
>> सुहास मळेकर
‘कुठे यार तू पण त्यांच्या नादी लागतोस?’
एकाच रंगाच्या गर्दीत त्याच हिरव्या रंगाचा शर्ट परिधान केलेला पाहिल्यावर मित्राने उगाच खिल्ली उडवायचा प्रयत्न केला. त्याने मुद्दामहून हिरव्याच्या विरोधी नारिंगी रंगाचा टी-शर्ट घातला होता.
‘काय झाले रे तुला’ त्याला विचारले.
‘हे फॅड कोणीतरी जबरदस्तीने आणले आहे आणि आपण त्याला बळी पडतो, कुठल्या पुराणात देवाने सांगितले आहे आज हा रंग परिधान करा, उद्या तो दुसरा घाला?’ तो तावातावाने बोलत होता.
ठीक आहे असं मनात म्हणत त्याला बुकलून काढायचे ठरवले. ‘बरं मला सांग, गटारीसाठी मित्र जमवून आमंत्रण देतोस, गटारी साजरी करण्यासाठी दारूसोबत काsंबडय़ा, बकऱयांचा फडशा पाडायची कुठल्या देवाने सांगितलेली परंपरा आहे रे?’
‘ते तसे नसते रे, ती आपली मजा असते’ तो नजर चुकवत म्हणाला.
‘बरं मग हे सांग, गेल्या वर्षी ते रंगीबेरंगी डोळे दिपवणारे आणि कानठळय़ा बसवणारे प्रचंड मोठय़ा आवाजाचे अमाप फटाके आणून तुझ्यासह सरसकट सगळय़ांच्या आरोग्याची आणि पैशांची राख केलीस. कुठल्या देवीने सांगितलेली ही परंपरा आहे रे?’
गेल्या वर्षी 31 डिसेंबरला हाच मित्र दोघाचौघांना आपल्यासोबत घेऊन ‘आपला नवीन वर्ष गुडीपाढव्यालाच, थर्टीफर्स्टला नाही’ सांगायला आला होता तेव्हा गोड बोलून त्या चौघांसमोरच त्याला विचारले, ‘तुझा वाढदिवस कधी असतो रे?’
‘12 फेब्रुवारी.’ त्याने म्हटले आणि मी त्याच्यावर त्याचाच प्रश्न उलटवला, ‘इंग्लिश नाही, आपल्या हिंदू पॅलेंडरप्रमाणे तिथी सांग’ तेव्हा गडबडून गेला होता. तेव्हाच त्याला सांगितले होते, ‘मला पण मराठीपणाचा, माझ्या भाषेचा, माझ्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे आणि तोही तुझ्यापेक्षा कांकणभर जास्तच! पण तो डोळसपणे मी अमलात आणतो. साऱया जगाने व्यवहारात इंग्रजी पॅलेंडर स्वीकारला आहे. एरव्ही आपल्या देशात सगळे प्रांत आपापले सण-वर्ष आपापल्या पॅलेंडरप्रमाणे साजरे करतोच ना?’
आता विषय होता नवरात्रीच्या रंगांचा. खरे तर तसे एकाच दिवशी सर्वांनी एकाच रंगाचे तरी विविध पॅटर्नचे कपडे जमेल तसे आपापल्या आवडीप्रमाणे घालणे, अगदी जगाच्या कानाकोपऱयात एकोपा दाखविणे काही वाईट दिसत नाही. वाईट आणि नुकसानकारक पायंडे पाडण्यापेक्षा चांगले ते आपल्या संस्कृतीने स्वीकारायला कसलीच अडचण नाही.
‘हा रंगीत पेहरावाचा उत्सव आपण स्वीकारायला काय हरकत आहे?’ त्याला किती रुचले तेव्हा कळले नाही. तो पाचव्या दिवशी निळा शर्ट घालून उत्सवाच्या जल्लोषात मिसळून गेला. त्याच्यात बदल झाला, त्याला पटलं होतं.


























































