
>> वैद्य सत्यव्रत नानल
आयुर्वेदानुसार आपण जो पदार्थ खातो तो कसा, कधी, किती, का खातो याचे नियम समजणे आवश्यक असते. आपल्याला फायद्याचे परिणाम समजून घेऊन आंबे खाल्ले तर आपोआपच नुकसान न होता फायदा म्हणजेच आरोग्य आणि आनंदही मिळवता येतो. आंबे जेवणाबरोबर रस काढून खावेत. रसात गायीचे साजूक तूप असावे. याने आतड्यांची कार्यक्षमता आणि शक्ती वाढते.
पचनशक्ती उत्तम असताना रिकाम्यापोटी फक्त आंबा खायचा असेल तर आंबा कापून, चावून खावा. याने अंगावरील मांसाचे वजन वाढते, शरीराची ताकत वाढते. आंबा रात्री शक्यतो खाऊ नये. याने कफाचे, अपचनाचे रोग होतात.
आयुर्वेदानुसार कोणतीही ताजी फळे दुधाच्या पदार्थांबरोबर खाऊ नयेत, असा निर्देश आहे. म्हणजे शिकरण, सीताफळ कुल्फी, पायानेपल मिल्कशेक, स्ट्रॉबेरी आइस्क्रीम, स्ट्रॉबेरी बासुंदी असे प्रकार खाऊ नयेत. त्याने पचनाचे त्रास होतात. ते खायचे असतील तर आधी आपल्या वैद्याचा सल्ला जरूर घ्यावा आणि परिणाम समजून घ्यावेत. या सर्वात महत्त्वाच्या नियमाला अपवाद म्हणजे कलमी हापूस आंबा. हापूस आंबा हे एकमेव फळ आहे जे दुधाच्या पदार्थांबरोबर एकत्र करून खाल्ले जाऊ शकते.
आंबा आणि दूध एकत्र करून, मिल्कशेक, आइस्क्रीम, फालुदा करून खायचे असेल तर शक्यतो उन्हाळ्यात रिकाम्यापोटी तेही दिवसा खावे. सकाळी 11 ते दुपारी 4 ही सामान्यतः पित्ताची वेळ असते त्यात असे पदार्थ खावेत. याने शुक्राचे प्रमाण आणि दर्जा दोन्ही वाढतो. मैथुनानंतर थकवा येत असेल, चिडचिड होत असेल तर याने फायदा होतो. आम्रखंडही या दिवसात जेवणासह चालतो. शुकाचे प्रमाण आणि दर्जा सुधारतो. शरीराची ताकत वाढते. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि आतडय़ांची शक्तीही वाढते. ग्रहणी रोगात मधेमधे भूक लागत असेल तर दुपारी चार वाजता 20-25 ग्राम आम्रखंड चघळावे
हृदयास हितकर आंबा
आंबे चोखून खाणे हे हृदयरोग, फुप्फुसाचे रोग असणाऱयांसाठी सर्वात उत्तम प्रकार. पिकलेला आंबा हाताने दाबून मऊ करून घ्यावा. देठाकडील भाग काढून त्यातून हलके दाबून आधी येणारा पाण्यासारखा रस एक चमचाभर काढून फेकून द्यावा आणि मग तोंडाने चोखून तो आंबा खावा. यासाठी सर्वात उत्तम आंबा म्हणजे रायवळ गोटी (देशी जंगली) आंबा. स्थानिक आंब्यांचे सर्व गोड प्रकार असा प्रकारे खावेत, म्हणजे सर्वोत्तम फायदा होतो.
ऋतूनुसार आंबा खाण्याचे नियम
उन्हाळ्यात गोड चवीचे आणि पावसाळ्यात गोड आणि आंबट चवीचे आंबे खावेत म्हणजे त्रास होत नाही.
आंब्याचे पदार्थ आणि त्यांचे फायदे
मेथांबा जेवणात खाल्याने पचन सुधारते. आंबा मुरब्बा, आंबा बर्फी हे पदार्थ आंबा मिळत नसेल त्यावेळी जेवणात खाल्याने आंब्याचे वरील सर्व फायदे मिळतात. वजनही वाढते
आंबा पोळी हा प्रकार क्षयाचे रोगी, वजन वाढत नाही असे लोक, शुक्रधातूच्या विकृती या सर्वांसाठी अमृतासमान काम करते. बारा महिने मिळते, कधीही खाता येते आणि सहज पचतेसुद्धा. या आंबा-पोळीबरोबर वेलची, जायफळ पूड मिसळून खाल्ली तर अजून फायदा होतो.
आंब्याचा ताजा रस काढून बर्फाच्या ट्रेमधे ठेवून फ्रीझरमधे ठेवावा, असा कोणतीही प्रक्रिया न केलेला रस पुढे वर्ष दोन वर्षे थोडा थोडा वापरता येतो. याला पर्याय म्हणजे साखर घालून आटवलेला रस. याला ताज्या रसाची चव नसते, पण वर्षभर खायला मिळतो.
मधुमेह आणि आंबा
मधुमेही रुग्णांनी आंब्याच्या दिवसात आंबे आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने खावेत. भात आणि आंबा एकत्र खाल्याने मधुमेही लोकांना खूप त्रास होतो. शक्यतो आंबा खाताना भात खाऊ नये हा नियम तरी नक्कीच करावा. प्रमाणात आंबा खाल्ला आणि इतर नियम पाळले तर मधुमेही व्यक्तीदेखील आंबे खाऊ शकतात.


























































