्हीं निर्जीव आहोत. तुम्ही आमच्यात जीव घाला आणि मग आम्हाला बाणसारखे सोडा. समोरचा विद्ध झालाच पाहिजे.’

भटांची स्वतःची वेगळी गणिते होती. यमक, अनुमास यांच्या आहारी जाण्याची त्यांना गरज भासत नसे. तरीही इष्ट परिणाम ते अचूक साधत. उदाहरणदाखल हा
शेर पाहा –
ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले
किंवा हा वाचा –
टाकली हातातली मी सर्व पाने
कोण जाणे हरलो की जिंकलो मी

त्यांची मोरपीसासारखी लेखणी तलवारीसारखा पण निसटता, पुसट वार करते. रक्त येत नाही, पण हुळहुळत राहतं. किती तरी वेळ तुम्ही अस्वस्थ असता. हेच सुरेश भटांचं यश. हीच त्यांना काव्यप्रेमी रसिकांनी दिलेली पावती.

सुरेश भट हा माणूस म्हणून खूपच वेगळा होता. (मी त्यांना कधीही भेटलो नाही.) त्यांना जवळून व चांगले ओळखणाऱया माणसांकडून त्यांच्याविषयी जे ऐकायला मिळाले ते ‘तारीफ-ए-काबिल’ नक्कीच नव्हते. ते कमालीचे फटकळ होते. एवढय़ा मोठय़ा साहित्यिकाला तोंडाळ कसं म्हणायचं? दिसायलाही ते ओबडधोबड व फोफावलेले होते. थोडक्यात त्यांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या नाजूक, तरल, हळूवार शायरीच्या दुसऱया टोकाचं होतं. सामान्य माणसाला एकाच माणसात ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे कशी असू शकतात हे कळत नसे. त्यांनी एकदा लेखणी हातात घेतली की, ते मनावर राज्य करीत. गालिबप्रभृती उर्दू शायरांचा गाढा अभ्यास करून त्यांनी त्यांची मराठी शायरी केली, सजवली, फुलवली. (त्याआधी भाऊसाहेब पाटणकरांनी धमाल उडवून दिली होती.) भटांची शायरी ‘ओरिजनल’ तर होतीच, पण विलक्षण प्रभावी व थेट हृदयाला हात घालणारी होती. हा शेर वाचा –

बघून रस्त्यावरील गर्दी मी पाहण्यास गेलो
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते

भटांचा जन्म 15 एप्रिल 1932 चा. अडीच वर्षांचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली व त्यात त्यांचा उजवा पाय अधू झाला. वडील डॉक्टर असूनही काही करू शकले नाहीत. कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण औषध उपलब्ध नव्हते. अधू पायामुळे शालेय जीवनात ते कुठले मैदानी खेळ खेळू शकले नाहीत. वाटय़ाला अपरिहार्यपणे आलेल्या उपक्षेत व उपहासाने ते कुढत राहिले, आक्रसत राहिले. त्यांच्या स्वभावातील विचित्र कंगोऱयांचा व चाबकासारख्या चालणाऱया जिभेचा उगम या दुर्गम काळाशी जोडलेला होता. विद्याभ्यासात त्यांना गोडी नव्हती. कसेबसे ते ग्रॅज्युएट झाले. (पुढे तीन विद्यापीठांनी त्यांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला.) भट असेच पुढे शिकत राहिले असते तर त्यांना त्यांच्याच संग्रहाचं रसग्रहण करावं लागलं असतं. ते वाचून त्यांना बहुधा आणखी एकदा नापास करण्यात आलं असतं.

भटांनी जिद्दीनं व व्यायामानं अधू पाय सुदृढ केला. इतका की, दोन तास मांडी घालून ते काव्यगायनाचा कार्यक्रम करू लागले, पण दुखावलेला अंतरात्मा तळमळत राहिला. स्वभावातील तेढ अखेरपर्यंत गेली नाही. ‘रंग माझा वेगळा’, ‘गझलेची बाराखडी’, ‘काफिला’, ‘झंझावात’, ‘रसवंतीचा मुजरा’, ‘एल्गार’, ‘सप्तरंग’, ‘हिंडणारा सूर्य’, ‘निवडक सुरेश भट’ ही त्यांची साहित्यसंपत्ती.

एक ऐकीव किस्सा. अमरावतीत कॉलेजच्या दिवसांत भणंग भट म्हणे एकदा दुकानाच्या फळीवर झोपले होते. त्यांच्या वर्गातील एक श्रीमंत मुलगी गाडीतून कॉलेजला निघाली होती. तिनं भटांना दुकानाच्या फळीवर झोपलेलं पाहिले. तिला साहजिकच धक्का बसला. गाडी थांबवून ती भटांना आश्चर्यानं म्हणाली, ‘भट, तुम्ही दुकानाच्या फळीवर झोपता?’

‘हो’ भट कंटाळलेल्या आवाजात म्हणाले, ‘तुम्ही कुठे xxx?’

वास्तविक त्या मुलीचं काहीच चुकलं नव्हतं, पण बसली न उलटून कनपटीत? या प्रज्ञावंत, प्रतिभावंतांच्या नादी लागायचं नाही. त्यांच्या वाटेला चुकूनही जायचं नाही. त्यांना साधं चारचौघांसारखं वागवायचं नाही. जस्ट लीव्ह देम अलोन. ते देवाचे लाडके असतात. त्यांना येता-जाता माणसात ओढायचं नाही. कंबरडय़ात लाथ खाण्याची तयारी ठेवावी. त्यांच्या कलाविष्काराचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. त्या सुखात डुंबावं आणि मुख्य म्हणजे त्यांच्यापासून लांब राहावं.
जन्मजात आगाऊपणातून मी एकदा सुरेश भटांची खोड काढण्याची गुस्ताखी केली. मी माझ्या स्तंभातून त्यांच्या खाबूगिरीची टर उडविली. मी लिहिलं –

आम्ही काय खातो कुणाचे चार चव्वल
खाबूगिरीत आमचा लागतो नंबर अव्वल

भट रागावले (असणार.). वृत्तपत्राच्या कचेरीत गोल्ड स्पॉट पीत गप्पा मारताना ते कोणा एकाला उद्देशून नव्हे असे मोठय़ाने म्हणाले, ‘अरे, त्या कणेकरला कोणी तरी सांगा की मी फक्त खात नाही तर गोल्ड स्पॉटही पितो.’

याच माणसानं लिहिलं होतं –
रंगूनी रंगात साऱया रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात साऱया पाय माझा मोकळा

भटांनी हवेतच माझ्यापर्यंत पोहोचवलेला मुद्दा ‘मी छातीवर झेलला, बाळगला व भृगूचिन्हासारखा मिरवला. ‘कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली’ त्याचप्रमाणे कहाँ सुरेश भट, कहाँ शिरीष कणेकर? हातात पेन आलं की ते तो वॉशिंग्टनच्या कुऱहाडीसारखं बेगुमानपणे चालवतात.

मीलनोत्सुक प्रियतमेची ओढ, हुरहूर आणि व्याकूळता हा आडमाप कवीराज किती निवडकपणे वेचलेल्या प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे नाजूक शब्दांत मांडतो पाहा-

मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात लाभला निवांत संग
माझ्या काळजाचा ठाव घेणारा सुरेश भटांचा शेर आहे –
इतकेच मला सरणावर जाताना कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

भट भेटले असते तर मी त्यांना कळवळून म्हणालो असतो, ‘मलाही जगण्यानं खूप छळलंय हो. सरणावर तरी नक्की सुटका होईल ना?…

– [email protected]