दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशात मायावतींचे ‘एकला चलो रे’!

>> नीलेश कुलकर्णी,  [email protected]

ब्राह्मण शंख बजायेगा हाथी आगे जायेगाअशीसोशल इंजिनीअरिंगची घोषणा करून उत्तर प्रदेशसारख्या जातीपातीची पाळेमुळे घट्ट असणाऱ्या राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ घडवून आणणाऱ्या मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचाहाथीसध्या ईडी आणि सीबीआयच्या माहुताने घेरलेला असावा. त्यामुळेच एकीकडेइंडियाच्या नेतृत्वाखाली भाजपला समर्थ पर्याय निर्माण होत असताना बहेनजी मायावती यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा आत्मघातकी निर्णय जाहीर करून भाजपपुढे शरणागतीच पत्करली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे राजकारण हे गेल्या काही वर्षांमध्ये भाजपधार्जिणे असेच राहिलेले आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरण आणि अनेक प्रकरणांच्या फायली ईडीच्या टेबलावर  असल्याकारणाने मायावती या ‘कातडी बचाव’ भूमिका घेऊन राजकारण करत असल्याचा आरोप राजकीय वर्तुळात नेहमीच होत आहे. वास्तविक मायावतींची ‘जाटव’ ही व्होट बँक अजूनही त्यांच्या पाठीशी आहे. मात्र 20 टक्के मतदान मिळूनही राज्य विधानसभेत मायावतींचा केवळ एकच आमदार विधानसभेत निवडून आला. कांशीराम यांच्या वैचारिक मुशीत घडलेल्या मायावतींनी भाजपपुढे पत्करलेली शरणागती शोकांतिका मानावी लागेल.

केंद्रात यूपीए सरकार असताना मायावती या पंतप्रधानपदासाठीचा समर्थ पर्याय म्हणून नावारूपाला आल्या होत्या. मायावतींचे चाणक्य असलेल्या सतीशचंद्र मिश्रा यांनी उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण आणि दलित समाजाची व्होट बँक एकत्र बांधून राजकीय चमत्कार घडवून आणला होता. बाबू जगजीवनराम यांना अभिप्रेत असलेला ब्राह्मण-दलित व्होट बँकेचा फॉर्म्युला अस्तित्वात आल्यामुळे राजकारणातच नाही, तर उत्तर प्रदेशसारख्या राज्याच्या समाजकारणातही मोठी उलथापालत घडून आली होती. राममंदिराचा मुद्दा आणि मोदींचे वाराणसीमधून निवडणूक लढविण्याचे धोरण यामुळे बसपाकडे आकृष्ट झालेला ब्राह्मण वर्ग हळूहळू भाजपकडे गेला. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या कथित ब्राह्मणविरोधी धोरणामुळे हा वर्ग पुन्हा एकदा बसपाकडे येण्यास उत्सुक असतानाही मायावती यांनी ठाम भूमिका न घेतल्यामुळे अगदी नाइलाजास्तव ब्राह्मण समाजाला पुन्हा एकदा भाजपची पाठराखण करावी लागली. त्यामुळे मायावतींचा या समाजातला बेस संपला. ओबीसी आणि इतर समाजावर त्यांची मदार कधीच नव्हती. स्वामीप्रसाद मौर्या यांसारखे नेते भाजपने आपल्या कळपात ओढले तरी जाटव समाजाने मायावतींची साथ कधीच सोडली नाही.

2024 सालची लोकसभा निवडणूक सोपी जाणार नाही याची जाणीव दिल्लीतल्या भाजपच्या ‘चाणक्यां’ना आहे. त्यातच विरोधी पक्षांची मजबूत अशी ‘इंडिया’ची आघाडी आकाराला येत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच ‘इंडिया’ची ‘भारत’ हे नामकरण असो की गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय असो, आता पटापट निर्णय होतील. ‘इंडिया’ सत्तेत येईल या शक्यतेला घाबरूनच या सगळ्या हालचाली सुरू आहेत. अशा अनुकूल घटना घडत असताना  मायावती यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ अशी घोषणा करून आत्मघाती पाऊल उचलले आहे.

दिनेश शर्मांना लॉटरी

राज्यसभेचे भाजपचे खासदार हरिद्वार दुबे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठय़ा राज्यातून कोणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. मात्र अनपेक्षितपणे उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना राज्यसभेची संधी देऊन दिल्लीकरांनी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे. वास्तविक योगी मुख्यमंत्री असताना दिनेश शर्मा हे उपमुख्यमंत्री होते. या दोघांतूनही विस्तवही आडवा जात नव्हता. योगींच्या कार्यशैलीबद्दल राज्यामध्ये त्या वेळीही असंतोष होता, आताही आहे. योगींना काटशह म्हणून दिनेश शर्मा यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र दिल्लीकरांच्या दृष्टीने हे नाणे अगदीच ‘फेल’ गेले. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता आल्यानंतर दिनेश शर्मांचे पंख छाटण्यात आले. नरेंद्र मोदी एकेकाळी उत्तर प्रदेशची जबाबदारी पाहत होते त्यावेळी दिनेश शर्मा त्यांच्या संपर्कात आले आणि लखनऊचे महापौर म्हणून त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली. केवळ हीच एक जमेची बाजू त्यांच्या दृष्टीने असल्याने दिनेश शर्मा थेट योगींच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी ना समाजाचे काही काम केले, ना राज्याचे. त्यामुळे साहजिकच ब्राह्मण समाजातही त्यांच्याबद्दल असंतोष होता. त्यामुळेच दिल्लीश्वरांनी बसपातून बृजेश पाठक यांना आणून योगींच्या डोक्यावर बसवण्याचा प्रयत्न केला आणि ब्राह्मण समाजात ‘फील गुड’ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता अडगळीला पडलेल्या दिनेश शर्मा यांना अचानक राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पार्टटाइम खासदार

पार्टटाइम खासदार होण्यापेक्षा मला काहीतरी पर्मनंट करणे आवडेल, असे विधान करून भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सेहवागचे विधान त्याचाच एकेकाळचा माजी सलामीवीर असलेला सहकारी आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांच्याबद्दल असल्याची चर्चा आहे. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे आणि त्यांच्या लाटेवर वगैरे स्वार होऊन या देशातले अनेक हौशे, गवशे, नवशे संसदेत पोहोचले. त्यात गौतम गंभीर महाशय होते. त्यांचा परिचय अत्यंत उथळ क्रिकेटपटू म्हणूनच होता. मात्र लोकप्रतिनिधी म्हणूनही गंभीरच्या वर्तनामध्ये कधी ‘गांभीर्य’ दिसून आले नाही. अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे काही नेते, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यावर तोंडसुख घेणे यापलीकडे या गृहस्थांचे कुठले कर्तृत्व नाही! नशिबाने आणि लोकप्रियतेच्या जोरावर खासदारकीचे तिकीट मिळाल्यानंतर हे हवेतच आहेत आणि त्यांचे संसदेतले दर्शन हे ‘देवदुर्लभ’ आहे. अशा ‘पार्टटाइम’ खासदाराचे कान त्याचाच एकेकाळचा सहकारी सेहवाग यांनी टोचले हे बरेच झाले! आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतले भाजपचे सातही खासदार बदलले जातील आणि नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली जाईल असे मानले जात आहे.  राजकारण आणि समाजकारणात ‘गंभीर’ न राहिलेल्या गौतम यांची राजकीय ‘विकेट’ जाईल ही अटकळ आतापासूनच लावली जात आहे.