मराठी उद्योजकाची भरारी

>> वर्णिका काकडे

टीव्ही रिमोटपासून डिस्कमन, वॉकमन ही पूर्वी वापरली जाणारी उपकरणं अथवा होम थिएटरसारखी कायम मागणी असणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा दरात पुरवणं आणि त्यातही गुणवत्तेबाबत कुठेही तडजोड नसणं ही एमईपीएलची वैशिष्ट्यं. ग्राहकांची ही गरज ओळखून सुधीर म्हात्रे यांची स्काय इलेक्ट्रिकल कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादन क्षेत्रात सध्या अनेक ब्रॅण्ड उपलब्ध आहेत. कोणत्याही काळात या उत्पादनांना मागणी असतेच, परंतु यात देशाबाहेरील ब्रॅण्ड अधिक प्रमाणात दिसतात. परंतु आपलं वैशिष्ट्य आणि गुणवत्ता राखत कायम मागणी असते ती एमईपीएल या मराठामोळे व्यावसायिक सुधीर म्हात्रे यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना. टीव्ही रिमोटपासून डिस्कमन, वॉकमन ही पूर्वी वापरली जाणारी उपकरणं अथवा होम थिएटरसारखी कायम मागणी असणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा दरात पुरवणं आणि त्यातही गुणवत्तेबाबत कुठेही तडजोड नसणं ही एमईपीएलची वैशिष्ट्यं. ग्राहकांची ही गरज ओळखून सुधीर म्हात्रे यांची स्काय इलेक्ट्रिकल कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे.

अगदी 25-30 वर्षांपूर्वी रिमोटचा टीव्ही हे मध्यमवर्गाचं स्वप्न असायचं, परंतु त्या काळात अशा टीव्हीच्या किमती सामान्यांना परवडत नसतं. या प्रश्नाच्या उत्तरातूनच सुधीर म्हात्रे यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. आठ वाहिन्यांच्या टीव्ही सिस्टीमला 90 वाहिन्यांच्या सिस्टीममध्ये आणणारं मल्टी चॅनेल किट त्यांनी पहिल्यांदा तयार केलं आणि त्यांच्या या उपकरणाला प्रचंड मागणी मिळाली. इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज व्हर्च्युअल क्लासरूम स्टुडिओपर्यंत पोहोचला आहे.

महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उद्योजक कार्यरत आहेत. अनेक कल्पना प्रत्यक्षात राबवत आहेत. उद्योजक होण्याचं असंच स्वप्न 1989 साली स्काय इलेक्ट्रिकल अर्थात एमईपीएलचे संचालक सुधीर म्हात्रे यांनी पाहिलं. केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक आणि एक कर्मचारी सोबत घेत त्यांनी म्हात्रे इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. ची स्थापना केली आणि आज हा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अव्वल ठरत, प्रयोगशीलता राखत आपलं स्थान घट्ट रोवून उभा आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ब्रॉडकास्ट क्षेत्रातील महत्त्वाची व्यावसायिक उत्पादनं तयार करणं हा एमईपीएलचा मुख्य उद्देश. त्यामुळे या क्षेत्रातील सर्वच उपकरणं एमईपीएलद्वारे तयार केली जातात. एमइपीएलच्याच स्काय इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डअंतर्गत ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उत्पादनं तयार केली जातात. यात सुरुवातीला विशेषत: व्हीसीडी, डीव्हीडी प्लेअरला खूप मागणी असे. नाविन्यपूर्ण उपकरणं देण्याबाबत एमईपीएलचा हातखंडा होता.

याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या होम थिएटरला प्रचंड मागणी होती. हिंदुस्थानात होम थिएटरचं उत्पादन करणारा एमईपीएल हा पहिला ब्रॅण्ड ठरला आहे. प्रयोगशीलता राखत ग्राहकाभिमुख उत्पादनं तयार करणं हे एमईपीएलचं वैशिष्ट्य. परंतु यासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार नाही याची दक्षताही सुधीर म्हात्रे यांनी घेतली. यासाठी उत्पादन घेण्यासाठीचा खर्च कमीत कमी राखला तर आपसूकच उत्पादनाची किंमत कमी होईल आणि आपसूकच ग्राहकांनाही ते उपकरण खरेदी करणं आवाक्यात राहील यासाठी सुधीर म्हात्रे यांनी प्रयत्न केले.

सुधीर म्हात्रे यांनी सुरू केलेल्या गोवंडी येथील पहिल्या दुकानापासूनचा हा प्रवास आता विविध ठाकणच्या औद्योगिक क्षेत्रात विस्तारलेल्या प्लाण्टमध्ये झाला आहे. सीसीटीव्ही क्षेत्रातही एमईपीएल पुढे आहे. विशेषत: बँकिंग क्षेत्राला सीसीटीव्ही पुरवण्याचं काम एमईपीएलद्वारेच पाहिलं जातं. 2012 पासून एलईडी टीव्हीच्या उत्पादन घेण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी विविध कंपन्यांसोबत करारही केला आहे. भिवंडी येथे 60 हजार फुटांच्या विस्तारलेल्या जागेत एलईडी टीव्हीचे उत्पादन घेतले जाते. दिवसाला 1000 टीव्ही बनवण्याची क्षमता या प्लाण्टमध्ये आहे. यात स्मार्ट टीव्हीपासून वेगवेगळी तंत्रज्ञान असलेले टीव्ही बनवले जातात. सध्या टच कंट्रोल टीव्ही आणि आयबी टीव्हीला जास्त मागणी आहे. आयएफपीडी तंत्रज्ञान असलेल्या स्क्रीनचं उत्पादनही जास्त घेतलं जात आहे. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात या स्क्रीन जास्त प्रमाणात वापरल्या जातात. याच्या हिंदुस्थानातील काही प्रमुख सप्लायरपैकी एक एमईपीएल कंपनी आहे.

शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे बदल होत असतात. अशा बदलांना सामावणारी इलेक्ट्रॉनिक उत्पादनं एमईपीएलद्वारे बनवली जातात. यापैकी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही स्वरूपाची उत्पादनं एमईपीएलद्वारे उत्पादित केली जातात. अशी सेवा देणारी ही हिंदुस्थानातील एकमेव कंपनी आहे. सिनेमा क्षेत्रात व्हर्च्युअल स्टुडिओ आणि सिनेमा वॉल अशा सेवाही सध्या एमइपीएलद्वारे दिल्या जात आहेत. तसेच प्रिंटर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातही एमइपीएल काम करत आहे. आतापर्यंत हिंदुस्थानात प्रिंटर बनवले गेले नाहीत. परंतु एमइपीएलद्वारे पहिल्यांदाच लेक्समार्क या कंपनीशी करार करत, तांत्रिक सहाय्य घेत प्रिंटर मशीनचे उत्पादन घेतले जात आहे. आयएफपीडी हे एमईपीएलचे महत्त्वाकांक्षी उत्पादन आहे. ‘प्रॉडक्ट ऑफ द फ्युचर’ असंच त्याचं वर्णन सुधीर म्हात्रे करतात. ग्रामीण भागात शैक्षणिक प्रगतीसाठी याचा उपयोग होणार असून या व्हर्च्युअल क्लासरूमसाठी आवश्यक असणाऱ्या या उत्पादनाच्या व्यवसायात एमईपीएलचा मोठा वाटा असल्याचं ते सांगतात. याबरोबरच एसर अमेरिका या नावाजलेल्या कंपनीसोबत करार करण्यात आला असून आता एसरची इलेक्ट्रॉनिक उत्पादनं तयार करणं आणि विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याद्वारे जागतिक पातळीवरच्या सुविधा आणि तंत्रज्ञान इथल्या लोकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं सुधीर म्हात्रे सांगतात.

एमइपीएलद्वारे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक क्षेत्रातील नवनवीन उत्पादनं तयार केली जात आहेत, मात्र ही घेताना इथला कामगारवर्गही तितकाच कुशल असेल याची खबरदारीही घेतली जात आहे. हे करताना केवळ इंजिनीअर वर्गावर भर न देता युनिटमधील सर्व कर्मचाऱ्यांना हे काम शिकता येईल यासाठी ट्रेनिंगही दिले जाते. यामुळे आत्मविश्वास असलेला कुशल कामगार वर्ग तयार होतो आणि तीच खरी आमची कमाई आहे, असं सुधीर म्हात्रे सांगतात. अशा प्रकारच्या उद्योगांमुळे तिथल्या लोकांनाही रोजगाराचं साधन उपलब्ध होतं. त्यामुळे नवउद्यमींची गरज असल्याचंही ते आवर्जून सांगतात.
कोरोनाकाळात अनेक उद्योगधंदे ठप्प झाले. एमईपीएलही याला अपवाद नव्हते. मात्र अशा पडत्या काळात कामगारवर्गाची गरज संचालक सुधीर म्हात्रे यांनी ओळखली. या काळात कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करण्यात आले नाही. कंपनीसाठीदेखील हा नुकसानदायक काळ होता, मात्र अशा वेळी कामगारांनाच प्राधान्य दिलं गेलं. ज्यामुळे आता पुन्हा त्याच वेगाने काम करणं शक्य होत आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनात काळानुसार बदल होत असतात. काळाची गरज आणि ग्राहकांची मागणी जाणून त्यानुसार प्रयोगशीलता राखत एमईपीएलने अनेक उत्पादनं ग्राहकांसाठी तयार केली आहेत. नव्या उत्साहाने, नवीन कल्पना मांडत ग्राहकाला समाधानकारक सेवा देऊन मराठी उद्योगजगताची वेगळी ओळख तयार करण्यात एमईपीएल आणि संचालक सुधीर म्हात्रे यांचा वाटा मोठा आहे.

[email protected]