
>> दयानंद पाटील
डहाणू लोकल 18 वर्षांच्या अतिशय मोठय़ा कालखंडाच्या प्रतीक्षनंतर अनेक तांत्रिक आणि नकारात्मक कारणे पार करत तसेच हायकोर्टाच्या आदेशाने दि.16 एप्रिल 2013 रोजी सुरू झाली.
डहाणू लोकल सुरू होऊन 10 वर्षे झाली असून या दहा वर्षांत डहाणू विभागाची प्रवासी संख्या अनेक पटीने वाढली आहे आणि वाढत आहे. मागील 10 वर्षांचे डहाणू लोकल फेऱ्या वाढण्याचे निरीक्षण केल्यास फक्त दोनच फेऱ्या वाढल्या आहेत. त्यात कोरोना काळात सकाळच्या पिक अवरची महत्त्वाची डहाणू येथून सकाळी 7.05 वा. सुटणारी विरार लोकल बंद करण्यात आली आहे. तसेच विरार येथून पहाटे 5.00 वा. सुटणारी डहाणू लोकलही बंद करण्यात आली आहे. या दोन्ही लोकल आजतागायत सुरू करण्यात आल्या नाहीत. अशा या लोकल सुरू करण्याच्या आणि अतिरिक्त डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या प्रवाशांच्या मागणीला पश्चिम रेल्वेकडून नकार दिला जात आहे. स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींनीसुद्धा रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्षात गाठीभेटी घेऊन या मागण्यांची निवेदने दिली असून पश्चिम रेल्वेने डहाणू -विरारदरम्यान दोनच लोहमार्ग असल्याने डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविणे शक्य होणार नाही, असे आताच जाहीर केले आहे.
आजच्या या परिस्थितीत मागे वळून पाहिल्यास साल 2008 पर्यंत विरार-बोरिवलीदरम्यान दोनच लोहमार्ग असतानाही कशा प्रकारे गाडय़ा धावत होत्या आणि 2023 साली विरार-बोरिवली चौपदरीकरणयुक्त लोहमार्ग असताना कशा प्रकारे गाडय़ा धावत आहे हे सविस्तर तक्त्यात दर्शविण्यात आले आहे.
वर्ष 2008 पर्यंत विरार-बोरिवलीदरम्यान दोनच लोहमार्ग असताना एकूण 367 गाडय़ा धावत असत आणि त्याच वेळी विरार-डहाणूदरम्यानसुद्धा दोनच लोहमार्ग असताना एकूण 182 गाडय़ा धावत होत्या आणि आज वर्ष 2023 ला विरार-बोरिवली चार लाइन पूर्ण असून या मार्गावर एकूण 637 गाडय़ा धावत आहेत, तर विरार-डहाणूदरम्यान अजूनही दोनच लोहमार्ग असताना गाडय़ा धावण्याची संख्या एकूण 308 इतकी झाली आहे. विरार-बोरिवली आणि विरार-डहाणू या दोन विभागांचे गाडय़ा धावण्याचे प्रमाण सरासरी 367 – 182 पाहण्यास गेल्यास आणि आजच्या 2023 च्या घडीला 367 – 308 विरार-बोरिवलीच्या दृष्टीने विरार-डहाणूदरम्यानसुद्धा 59 गाडय़ा धावू शकल्या असत्या आणि 2008 ला तर 185 गाडय़ा धावू शकल्या असत्या. तथापि डहाणू विभागासाठी इतक्या गाडय़ांची जरी आपण अपेक्षा ठेवली नाही तरी आजच्या घडीला किमान डहाणू लोकलच्या 10 फेऱ्या अप-डाऊन नक्कीच बसू शकतील.

या सर्व बाबतीत पश्चिम रेल्वेकडे नेहमीप्रमाणे तांत्रिक उत्तरही तयार असेलच आणि त्याचा थोडा ढोबळपणे समीक्षा करायची झाल्यास विरार ते बोरिवली 26 कि.मी. अंतर आहे, तर विरार ते डहाणू हे अंतर 64 कि.मी. आहे आणि विरार ते बोरिवली यादरम्यान गाडय़ांचा वेग ताशी 110 कि.मी. आहे तर विरार ते डहाणूदरम्यान गाडय़ांचा वेग ताशी 130 कि.मी. आहे. तथापि महत्त्वाचे नमूद करायचे झाल्यास पश्चिम रेल्वेचे उपनगरीय कार्यक्षेत्र हे चर्चगेट ते डहाणू असे आहे. त्यादृष्टीने गाडय़ा धावण्याची वेग मर्यादा जर समान ठेवून डहाणूनंतर वेग मर्यादा ताशी 130 कि.मी. केल्यास नक्कीच डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढू शकतात किंवा वेग मर्यादा आता आहे तशीच जरी ठेवली तरी किमान 10 फेऱ्या नक्कीच वाढू शकतात. म्हणूनच पश्चिम रेल्वेने डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास दोनच लाइनचा बहाणा न देता किमान फेऱ्या वाढवून प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकावे.

























































