क्लासिक – दोन समांतर रेषा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सौरभ सद्योजात

इंग्रजी साहित्यातल्या मॉडर्निस्ट लेखन परंपरेचं आणि त्यातल्या प्रयोगशीलतेचं प्रवाहीपण ज्यांच्यामुळे टिकलं आणि पुढे हस्तांतरित झालं त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे ‘व्हर्जिनिया वुल्फ’. माझे मित्र आणि लेखक, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांच्याद्वारे मी ‘व्हर्जिनिया’शी पहिल्याप्रथम भेटलो. पुढे ती अभ्यासाचा भाग झाली. ती प्रतिभासंपन्न, अभ्यासू आणि बंडखोर होती. समविचारी, धोरणी आणि प्रागतिक विचारांच्या लेखक, कलावंत आणि इतर तज्ञ मंडळींच्या ‘ब्लूमवुरी ग्रुप’द्वारे तिने कर्मठ समुदायाला धक्के द्यायला सुरुवात केली. अर्थात तिच्या टोकदार, आधुनिक, परंतु दर्जेदार लेखनातून ते होत होतंच, पण ‘हॉगर्ट प्रेस’च्या माध्यमातून तिने स्वतची आणि ई. एम. फोर्स्टर, इलियट यांची नव्या दमाची ग्रंथसंपदा प्रकाशित करून रूढीवादी इंग्रजी समुदायाला जागं करण्याचा प्रयत्न केला. लेखनाची पूर्वपरंपरा नाकारत तिने नवे प्रयोग केले आणि त्यात सर्वाधिक गाजला तो ‘स्ट्रिम ऑफ कॉन्शिअसनेस’. तिने साकारलेलं ‘मिसेस डॅलवे’ हे त्याचीच साक्ष देणारं कथानक आहे.

‘मिसेस डॅलवे’ हे मानसशास्त्राrय अधिक वाटावं अशा पद्धतीनं लिहिलं गेलेलं आणि नव्या लेखनशैलीचं द्योतक असलेलं कथानक आहे. उच्चभ्रू आणि श्रीमंत जीवन जगणाऱया क्लॅरिसा डॅलवे आणि पहिल्या महायुद्धातून दुःख, अशांतता वेचून आलेल्या सेप्टीमस् स्मिथ या दोघांच्या कथा ‘व्हर्जिनिया’ मांडते. विशेष म्हणजे या दोन पात्रांभोवती फिरणाऱया दोन वेगळ्या गोष्टी (ज्या एकाच आणि समान दिवशी घडतात) एकमेकांना थेट अंती स्पर्श करतात. एका कथेतून दुसऱया कथेत उडय़ा मारायला लावणारं हे रंजक लेखन त्यावेळच्या लेखन जगतातली मोठीच बंडखोरी ठरली असणार यात शंका नाही. यातली क्लॅरिसा ही साधारण पन्नाशीच्या पास पोहोचलेली, मोठय़ा राजकीय असामीची पत्नी. आपल्या भल्यामोठय़ा घरात पाटर्य़ा देणं, समाजात मोठं स्थान असलेल्या पतीच्या मित्रांचा पाहुणचार करणं आणि मर्यादित स्वातंत्र्यासह जगणं हे तिचं आयुष्य. पहिलं महायुद्ध संपल्यानंतरचा हा काळ. ब्रिटन अजून या आर्थिक, मानसिक आणि भौतिक नाशातून सावरलेलं नव्हतं, पण तरीही धनाढय़ व्यक्तींचे गट थाटामाटात जगत होते. हाच सामाजिक विरोधाभास व्हर्जिनिया अधोरेखित करते. याच्या उलट, जो युद्धात लढला तो सेप्टीमस् झ्ऊएअ चा बळी ठरतो. एव्हान्स नावाच्या मृत मित्राचा आभास जगत राहण्याचा श्राप त्याला युद्धातून मिळतो आणि अशांच्या वाटय़ाला आलेलं दुर्लक्ष तिला सलत राहतं हे तिच्या लिखाणातून वारंवार स्पष्ट होतं. हेमिंग्वे विस्मृतीत गेलेल्या अशा पिढीला ‘लॉस्ट जनरेशन’ असं संबोधतो. भांडवलदारांच्या औद्योगिक हव्यासामुळे उद्भवलेलं युद्ध आणि त्यामुळे देशोधडीला लागलेली पिढी हे दुर्दैवी आहेच, पण त्यांच्या वाटय़ाला मानसिक असहायता येणं हा त्याहून मोठा दुर्विलास! लेखिकेनं विलासी आयुष्यात रमलेल्या मोजक्याच, पण प्रभावी असणाऱया समाजघटकांचे याबाबत कान उपटले आहेत.

मोठा सामाजिक आशय ते खासगी आयुष्याच्या प्रश्नाप्रत पोहोचणं हे या ग्रंथाचं खास वैशिष्टय़ म्हणावं लागेल. यातली पात्रं आठवणींमध्ये रमतात, भूतकाळात शिरून संवाद सुरू ठेवतात आणि वास्तवाच्या विस्तवस्पर्शाने जागीही होतात. क्लॅरिसा ही धनाढय़ पतीच्या घरातली शोभेची वस्तू होऊन राहिली आहे. स्थिर आयुष्य की प्रेम करणारा सुहृद, यात ती स्थिरता निवडते आणि पुढे सबंध आयुष्य ती प्रेमाला पारखी होते. सुखवस्तू जीवन की भावनिक समृद्धी? असा प्रश्न ‘व्हर्जिनिया’ आपल्या पुढय़ात ठेवते. सेप्टीमस् आणि त्याच्या मानसिक प्रश्नांना गांभीर्याने न घेता त्याला भित्रा ठरवू पाहणारे मानसोपचार तज्ञ तिला संवेदनाहीन वाटतात. पुढे हे पात्र आत्महत्या करतं.

तिच्या अल्पवयात आई-वडील आणि भावंडं काळाच्या आड गेल्यानं ‘व्हर्जिनिया’ अशाच नैराश्यातून गेली होती आणि दुर्दैवाने तिनेही 1941 साली स्वतला संपवलं होतं. तिच्या खासगी अनुभवातून आलेलं दुःख, दुर्लक्ष करणारा मूढ समाज आणि ‘मृत्यू’ नावाचं अंतिम सत्य या ग्रंथात तिने चितारलं, त्यामागच्या प्रेरणा आणि खुणा तिच्या पूर्वायुष्यात सापडतात. ‘मिसेस डॅलवे’त अनेक पात्रांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांची गाठ वाचकाने सजगपणे घ्यायला हवी. अखेर, एखादा ग्रंथ आपल्याला कुठला सुकर मार्ग दाखवतो आहे, यापाशी आपण घोटाळत राहिलो की, त्या वाचनाची फलश्रुती प्राप्त होते हे निश्चित!
[email protected]