
>> श्रीनन्द लक्ष्मण बापट
कला, तत्त्वज्ञान, इतिहास, पुरातत्त्कशास्त्र, रामायण-महाभारत यांसह अनेकविध विषयांवरील संस्कृत, प्राकृत, पाली भाषांमधील 1001 दुर्मिळ पुस्तके जगभरातील वाचक-अभ्यासकांसाठी आता मुक्त स्वरूपात वाचण्यास उपलब्ध झाली आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे गेली दोन वर्षे राबविण्यात येत असलेल्या पुस्तके डिजिटायझेशन प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच यशस्वीपणे पूर्ण झाला. या प्रकल्पात ज्यांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले, अशी एक हजार पुस्तके आता संस्थेच्या संकेतस्थळावर ई-लायब्ररीच्या स्वरूपात वाचण्यास ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संस्थेच्या borilib.com या संकेतस्थळावर जाऊन ही पुस्तके विनामूल्य वाचता येतील.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था जगभर ओळखली जाते ती तीन महत्त्वाच्या गोष्टींसाठी. संस्थेने परिश्रमपूर्वक सिद्ध केलेली महाभारताच्या संशोधित आवृत्तीसह सुमारे 300हून अधिक प्रकाशने, संस्थेचा बहुमोल हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह आणि तब्बल दीड लाखांहूनही अधिक ग्रंथांचे भांडार असणारे डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालय. गेल्या वर्षी शताब्दी पूर्ण केलेल्या या संस्थेने आता पुढच्या शतकात धडाक्यात पाऊल टाकलेले आहे.
आपल्याकडच्या दुर्मिळ आणि महत्त्वाच्या निवडक ग्रंथांचे अंकीकरण (Digitization) करून त्यांचे रूपांतर एका अद्ययावत ग्रंथालयामध्ये (E-library) संस्थेने केलेले आहे. ‘www.borilib.com’ या वेब पोर्टलच्या स्वरूपात असणाऱया या नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन नुकतेच ख्यातनाम साहित्यिक द.मा. मिरासदार यांच्या हस्ते झाले. हे वेबपोर्टल संपूर्णपणे निःशुल्क असून त्यावर उपलब्ध असणारे ग्रंथ तेथे केवळ वाचता येतील, डाऊनलोड करता येणार नाहीत किंवा त्यांच्या प्रिंट काढता येणार नाहीत. ग्रंथाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशक, प्रकाशनवर्ष, पृष्ठसंख्या, भाषा इत्यादी विविध निकषांच्या आधारे ग्रंथ शोधता येईल. इतकेच नव्हे एखादा शब्द कोणकोणत्या ग्रंथामध्ये किती वेळा वापरलेला आहे हेसुद्धा भविष्यकाळात सांगता येईल.
केवळ अभ्यासकांनाच नव्हे तर सामान्य वाचकांनाही उपयोगी ठरू शकतील, असे महत्त्वाचे ग्रंथ या पोर्टलमध्ये समाविष्ट आहेत. भगवद्गीतेचा अभ्यास विविध अंगांनी करून लिहिण्यात आलेले महत्त्वाचे ग्रंथ, प्राचीन साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, कालगणना, गणित अशा विविध विषयांचा धांडोळा या ग्रंथांद्वारे घेता येईल. उदाहरणेच द्यायची तर गुरांच्या आजारांवरचे पारंपरिक उपचार सांगणरे ‘गोरोगचिकित्सक’, पाकव्याप्त कश्मीरातील चित्रळ संस्थानाचा इतिहास, राजतरंगिणी, कालिदासाच्या शाकुंतलाचे पोलीश भाषेतील भाषांतर, प्राचीन चित्रकलेविषयीचे ग्रंथ, ‘चाइल्ड इन एन्शंट इंडिया’ हा एका निराळ्या विषयावरील ग्रंथ अशी काही सांगता येतील.
संस्थेचे सहयोगी सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांच्या पुढाकाराने ही योजना कार्यान्वित झाली. मौल्यवान ग्रंथांची निवड, त्यांच्यासंबंधीचे तपशील ठरविणे, तपासणे, दुरुस्त करणे, प्रत्यक्ष डिजिटायझेशन अशा स्वरूपाच्या कामांकरिता संस्थेच्या कर्मचाऱयांसह अनेकांची मदत झाली.‘न्यान्सा’ कंपनीचे मिथिलेश कुलकर्णी आणि चिन्मय भांडारी यांच्या चमूने डिजिटायझेशनचे काम दर्जेदारपणे करून दिले. सी-डॅक या शासनमान्य संस्थेच्या डॉ. दिनेश कात्रे आणि त्यांच्या सहकाऱयांनी वेब पोर्टल सिद्ध केले. या प्रकल्पाला लागणारे अर्थसाहाय्य प्रथमतः पर्सिस्टंट फाउंडेशन, जितेन गजारिया, रजनीभाई अजमेरा यांच्याकडून, तर गेल्या वर्षभरात यार्दी सॉफ्टवेअर इंडिया प्रा.लि. यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात प्राप्त झाले.
अल्पकाळातच या ग्रंथालयाला सुमारे सोळा लाख पेज-हिट प्राप्त झाल्या. या ई-ग्रंथालयात सध्या एक हजाराहून अधिक ग्रंथ आहेत. येत्या तीन महिन्यांत ही संख्या पाच हजारांवर नेण्यात येईल. एकूण सुमारे पंधरा हजार मौल्यवान ग्रंथांचा समावेश या पोर्टलमध्ये करण्यात येणार आहे. आगामी काळात प्राच्यविद्येच्या आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱया इतर स्वयंसेवी संस्थांनाही तांत्रिक स्वरूपाचे साहाय्य करण्याचा भांडारकर संस्थेचा मानस आहे. प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे यात शंका नाही.
– पुण्यात 1919 साली भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या पहिल्या अधिविशनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्राच्यकिद्येच्या क्षेत्रातील संशोधनाविषयी आपले विचार विस्ताराने मांडले. या जागतिक कीर्तीच्या थोर विद्वानाचं कार्य चिरस्वरूपात राहावं आणि त्यापासून अभ्यासकांच्या पुढच्या पिढय़ांना प्रेरणा मिळावी यासाठी भांडारकरांच्या विद्यार्थ्यांनी आणि सहकाऱ्यांनी एक संशोधन संस्था स्थापन केली, ती म्हणजे ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ होय. संस्थेकडे सुमारे अठ्ठावीस हजार हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह आहे. मुंबई प्रांताच्या सरकारच्या योजनेतून गोळा केलेल्या सुमारे सतरा हजार पोथ्या भांडारकर संस्थेला 1922 साली देण्यात आल्या. संस्थेनं त्यात सुमारे अकरा हजार पोथ्यांची भर घातली. काश्मीरमधून गोळा केलेल्या आठशेहून अधिक पोथ्या हे या संग्रहाचं वैशिष्ट़य आहे. त्यातील ऋग्वेदाच्या पोथीची नोंद युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये घेण्यात आलेली आहे, तर पाच हस्तलिखितांना ‘राष्ट्रीय महत्त्वाची हस्तलिखिते’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संग्रहाचे पहिले क्युरेटर डॉ. परशुराम कृष्ण गोडे यांनी आपल्या 42 कर्षांच्या कारकीर्दीत हा संग्रह तर सांभाळलाच; पण त्याचबरोबर हस्तलिखितांच्या आधारे तब्बल 474 शोधनिबंधही लिहिले. या संग्रहात थायलंड, म्यानमार, श्रीलंका, तिबेट, चीन अशा निरनिराळ्या देशांतलं बौद्ध वाङ्मय (त्रिपिटक) असून, ‘अवेस्ता’ या पारशी धर्मग्रंथाच्या तसंच पर्शियन भाषेतल्या मौल्यवान हस्तलिखितांचा संग्रहही आहे. भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय पाण्डुलिपि मिशन’चं (national mission for manuscript) महाराष्ट्र राज्यासाठीचं केंद्र भांडारकर संस्थेमध्ये असून हस्तलिखितांच्या नोंदणीचं आणि वैज्ञानिक पद्धतीनं जतन करण्याचं काम तिथं चालतं.


























































