ठसा – श्रीकांत नेर्लेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही शहराची उंची ही त्या शहरातील उंच इमारतींवर ठरत नाही. ते ठरते त्या शहरातील माणसांच्या उंचीवरून. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ अत्यंत संयमाने आणि नैतिक मूल्य जोपासणारी पत्रकारिता करणारे ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार, ठाणे भूषण श्रीकांत नेर्लेकर उपाख्य नेर्लेकर गुरुजी यांचे निधन ठाणेकरांना चटका लावणारे ठरले आहे. ठाण्याच्या जडणघडणीत राजकीय नेत्यांबरोबर ज्या पत्रकारांचा वाटा होता त्यात श्रीकांत नेर्लेकर यांचे स्थान मोठे होते. तरुणांना लाजवेल असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. वयाच्या 82 व्या वर्षातही ते पत्रकारितेत सक्रिय होते आणि सातत्याने सर्वांच्या संपर्कात होते. त्यांच्या निधनाने अखंड ज्ञानसेवक, अजातशत्रू, स्थितप्रज्ञ, ध्येयवादी, निरलस चिंतनशील पत्रकार, बहुआयामी लेखक आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

नेर्लेकर गुरुजी मूळचे सोलापूरच्या कुर्डुवाडीचे. विद्यार्थीदशेत रामभाऊ म्हाळगी, काका महाजनी यांच्या सान्निध्यात संस्काराचे धडे गिरवलेल्या नेर्लेकर यांनी नंतर ठाण्याची वाट धरली आणि ते अस्सल ठाणेकर झाले. ठाण्यातील मोजक्या दहा ते बारा पत्रकारांच्या मांदियाळीतील ते एक प्रमुख शिरोमणी होते. सत्शील, प्रामाणिक, निःस्पृह, परखड आणि स्वच्छ चारित्र्याचे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. साध्या, सरळ स्वभावाचे असूनही नेर्लेकर यांचा दरारा होता. उथळ पत्रकारिता कशी करू नये याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते.

नेर्लेकरांची शोधपत्रकारिता ही पत्रकारांना आदर्श ठरावी अशीच होती. साधी राहणी आणि व्रतस्थ जीवनसरणी असेच आयुष्य ते जगले. टेंभीनाक्यावरील जोशी वाडय़ात ते राहात. संपूर्ण ठाणे शहर ते पायी फिरत. हातात एक नोटबुक, खिशाला साधा पेन आणि साधा पेहराव असलेले नेर्लेकर म्हणजे ठाण्याच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक इतिहासाचा चालता बोलता संदर्भग्रंथच होते.

ठाणे शहर होण्याआधी ठाणे गाव, शिलालेख, आदिवासी संस्कृती, त्यांचे राहणीमान, ठाणे रेल्वे स्थानकाचा इतिहास, ठाण्यातील शाळा, जिह्यातील स्वातंत्र्यसैनिक, टांगेवाले यांचा हक्क मिळण्यासाठी केलेले लिखाण आणि ठाण्याला सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न ठाणेकरांच्या सदैव स्मरणात आहेत. धगधगते यज्ञकुंड, नाना शंकरशेट, अनादी अनंत सावरकर, नावात काय दडलंय, ठाणे नगरपालिका ते महापालिका ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. ठाण्यातील ‘व्यास क्रिएशन’चे ते प्रमुख सल्लागार होते. 1954पासून हाती घेतलेले पत्रकारितेचे व्रत त्यांनी तब्बल 66 वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवले होते. ठाणेभूषण, विविध संस्थांचे उत्कृष्ट पत्रकारितेचे पुरस्कार, राज्य शासनाचा कोकण विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, विश्वसंवाद वैंद्राचा नारद जयंतीनिमित्त दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी नेर्लेकरांना गौरवण्यात आले होते.

घरात पडून डोक्याला इजा झाल्याचे निमित्त झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दुर्दैवाने त्यांची कोविड टेस्टही पॉझिटिव्ह आली. तरीही जिद्दीच्या बळावर तडपेने ते यावर मात करून बाहेर येतील, अशी अपेक्षा असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने ठाण्यातील पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला आहे.